आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात शनिवारी पश्चिम बंगाल आणि आसामच्या ७७ मतदारसंघांत मतदान होणार आहे. त्यात आसामच्या ४७ तर बंगालच्या ३० जागा आहेत. निवडणूक आयोगाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, पहिल्या टप्प्यात एकूण २६४ उमेदवार असून त्यात २३ महिलांचा समावेश आहे. मतदान सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत चालेल.
आसाममध्ये पहिल्या टप्प्यात ज्या महत्त्वाच्या उमेदवारांचे भवितव्य इलेक्ट्राॅनिक व्होटिंग मशीनमध्ये (ईव्हीएम) बंद होणार आहे त्यात मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, राज्य विधानसभेचे अध्यक्ष हितेंद्रनाथ गोस्वामी आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष रिपुन बोराह यांचा समावेश आहे. राज्यात एकूण १२६ मतदारसंघ असून तीन टप्प्यांत निवडणूक होत आहे. दुसऱ्या टप्प्याचे मतदान एक एप्रिलला तर तिसऱ्या टप्प्याचे मतदान सहा एप्रिलला होईल. दुसरीकडे, २९४ मतदारसंघ असलेल्या बंगालमध्ये पहिल्या टप्प्यासाठी २१ महिलांसह १९१ उमेदवार आहेत. त्यात श्रीकांत महतो, राजीव लोचन सरेन, उत्तम बारीक (तृणमूल काँग्रेस), रवींद्रनाथ मैती, राजीव कुंडू, चंदन बौरी (भाजप), नेपाल महतो व शिव मैती (काँग्रेस) या उमेदवारांचा समावेश आहे. राज्यात ८ टप्प्यांत मतदान होणार आहे. सर्व राज्यांतील निकाल २ मे रोजी येतील.
पुद्दुचेरीची निवडणूक टाळता येऊ शकते का? : हायकोर्ट
निवडणुकीशी संबंधित एका महत्त्वाच्या याचिकेवर शुक्रवारी मद्रास उच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यादरम्यान,‘पुद्दुचेरीची निवडणूक टाळता येऊ शकते का?,’ अशी विचारणा न्यायालयाने निवडणूक आयोगाला केली. या केंद्रशासित प्रदेशातील सर्व जागांवर एकाच टप्प्यात ६ एप्रिलला मतदान होत आहे. डीवायएफआयचे नेते के. आनंद यांनी ही याचिका दाखल केली आहे. तीत आरोप केला की, भाजपने मतदारांचे आधार क्रमांकाशी जोडलेले फोन क्रमांक मिळवले आहेत. पक्षाने त्याद्वारे सर्व ९५० मतदान केंद्रांवर व्हाॅट्सअॅप गट बनवले आहेत. त्यामुळे मतदारांवर प्रभाव पडत आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.