आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराखासदार संजय राऊत यांना कुख्यात लॉरेन्स बिष्णोई टोळीकडून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. “तुम्ही हिंदूविरोधी आहात. दिल्लीत आल्यानंतर मुसेवालासारखी एके ४७ ने हत्या करू. तू आणि सलमान फिक्स,’ असा धमकीचा मेसेज राऊत यांना आला होता. याप्रकरणी पुण्यात राहुल तळेकर (२३) यास खराडी चंदननगर येथील हाॅटेलातून ताब्यात घेण्यात आले आहे. त्याला मुंबई पोलिसांच्या हवाली करण्यात आले. धमकीनंतर राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची हत्या करणाऱ्या लॉरेन्स बिष्णोई टोळीकडून ठार मारण्याची धमकी असलेला मेसेज संजय राऊत यांना आला होता. याप्रकरणी तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर मुंबई पोलिसांना धागेदारे मिळाले होते. त्यानुसार एक संशयित पुण्यात असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेस कळवली होती. त्यानुसार पुणे पोलिसांनी संबंधित आरोपीचा तपास करत खराडी चंदननगर परिसरातून एका हॉटेलमधून राहुल तळेकरला ताब्यात घेतले. तो हॉटेल चालवतो आणि मूळचा जालना जिल्ह्यातील आहे.
या प्रकाराची माहिती मुंबईचे पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी दिली आहे. प्राथमिक तपासात तळेकरचा लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंध आढळून आलेला नाही. खासदार राऊत यांच्या वक्तव्यामुळे संतप्त झालेल्या तळेकर यांनी त्यांच्या मोबाइलवर फोन करून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. मोबाईलवर संभाषण होऊ शकले नाही, तेव्हा दारूच्या नशेत त्यांनी त्यांना एसएमएस करून धमकी दिली. त्याची फिर्याद राऊत यांचा भाऊ सुनील राऊत यांनी कांजूरमार्ग पोलीस ठाण्यात दिली. बिष्णोई टोळीने अभिनेता सलमान खान यालाही जिवे मारण्याची धमकी दिली.
सरकारला धमकीचे गांभीर्य नाही : संजय राऊत : सरकारवर आम्हाला विश्वास नाही. त्यामुळे मी केवळ पोलिसांना धमकीबाबत माहिती दिली आहे. आम्ही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धमकीबाबत तक्रार करतो, तेव्हा हा विरोधकांचा स्टंट आहे, अशी ते चेष्टा करतात. सरकार आमच्या धमकीला गांभीर्याने घेत नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
दारूच्या नशेत राऊतांना धमकी : फडणवीस नागपूर | संजय राऊत यांना धमकी देणाऱ्याची ओळख पटलेली आहे. त्याने दारूच्या नशेत धमकी दिल्याची प्राथमिक माहिती आहे. तथापि, यासंदर्भात संपूर्ण तपास करून कारवाई केली जाईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे माध्यमांशी बोलताना दिली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.