आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुप्रसिद्ध वृत्तनिवदेक प्रदीप भिडे यांचे निधन:दूरदर्शनचा चेहरा झालेला जादूभरा, धीरगंभीर आवाज हरपला!

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नमस्कार, संध्याकाळचे सात वाजतायत. मी प्रदीप भिडे. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर...अशी शब्दफेक आपल्या दमदार आवाजात करून महाराष्टाच्या मनामनात दूरदर्शनच्या काळापासून घर निर्माण करणारे सुप्रसिद्ध वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचे आज वयाच्या 65 व्या वर्षी मुंबईत प्रदीर्घ आजाराने निधन झाले. वृत्तनिवेदनाच्या क्षेत्रात टीव्ही मीडियात त्यांनी आपली अमीट मुद्रा उमटवली.

दिग्गजांची मांदियाळी

दूरदर्शनचा चेहरा अशी ओळख असलेले जेष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचे प्रदीर्घ आजाराने मुंबईत निधन झाले, अशी माहिती सह्याद्री वाहिनीने त्यांच्या ट्वीटर हॅंडलवरुन अधिकृतरित्या दिली आहे. प्रदीप भिडे यांनी आपल्या बहारदार आवाजाने वृत्तनिवेदन क्षेत्रात 40 वर्षे अधिराज्य केले. मुंबई दूरदर्शन केंद्राची सुरुवात 2 ऑक्टोबर 1972 रोजी झाली. प्रदीप भिडे एप्रिल 1974 पासून दूरदर्शनमधे दाखल झाले. त्यावेळी भक्ती बर्वे-इनामदार, ज्योत्स्ना किरपेकर, स्मिता पाटील-बब्बर हे सारे प्रदीप भिडे यांचे समकालीन तसेच सम-व्यावसायिक सहकारी होते.

21 व्या वर्षी सुरुवात...

वयाच्या 21 व्या वर्षी भिडे यांनी बातम्या द्यायला सुरुवात केली होती. दूरदर्शनच्या वृत्तविभागामधे अनुवादक म्हणून त्यांनी काम सुरू केले. सुरुवातीपासूनच मराठी वाड्.मय, नाटके, कादंब-या, एकांकिका या विषयांमधे त्यांना विशेष रूची होती. प्रसार माध्यमात करिअर सुरू करावे असा पहिल्यापासूनच त्यांचा मानस होता.

दुःखद प्रसंग झेलले

बातम्या देण्याच्या अनुभवामधे नेमक्या धक्कादायक, दु:खद किंवा चित्तथरारक बातम्या देण्याचा प्रसंग भिडे यांच्यावर अनेक वेळा आला. भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्त्या, ख्यातनाम पार्श्वगायक महमद रफी यांचे निधन, मुंबईचा भीषण बॉम्बस्फोट, अशा घटनांची बातमीपत्रे भिडे यांनीच वाचली होती.

असशील तसा निघून ये!

21 मे 1991 भारतात श्रीपेरूंबदूर येथे ‘राजीव’जींची हत्त्या झाली. वृत्त संपादिका विजया जोशी यांनी भिडे यांना ‘असशील तसा त्वरीत निघून ये’, म्हणून सांगितले. ही बातमी मुंबईत वाऱ्यासारखी पसरली. मुंबई बंद, सर्वत्र स्मशान शांतता, पोलिसांच्या जीपने भिडे दूरदर्शन केंद्रावर आले. सकाळी साडेसहा वाजता त्यांनी बातमी वाचली. तटस्थपणे बातमी वाचताना देखील अगदी नकळतपणे तिला एक कारुण्याची झालर होती.

काळीज चिरणारा आवाज...

मुंबई बाॅम्बस्फोटाची बातमी वाचल्यानंतर 'आपला आवाज आमचं काळीज चिरत गेला’, अशा प्रतिक्रिया भिडे यांना लगेचच मिळाल्या. 1993 चा बॉम्बस्फोट झाल्यावर त्या दिवशी साडेसात वाजता बातम्या देण्याची जबाबदारी भिडे यांची होती. प्रसंगाचं गांभीर्य ओळखून ते दुपारी दीड वाजताच निघाले. रेल्वेने, पायी असा प्रवास (अंधेरी ते वरळी) त्यांनी केला व सायंकाळी 5 वाजता पोहोचले. बातमी परिणामकारक रित्या सादर केली. त्याही परिस्थितीमधे लोकांनी त्यांच्या अचूक वृत्तनिवेदनाला दाद दिली.

नाटकातही केले काम

प्रदीप भिडे यांना नाटकाची देखील पार्श्वभूमी आहे. रत्नाकर मतकरी यांच्या संस्थेत त्यांनी काही काळ प्रायोगिक नाटकांमध्येही काम केले होते. स्वत:च्या आवाजावर त्यांनी आर्थिक प्राप्ती करण्याच्या निर्णय घेतला आणि खरा ठरवला. भिडे यांनी आतापर्यंत पाच हजारांहून अधिक जाहिराती , माहितीपट आणि लघुपट यांना आवाज दिला असून दोन हजारांहून अधिक कार्यक्रमांचं सूत्रसंचालन आणि निवेदन केले आहे. 'प्रदीप भिडे कम्युनिकेशन' या नावाने ध्वनिमुद्रण स्टुडिओ निर्मिती संस्था सुरू केली. पुढे त्यांनी या क्षेत्रात जम बसवला आणि स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण करून जाहिराती माहितीपट आणि लघुपट यावर आपला आवाज ठसविला.

बातम्या आणखी आहेत...