आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पश्चिम बंगाल:प्रथमच स्थानिक की उपरा, तुष्टीकरणाच्या मुद्द्यांमुळे “बंगाली प्राइड’ला बसला धक्का

13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • यंदा या राज्यात राजकीय रंग बदलले, जात-धर्माचे मुद्दे वरचढ

पश्चिम बंगालने स्वातंत्र्यानंतर राजकारणाचे अनेक रंग पाहिले. राजकीय विचारधारांचा रक्तरंजित संघर्ष पाहिला. भ्रष्टाचार व उद्योगांविरोधातील आंदोलन पाहिले. या सर्व मुद्द्यांमध्ये कधीही ‘बंगाली प्राइड’ला धक्का बसला नव्हता. बंगाली प्राइड म्हणजे जात-धर्म आणि राज्याच्या सीमेपलीकडे प्रबुद्धता आणि सांस्कृतिक समृद्धता हे सूत्र राहिले. शहरेच नव्हे, खेड्यांमध्येही दिसणाऱ्या या भावनेत ना बाहेरचा-स्थानिक भेद होता, ना हिंदू-मुस्लिम होते. मात्र, या निवडणुकीत बंगाली प्राइडला धक्का बसला आहे.

विचारवंतांचे म्हणणे आहे की, भाजप व तृणमूलच्या लढाईत बंगाली संस्कृतीचे नुकसान झाले आहे. ममता बॅनर्जींनी भाजपला लक्ष्य करण्यासाठी बाहेरून आलेल्यांचा मुद्दा उपस्थित केला. नंतर स्पष्टीकरण दिले की, बाहेरचे म्हणजे भाजपची गर्दी असा अर्थ आहे. या मुद्द्यामुळे बंगाली व गैरबंगालींमध्ये सुप्त दरी निर्माण झाली आहे. भाजपने वारंवार मुस्लिम तुष्टीकरणाचा मुद्दा उपस्थित केल्याने राज्यातील मध्यमवर्गीय व निम्न मध्यमवर्गीय बंगालींच्या मनात प्रश्न निर्माण झाला की, त्यांच्या रोजगारावरील संकटाचे कारण तृणमूलचे मुस्लिम प्रेम तर नाही? एसबीआयचे माजी अधिकारी सिद्धार्थ गुहा म्हणतात, पहिल्यांदाच लोकांमध्ये हिंदू-मुस्लिमांना वेगवेगळे बघण्याची भावना निर्माण झाली. केंद्रीय दलांमुळे प्रबुद्ध वर्गही मतदान करत आहे, हा एक सकारात्मक बदल झाला. हिंदू-मुस्लिम मुद्द्यावर विधाननगरचे निवृत्त अभियंते पार्थ मजूमदार यांचेही हेच मत आहे. या वेळी जातीय सलोख्याला धक्का बसला आहे.

तुष्टीकरणामुळे एका गटात नाराजी, उघडपणे व्यक्त होताहेत भावना
सिलिगुडीतील बापी दास सांगतात की, मुस्लिम तुष्टीकरणामुळे एक गट नाराज आहे. आधी असे नव्हते. काही दिवसांतील बांगलादेशी मुस्लिमांच्या कारवायांमुळे लोकांमध्ये भीती आहे. कोलकात्याचे चालक कैलाश यादव सांगतात, बांगलादेशी मुस्लिमांची वाढती संख्या आणि त्यांच्या प्रभावामुळे आमच्यासारख्या लोकांसमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण होत आहे.

बातम्या आणखी आहेत...