आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • West Bengal School Hijab Row, Rapid Action Force Deployed In Howrah, Clashes Between Two Student Groups

कर्नाटकपाठोपाठ पश्चिम बंगालमध्ये हिजाबवरून वाद:विद्यार्थी गटांमध्ये जोरदार हाणामारी, रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स तैनात

हावडा8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पश्चिम बंगालमधील हावडा येथील सरकारी शाळेत हिजाब आणि भगव्या स्कार्फवरून दोन विद्यार्थी गटांमध्ये हाणामारी झाली. हा वाद इतका वाढला की, सध्या सुरू असलेल्या शालेय परीक्षा रद्द कराव्या लागल्या. हावडाच्‍या धुलागडमध्‍ये तणाव निर्माण झाल्यानंतर रॅपिड अॅक्‍शन फोर्स तैनात करण्‍यात आले आहे.

याआधी जानेवारी महिन्यात कर्नाटकात हिजाबचा वाद सुरू झाला होता. येथे उडुपीमध्ये 6 मुस्लिम विद्यार्थिनींना हिजाब परिधान केल्यामुळे महाविद्यालयातील वर्गात बसण्यापासून रोखण्यात आले. कॉलेज व्यवस्थापनाने यामागे नवीन गणवेश धोरणाचे कारण सांगितले.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मंगळवारी काही विद्यार्थिनी हिजाब परिधान करून परीक्षेला बसल्या होत्या. त्यानंतर इतर विद्यार्थ्यांच्या एका गटाने त्यावर आक्षेप घेतला आणि परीक्षेदरम्यान ते परिधान करू नका असे सांगितले. यानंतर काही हिंदू विद्यार्थ्यांनी भगवान शंकराचे चित्र असलेले टी-शर्ट घालून आणि भगवे स्कार्फ घालून विरोध सुरू केला.

इतर गटातील मुलींना ज्याप्रमाणे हिजाब घालण्याची परवानगी आहे त्याप्रमाणे त्यांना भगवा स्कार्फ घालून आत प्रवेश द्यावा, अशी हिंदू विद्यार्थ्यांची मागणी होती. याला एका मुस्लिम मुलीने विरोध केला आणि तो शाळेच्या गणवेशाचा भाग नसल्याचं सांगितलं, त्यामुळे तिने हिजाब का घातला आहे, असा सवाल या मुलांनी केला. यानंतर दोन्ही बाजूंच्या मुला-मुलींमध्ये वादावादी आणि मारामारी सुरू झाली.

शाळा व्यवस्थापनाच्या सूचना - गणवेशातच शाळेत यावे लागेल

प्रकरण इतके वाढले की विद्यार्थ्यांनी शाळेची तोडफोड सुरू केली. शिक्षकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही ढकलून देण्यात आले. त्यानंतर परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या. वृत्तानुसार, 11वीच्या एका विद्यार्थ्याने सांगितले की, परिस्थिती अशी झाली आहे की शाळा व्यवस्थापनाने प्री-बोर्डसह सर्व परीक्षा रद्द करणे अपेक्षित आहे.

या घटनेनंतर शाळा व्यवस्थापनाने बैठक घेतली. ज्यामध्ये विद्यार्थ्यांना आता शालेय गणवेशातच शाळेत यावे लागेल, असा निर्णय घेण्यात आला.

बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये हिजाबवरून वाद

यापूर्वी पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातील एका हायस्कूलच्या विद्यार्थ्याला हिजाब आणि बुरखा घालून येण्यास शिक्षकाने परवानगी नाकारली होती. ही बाब मुलीच्या कुटुंबीयांना आणि स्थानिकांना कळताच त्यांनी शाळेची तोडफोड केली. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस पोहोचले आणि बऱ्याच प्रयत्नानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.

बातम्या आणखी आहेत...