आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • What Is The Penalty For Breach Of Bail? Find Out How Serious The Case Is,latest News And Update

राणा दाम्पत्य पुन्हा अडचणीत:जामिनाच्या अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी राणा दाम्पत्य पुन्हा गजाआड होईल का? जाणून घ्या किती गंभीर आहे प्रकरण

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व त्यांचे आमदार पती रवी राणा यांनी न्यायालयाने जामिनासाठी घालून दिलेल्या अटींचे कथितपणे उल्लंघन केले आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी आक्षेप नोंदवल्यांतर सत्र न्यायालयाने त्यांना नोटीस बजावून "तुमचा जामीन रद्द का करु नये?" अशी विचारणा केली आहे. यामुळे हनुमान चालिसाच्या मुद्यावरुन चर्चेत आलेले हे दाम्पत्य पुन्हा एकदा गजाआड होण्याची शक्यता वाढली आहे.

'दिव्य मराठी'ने याविषयी कायदेतज्ज्ञांशी चर्चा केली असता त्यांनीही राणा दाम्पत्य पुन्हा गजाआड होण्याची शक्यता व्यक्त केली.

राणा दाम्पत्याने गत 23 एप्रिल रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या "मातोश्री" निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणा केली होती. पण, तत्पूर्वीच मुंबई पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्यानंतर तब्बल 12 दिवसांनी म्हणजे 4 मे रोजी मुंबई सत्र न्यायालयाने या लोकप्रतिनिधी पती-पत्नीला सशर्त जामीन मंजूर केला होता. पण, यासाठी कोर्टाने त्यांच्यापुढे 'चौकशीत सहकार्य करणे', 'वादग्रस्त विधाने करण्यापासून स्वतःला दूर ठेवावे', 'पुराव्यांशी छेडछाड करु नये' व 'या संपूर्ण प्रकरणावर पत्रकार परिषद घेणार नाही' या 4 प्रमुख अटी ठेवल्या होत्या. त्यानंतर 5 मे रोजी हे दाम्पत्य तुरुंगातून बाहेर आले होते.

मुंबई पोलिसांनी एका अर्जाद्वारे रवी व नवनीत राणा यांच्या विधानांमुळे जामिनाच्या अटींचे उल्लंघन झाल्याचा दावा न्यायालयात केला आहे. सरकारी वकील प्रदीप घरत यांनीही असा दावा केला आहे. ही बाब त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली आहे. त्यानंतर न्यायालयाने राणा दाम्पत्याला नोटीस बजावून तुमचा जामीन रद्द का करु नये? अशी विचारणा केली आहे. यामुळे बचाव पक्षाचे चांगलेच धाबे दणाणलेत.

न्यायालय यावर केव्हा सुनावणी घेईल हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण, सद्यस्थिती पाहता राणा दाम्पत्याच्या अडचणींत चांगलीच वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

'दिव्य मराठी'ने याविषयी विधिज्ञ श्रीकृष्ण सोळंके यांच्याशी संवाद साधला असता त्यांनीही राणांचा जामीन रद्द होण्याची शक्यता व्यक्त केली. सोळंके म्हणाले -"राणा दाम्पत्याने जामिनाच्या अटींचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले तर कोर्ट पोलिसांना त्यांना पुन्हा ताब्यात घेण्याचे आदेश देईल. असे झाले तर त्यांना जामिनासाठी वरच्या कोर्टात जावे लागेल. तिथे पुन्हा या प्रकरणी विस्तृत युक्तिवाद होऊन आरोपींना जामीन द्यावा किंवा नाही यावर निर्णय होईल."

अतिरिक्त कलम लागणार काय?

"या प्रकरणात राणांवर कोणतेही अतिरिक्त कलम लागणार नाही. न्यायालय केवळ त्यांचा जामीन रद्द करावयाचा की नाही याचा निर्णय घेईल. आरोपींनी सशर्त जामिनाच्या अटींचे उल्लंघन केल्याची कोर्टाची खात्री पटली तर न्यायालय आपला यापूर्वीचा निर्णय मागे घेऊन आरोपींचा जामीन रद्द करेल. याउपर कोणतीही नवी कारवाई त्यांच्यावर होणार नाही," असेही सोळंके यावेळी म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, "न्यायालयाने सर्व गोष्टींवर विचार करून राणा दाम्पत्याला जामीन मंजूर केला होता. त्यामुळे आता त्यांनी जामिनाच्या अटींचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले तर त्यांना पुन्हा तुरुंगात डांबण्यात येईल. हे अवमाननेचे नव्हे तर जामिनाच्या अटींचे उल्लंघन आहे. असल्याचेही सोळंके यांनी यावेळी स्पष्ट केले.

काय म्हणाल्या होत्या राणा

तुरुंगातून सुटका झाल्यानंतर नवनीत राणा यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथून बाहेर पडल्यानंतर त्यांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली होती. "हनुमान चालिसा वाचणे गुन्हा असेल तर मी 14 दिवस नव्हे तर 14 वर्षे शिक्षा भोगण्यास तयार आहे. हनुमान चालिसा म्हणणे गुन्हा आहे काय? महाविकास आघाडी सरकारने मला कोणत्या गुन्ह्याची शिक्षा दिली," असे त्या पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या होत्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी माझ्याविरोधात निवडणूक लढवून दाखवावी, असे खुले आव्हानही त्यांनी या प्रकरणी दिले होते.

बातम्या आणखी आहेत...