आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहशतवाद्याची तरुणांना साद:आम्ही दहशतवादी होऊन मरत असताना फुटीरवादी काश्मिरात हॉटेल बांधत होते!

श्रीनगर / मुदस्सीर कुल्लू24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

फुटीरतावाद्यांच्या जाळ्यात अडकून १६ वर्षीय काश्मिरी तरुणाने शिक्षण सोडून बंदूक हाती घेतली. १९८९ मध्ये पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन शस्त्रांचे प्रशिक्षण घेतले.प्रशिक्षणादरम्यान त्याचे ब्रेनवॉश करण्यात आले. तो दहशतवादी बनला. काश्मीरमध्ये तैनात भारतीय सैन्यावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांच्या समूहात सहभागी झाला. त्याचे नाव होते मोहंमद फारुख खान ऊर्फ शैफुल्ला फारुख.

दैनिक भास्करशी बोलताना फारुख म्हणाला, काश्मीर गुलाम असल्याचे मला भासवण्यात आले. आपण काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी लढत आहोत, असे सांगण्यात आले. मात्र मी पाहिले की, दहशतवादी सर्वसामान्य काश्मिरींनाही मारत आहेत आणि फुटीरतावादी नेते मात्र हॉटेल उभारत आहेत. त्यांना बाहेरून पैसे मिळत होते. ते आपल्या फायद्यासाठी खोऱ्यात दहशत पसरवत होते. माझ्या शेजारी राहणाऱ्या अनेक तरुणांना दहशतवादाच्या प्रशिक्षणासाठी नेण्यात आले. मी सर्वात आधी श्रीनगरमध्ये जेकेएलएफ म्हणजे जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटच्या दहशतवाद्यांच्या संपर्कात आलो. मला काही अन्य मुलांसह पीओकेला पाठवण्यात आले. सर्वांना बसने लोलाबला नेण्यात आले. तेथून सैन्याला हुलकावणी देऊन आम्ही डोंगर रांगांत गेलो.

त्यानंतर प्रशिक्षण शिबिरात पोहोचलो. तेथे काही पाकिस्तानी तरुणही दहशतवादाचे प्रशिक्षण घेत होते. प्रशिक्षण देणाऱ्यांमध्ये पाकिस्तानी सैन्यातील अधिकारीही होते आणि दहशतवादीही.फारुख सांगतो की, आम्हाला अनेक प्रकारची शस्त्रे हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. एके-४७ सारख्या बंदुकासुद्धा. ग्रेनेड फेकणेही शिकवण्यात आले. मार्शल आर्ट््स आणि डोंगरावर चढण्याचे प्रशिक्षणही देण्यात आले. त्यांचा हेतू काश्मीरमध्ये सुधारणा नव्हे तर काश्मीरला भारतापासून वेगळे करणे हा होता.

फारुखला सर्वाधिक दु:ख झाले ते काश्मीर विद्यापीठाचे कुलगुरू मुशिर उल हक यांच्या हत्येचे. त्याने दहशवादाचा मार्ग सोडला. १९९१ मध्ये समर्पण केले. ८ वर्षे तुरुंगवास भोगला. तुरुंगातून सुटल्यानंतर काश्मिरी तरुणांना त्या मार्गावर जाण्यापासून तो रोखत आहे. तो सांगतो, फुटीरवादी नेते आणि पाकिस्तानी दहशतवादी केवळ आपल्या फायद्यासाठी काश्मिरी तरुणांचा वापर करत आहेत. काश्मिरी तरुण त्यांच्या जाळ्यात अडकत आहेत. हा मार्ग फक्त त्यांच्या फायद्याचा असून तो आमच्या मृत्यूकडे जातो.

फारुखने सांगितले की, शिक्षा भोगल्यानंतर कोणीही त्याला स्वीकारायला तयार नव्हते. ना लोक, ना नातेवाईक. सुरक्षा संस्थाही संशयाच्या नजरेने पाहात होत्या. मी एकटाच नव्हतो. इतरही अनेक काश्मिरी तरुणांनी दहशतवादाचा मार्ग सोडला होता. अशा लोकांच्या पुनर्वसनासाठी आम्ही एक संघटना बनवली. अनेक पोलिस अधिकाऱ्यांनी त्याकामी आमची मदत केली. भारत आमची मातृभूमी असल्याचे आम्ही मानतो. आमच्या मुलांच्या भवितव्यासाठी आम्ही सरकारकडे काही योजनांची मागणी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...