आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावर्ष 1985... दक्षिणेचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या कर्नाटकात विधानसभेची निवडणूक झाली. त्यात 4 वेळा आमदार व विधानसभेत दोनदा विरोधी पक्षनेतेपद भूषवणारे एचडी देवेगौडा सथानूर मतदारसंघातून निवडणूक लढवत होते.
काँग्रेसने देवेगौडा यांच्यापुढे अवघ्या 23 वर्षांच्या तरुण मुलाला उभे केले. राजकारणाचा अनुभव नसतानाही या मुलाने देवेगौडा यांना कडवी झुंज दिली. पण त्याचा 15 हजार मतांनी पराभव झाला. या पराभवाने त्या मुलाला पक्षातील बड्या नेत्यांच्या जवळ नेले.
या मुलाचे नाव डीके शिवकुमार होते. हेच डीके शिवकुमार आता काँग्रेसचे नवे ट्रबलशूटर बनलेत. या निवडणुकीत काँग्रेसला कर्नाटकात 135 जागा मिळाल्या. यामागे सर्वात मोठा चेहरा शिवकुमारांचा आहे. 13 मे रोजी निकाल जाहीर झाल्यापासून केवळ त्यांचीच चर्चा सुरू आहे. 'मॅन ऑफ द कर्नाटक' म्हणून ओळखले जाणारे 60 वर्षीय डीके शिवकुमार आता न्यूजमेकर, किंगमेकर बनलेत.
आता डीके शिवकुमार हे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. मात्र, कर्नाटकची धुरा कुणाच्या खांद्यावर सोपवायची हे काँग्रेसने अद्याप स्पष्ट केले नाही.
चला तर मग पाहूया डीके शिवकुमार काँग्रेसमध्ये एवढी मोठे प्रस्थ कसे बनले? पहिली निवडणूक हरलेले डीके शिवकुमार काँग्रेसच्या विजयाचे शिल्पकार कसे ठरले?
हे समजून घेण्यासाठी आपल्याला 80 च्या दशकात इंदिरा गांधींच्या काळात जावे लागेल...
1979 ची गोष्ट आहे. कर्नाटकचे पहिले मुख्यमंत्री देवराज उर्स यांचे इंदिरा गांधींशी मतभेद झाले होते. देवराज यांनी पक्षापासून फारकत घेतली होती. त्यानंतर कर्नाटक युवक काँग्रेसचे बहुतांश कार्यकर्ते देवराज यांच्या गटात गेले. त्यावेळी डीके कॉलेजमध्ये शिकत होते. ते युवक काँग्रेसचे सदस्य होते.
संघटना मोडकळीस येत असल्याचे पाहून काँग्रेसने स्थानिक युनिट विकसित करण्याची सूत्रे डीके शिवकुमार यांच्याकडे सोपवली. डीके विद्यार्थी संघटनेचे सचिव झाले. येथूनच डीके शिवकुमार यांनी काँग्रेसमध्ये स्वतःचे स्थान बळकट करण्यास सुरुवात केली. काँग्रेसने 6 वर्षांनंतर 1985 च्या निवडणुकीत देवेगौडा यांच्यासमोर डीके शिवकुमार यांना उभे केले. डीके व देवेगौडा यांच्यातील राजकीय वैर येथूनच सुरू झाल्याचे मानले जाते.
या निवडणुकीत एचडी देवेगौडा यांनी बंगळुरूच्या होलानरसीपूर व सथानूर या 2 जागांवरून उमेदवारी दाखल केली होती. ते वोक्कलिगा समाजाचे मोठे नेते होते. त्यामुळे त्यांनी दोन्ही जागा जिंकल्या. त्यानंतर त्यांनी सथानूरची जागा सोडली. तिथे पोटनिवडणूक झाली तेव्हा डीके शिवकुमार पुन्हा रिंगणात उतरले व विजयी झाले. येथूनच डीकेंची खरी राजकीय कारकीर्द सुरू होते.
1989 मध्ये पहिली निवडणूक जिंकली, तेव्हापासून अजिंक्य...
1989 मध्ये डीके शिवकुमार सथानूरमधून निवडणूक जिंकले. एस. बंगारप्पा यांच्या सरकारमध्ये मंत्री झाले. तेव्हा त्यांचे वय अवघे 27 वर्षे होते. तेव्हा ते सर्वात तरुण मंत्री ठरले होते. डीके शिवकुमार व देवेगौडा कुटुंबात आणखी एक थेट लढत. 1999 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी माजी पंतप्रधान देवेगौडा यांचे सुपुत्र एचडी कुमारस्वामी यांचा सथानूरमधून पराभव केला.
डीके शिवकुमार यांनी सथानूरमधून 1989, 1994, 1999 व 2004 मध्ये सलग 4 वेळा निवडणूक जिंकली. मार्जिन नेहमीच 40 हजारांपेक्षा जास्त होते. डीके 2008 पासून कनकापुरा येथून निवडणूक लढवत आहेत. ते आजपर्यंत केव्हाही हरले नाहीत. 1990 मध्ये काँग्रेसने डीके यांना तिकीट न दिल्याने त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. यावेळीही त्यांच्यासमोर एचडी देवेगौडा होते. पण शिवकुमार यांनी त्यांचा पराभव केला.
या विजयाने कर्नाटकात एक बडे नेते म्हणून त्यांचे नाव झाले. त्यांच्या राजकीय रणनीतीतील प्रभुत्वाचा पहिला पुरावा 2004 साली दिसून आला. लोकसभा निवडणुका सुरू होत्या, डीके यांनी कनकापुरा लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या अननुभवी नेत्या तेजस्विनी गौडा यांना तिकीट दिले.
उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारी निश्चित करण्यात आली. तेजस्विनींपुढे एचडी देवेगौडा यांचे आव्हान होते. निकाल आला तेव्हा सर्वांनाच धक्का बसला, तेजस्विनी यांनी देवेगौडा यांचा 1 लाखांहून अधिक मतांनी पराभव केला.
या विजयामुळे डीके बंगळुरू ग्रामीण भागातील एक मोठे नेते म्हणून उदयास आले. त्यांची विश्वासार्हता एवढी वाढली की, त्यांचे समर्थक त्यांना "कनकपुराडा बांडे' म्हणजेच कनकपुराचा अभेद्य दगड म्हणू लागले. 2004 मध्ये मुख्यमंत्री एस.एम. कृष्णा यांनी शिवकुमार यांना नगरविकास मंत्री केले. येथूनच शिवकुमार यांचा राजकारण व व्यवसायात मोठे प्रस्थ निर्माण झाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात गेले, विजयानंतर ते दिवस आठवून रडले
13 मे रोजी आलेल्या निकालात काँग्रेसला बहुमत मिळाले. त्यानंतर डीके शिवकुमार मीडियाला सामोरे गेले. त्यांना बोलताना अचानक रडू कोसळले. ते म्हणाले, 'सोनिया गांधी मला भेटण्यासाठी तुरुंगात आल्या. हे मी केव्हाच विसरू शकत नाही. भाजपवाल्यांनी मला तुरुंगात डांबले. मग मी पदावर राहण्याऐवजी तुरुंगात राहणे पसंत केले. मी सोनिया व राहुल यांना कर्नाटक जिंकून देण्याचे वचन दिले होते. आज ते वचन पूर्ण झाले."
डीके शिवकुमार यांनी ज्या वर्षाचा उल्लेख केला ते वर्ष 2019 होते. मनी लाँड्रिंग व करचुकवेगिरी प्रकरणी 4 दिवसांच्या सलग चौकशीनंतर 3 सप्टेंबर 2019 रोजी डीके यांना ईडीने अटक केली. जवळपास 4 महिने ते तुरुंगात राहिले, कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वी ते जामिनावर सुटले.
ईडीने डीकेंना अटक केलेल्या दिवसाचाही एक किस्सा आहे. कर्नाटकच्या लोकांनी त्या दिवशी एका अशा व्यक्तीला रडताना पाहिले होते, ज्याने थेट अमित शहांना आव्हान दिले होते. त्या दिवशी गणेश चतुर्थी होती.
शिवकुमार यांना वडिलांच्या समाधीचे दर्शन घ्यायचे होते. पण ईडीने त्यांना रोखले. त्यानंतर डीके टीव्हीवर आपले अश्रू रोखण्याचा प्रयत्न करताना दिसले. त्यावेळी शिवकुमार यांच्या जवळच्या व्यक्तीने म्हटले होते की, 'हे राजकीय नाटक नव्हते. वोक्कलिगा समाजाच्या नागरिकांसाठी गणेश चतुर्थी अत्यंत महत्त्वाची असते. पण डीके यांना जी वागणूक दिली गेली, त्याचा त्या समुदायावर परिणाम होणे निश्चितच होते.
कर्नाटकातील सर्वात श्रीमंत आमदार, राजकीय व्यवस्थापनातील तज्ञ
निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, डीके यांच्याकडे 1413 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
महाराष्ट्र असो वा गुजरात, डीकेंनी काँग्रेसला अनेकदा अडचणीतून बाहेर काढले. साधारण 2002 सालची गोष्ट आहे. महाराष्ट्रात 30 महिन्यांचे लोकशाही आघाडीचे (DF) सरकार होते. मुख्यमंत्री विलासराव देशमुख होते. अचानक 9 आमदारांनी देशमुख सरकारचा पाठिंबा काढण्याची घोषणा केली.
मुख्यमंत्री देशमुख म्हणाले की, सरकारला 288 आमदारांपैकी 150 आमदारांचा पाठिंबा आहे. त्यात काँग्रेसच्या 74, राष्ट्रवादीच्या 61 आमदारांचा समावेश आहे. डीएफला 12 पैकी 9 अपक्ष आमदारांचाही पाठिंबा आहे. याऊलट विरोधी बाकावरील भाजपकडे 56, तर शिवसेनेकडे 69 आमदार आहेत.
भाजपच्या नेतृत्वातील विरोधी पक्षाने देशमुख सरकारविरोधात अविश्वास ठराव आणला. पण देशमुखांना आपले सरकार वाचवण्यात यश आले. यामागे डीके शिवकुमार होते. महाराष्ट्राच्या राजकारणात ते सक्रिय होते. देशमुख सरकार अडचणीत असताना डीके यांनी डीएफ आमदारांना आठवडाभर बंगळुरू येथील त्यांच्या रिसॉर्टमध्ये ठेवले. त्यामुळे देशमुख सरकार वाचले. विरोधी पक्षांना काँग्रेसची आघाडी फोडता आली नाही.
2017 मध्ये डीकेंनी गुजरातमध्येही मास्टरस्ट्रोक खेळला होता. सोनियांच्या अगदी जवळ असलेल्या अहमद पटेल यांची राज्यसभेची जागा पणाला लागली होती. काँग्रेस पक्षाने कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या व प्रदेशाध्यक्ष जी परमेश्वर यांना बाजूला करून शिवकुमार यांना जबाबदारी दिली. त्यांना गुजरातच्या आमदारांचा पाहुणचार करण्याचे निर्देश दिले.
काँग्रेसला भीती वाटत होती की, भाजप आपल्या आमदारांना फोडेल. डीके यांनी गुजरात काँग्रेसच्या 44 आमदारांना बंगळुरू येथील एका रिसॉर्टमध्ये ठेवले. त्यामुळे अहमद पटेल यांनी निवडणूक जिंकली. त्यांनी विजयाचे श्रेय डीके यांना दिले.
ईडीच्या रडारवर, भ्रष्टाचाराचे 119 गुन्हे
2018 मध्ये डीके शिवकुमार यांच्यावर ईडीची कारवाई सुरू झाली. त्यांच्यावर मनी लाँड्रिंग, करचोरी आदी 19 हून अधिक गुन्हे दाखल झाले. डीके शिवकुमार यांना फोडण्यासाठी भाजपने सर्व शक्ती वापरल्याचा कर्नाटकातील राजकीय तज्ज्ञांचा दावा आहे. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास ते चौकशीतून सुटतील, असे आमिषही त्यांना दाखवण्यात आले. पण डीके काँग्रेसमध्येच राहिले. त्यांचे वडील केम्पेगौडाही काँग्रेसमध्ये होते. ते आमदार होते.
भाजप नेत्याचा नातलग, जावई CCD संस्थापकाचा मुलगा
डीकेची मुलगी ऐश्वर्या शिवकुमार हिचा विवाह अमर्त्य हेगडेशी 2020 मध्ये झाला. अमर्त्य हा कॅफे कॉफी डे अर्थात CCD चे संस्थापक व्हीजी सिद्धार्थ यांचा मुलगा व कर्नाटकचे मजबूत नेते एसएम कृष्णा यांचा नातू आहे. एसएम कृष्णा 40 वर्षांहून अधिक काळ काँग्रेसमध्ये राहिले. केंद्रीय मंत्रिपदाव्यतिरिक्त ते मुख्यमंत्री देखील झाले, परंतु 2017 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
आई-वडिलांनी मुलासाठी महादेवाची प्रार्थना केली, म्हणून नाव शिवकुमार
डीके शिवकुमार यांच्या नावामागेही एक किस्सा आहे. असे म्हटले जाते की, वडील केम्पेगौडा व आई गौरम्मा यांना लग्नाच्या 3 वर्षांनंतरही अपत्य झाले नाही. ते शिवलधप्पा शिवमंदिरात गेले. तिथे त्यांनी मुलासाठी प्रार्थना केली. त्यानंतर त्यांना मुलगा झाला. त्यांनी मुलाचे नाव शिवकुमार ठेवले. त्यांच्या गावाचे नाव दोड्डालहल्ली. वडिलांचे नाव केम्पेगौडा. त्यामुळे शिवकुमार यांचे नाव डोड्डलहल्ली केम्पेगौडा शिवकुमार म्हणजेच डीके शिवकुमार ठेवण्यात आले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.