आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Whose Pressure On Ankita For 'extra Service'? From Which She Was Killed, The Mechanism For The Rescue Of The Arrested?

अंकिता खून प्रकरण:अंकितावर ‘अतिरिक्त सेवे’चा दबाव कुणाचा?', ज्यातून तिची हत्या घडली; आराेपींच्या बचावासाठी यंत्रणा?

मनमीत | डेहराडून8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

१९ वर्षीय अंकिता भंडारीच्या हत्येपासून ते अंत्यसंस्कारापर्यंत असे अनेक मुद्दे आहेत, ज्यातून गंभीर प्रश्न उपस्थित हाेतात. वास्तविक, भाजपचे माजी मंत्री विनोद आर्य यांचा मुलगा पुलकित हत्येनंतर ४ दिवस पोलिसांच्या ताब्यात नव्हता. त्याचा शोधही घेतला गेला नाही. फोटो व्हायरल हाेताच लोक रस्त्यावर उतरले, तेव्हा रोषापासून वाचवण्यासाठी कुटुंबीयांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्याच माहितीवरून अंकिताचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या वेळी भाजपच्या महिला आमदार खूप सक्रिय होत्या. पोलिसांच्या दिरंगाईशी संबंधित असे अनेक मुद्दे आहेत, ज्यांची उत्तरे पोलिस आणि प्रशासनाकडे नाहीत.

पुलकितच्या रिसॉर्टमध्ये रिसेप्शनिस्ट असलेल्या अंकिताच्या हत्येचा तपास एसआयटी करत आहे. त्याला अंकिताला वेश्याव्यवसायात ढकलायचे होते. अंकिताने विरोध केला असता त्याने तिची हत्या केली.

५ प्रश्न? ज्यांची उत्तरे पोलिस प्रशासन देत नसल्यामुळे प्रकरण बनले जास्त संशयास्पद

प्रश्न-१... ज्या व्हीआयपीला खुश करण्यास सांगितले होते त्याचे नाव अद्याप तपासात का नाही?

अंकिताने तिच्या मैत्रिणीशी व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये सांगितले होते की एक व्हीआयपी पाहुणे येणार आहेत. रिसॉर्टचे मालक पुलकित आर्य हे दबाव टाकत आहेत की तिला प्रमाेशन हवे असेल तर त्या पाहुण्याला ‘अतिरिक्त सेवा’ द्यावी लागेल. १० हजार रुपये मिळतील. अंकिताने नकार दिला. यावरून पुलकित व अंकिता यांच्यात भांडण झाले होते. यादरम्यान तिला कालव्यात ढकलून मारण्यात आले. पण, ताे व्हीआयपी पाहुणा कोण, हे समोर आलेले नाही.

प्रश्न-२... जी रूम व्हीआयपीसाठी आरक्षित हाेती त्यातच सर्वात आधी आग कशी लागली?

रिसॉर्टच्या बाहेर लोक निदर्शने करत असताना भाजप आमदार रेणू बिश्तही तिथे होत्या. जाळपोळ कुणी सुरू केली होती, याची माहिती नाही. पण, आधी आग त्याच खोलीत लागली जी व्हीआयपी पाहुण्यांसाठी आरक्षित केली होती. तो तिथे आला आणि राहिला की नाही, याची कोणतीही ठोस नोंद नाही. महत्त्वाची बाब म्हणजे फॉरेन्सिक टीम सोमवारी (२६ सप्टेंबर) तपासासाठी या जागी पोहोचली, तर शनिवारीच ती जळून राख झाली होती.

प्रश्न-३... जखमा असूनही पाच दिवस पाण्यात शरीर फुगले नाही, माशांनी नुकसानही झाले नाही?

ही हत्या १९ सप्टेंबर रोजी झाली. २४ सप्टेंबर रोजी मृतदेह सापडला होता. वाहत्या कालव्यात मृतदेह एकाच ठिकाणी ५ दिवस कसा पडून राहिला? एकाच जागी राहूनही ते कुणाच्या लक्षात का आले नाही? ५ दिवस मृतदेह का फुगला नाही? अनेकदा असे घडते. विच्छेदन अहवालानुसार, अंकिताच्या शरीरावर जखमा होत्या, रक्त वाहिले होते, एक दातही तुटला होता. मग ५ दिवस माशांनी शवाचे नुकसान का केले नाही? हे तज्ज्ञांनाही कळलेले नाही. (म्हणजे हत्येच्या वेळेबाबतही संभ्रम आहे.)

प्रश्न-४... मृतदेह ठेवलेल्या शवागारात कुटुंबीयांपूर्वी पाेहाेचलेल्या आमदार रेणू काय करत होत्या?

भाजप आमदार रेणू बिश्त कुटुंबांच्या आधी शवागारात पोहोचल्या. २४ सप्टेंबर रोजी मृतदेह बाहेर काढण्यात आला. तेव्हा अंकिताचे वडील आणि भाऊ कालव्यावर गेले. मात्र, त्यांना मृतदेह पाहण्याची परवानगी नव्हती. ताे ऋषिकेश एम्सच्या शवागारात ठेवलेला होता. काही वेळाने कुटुंबीय शवागारात पोहोचले तेव्हा आमदार रेणू बिश्त तिथे आधीच हजर होत्या. लोकांनी विरोध केल्यावर त्यांना तेथून जावे लागले.

प्रश्न-५... बुलडोझर चालला तरी प्रशासन गप्प, प्रश्न उपस्थित हाेताच डीसी म्हणाले-आम्ही आदेश दिले नव्हतेे

रिसॉर्टवर बुलडोझर चालला. काही भिंती पाडल्या, पण इमारतीची रचना सुरक्षित राहिली. ही घटना घडली तेव्हा भाजप आमदार रेणू बिश्त तिथे होत्या. २४ तासांनंतर अंकिताच्या कुटुंबीयांनी पुरावा नष्ट करण्यासाठी बुलडोझरचा वापर केल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर डीसी आणि एसडीएम यांनी बुलडोझर चालवण्याचे आदेश दिले नसल्याचे सांगितले. आता बुलडोझर कोणी चालविण्यास सांगितले, याचाही तपास सुरू आहे.