आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताच्या विजयावर जागतिक मीडियाचे गौरवोद्गार:शिव्या, वर्णद्वेषी शेरेबाजी सहन करूनही ऑस्ट्रेलियाचे गर्वहरण केले

नवी दिल्ली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ऑस्ट्रेलियन माध्यमे म्हणाली, ऋषभ पंतने आमचा बालेकिल्ला भुईसपाट केला

ब्रिस्बेन कसोटीत ऑस्ट्रेलियाला धूळ चारून मालिका २-१ ने जिंकताच जागतिक माध्यमांनी भारताच्या यंग ब्रिगेडवर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला आहे. मालिकेआधी टीम इंडियाची खिल्ली उडवणाऱ्या ऑस्ट्रेलियन मीडियानेही यू टर्न घेत भारताच्या प्रत्येक खेळाडूचे कौतुक केले. या कसोटी मालिकेला ऑस्ट्रेलियाच्या टीव्ही इतिहासातील सर्वाधिक प्रेक्षकसंख्या लाभली. शेवटच्या कसोटीतील चुरशीचे क्षण ४ लाख ७ हजार प्रेक्षकांनी अनुभवले.

अमेरिकेसह जगातील अनेक देशांनी भारतीय विजय व संघाला शाबासकी दिली. ‘सिडनी मॉर्निंग हेराॅल्ड’ने ‘थँक्यू अँड गुड नाइट, इंडिया’ मथळा देत प्रत्येक खेळाडूला विजयाचा शिल्पकार संबाेधले. अश्विनवरील वादग्रस्त टिप्पणीबद्दल ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेनवर टीका करत लिहिले की, ‘पंतच्या खेळीने ऑस्ट्रेलियाचा गाबातील ३३ वर्षांचा अभेद्य किल्ला भुईसपाट केला. सिडनी कसोटीत पेनच्या स्लेजिंगनंतर मंगळवारी ऋषभ पंतने बेन स्टोक्सप्रमाणे प्रत्युत्तर दिले.’ न्यूयॉर्क टाइम्सने लिहिले की, ‘ऑस्ट्रेलियात प्रेक्षकांच्या शिव्या, वर्णद्वेषी शेरेबाजी सहन करूनही टीम इंडियाने कांगारूंना त्यांच्याच देशात धूळ चारून त्यांचे गर्वहरण केले.’ पाकिस्तानच्या ‘द डॉन’ने लिहिले, ‘क्रिकेट इतिहासातील या सामन्याने महानतेचे निकष पूर्ण केले.’ ब्रिटिश वृत्तपत्र ‘डेली टेलिग्राफ’ने लिहिले, ‘ही ऑस्ट्रेलियाची आजवरची सर्वात गचाळ कामगिरी आहे.’

ऑस्ट्रेलिया बोर्ड : या मालिकेची चर्चा आगामी पिढ्यांतही होत राहणार

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बुधवारी बीसीसीआयला पत्र लिहून कसोटी मालिकेतील ऐतिहासिक विजयात भारतीय खेळाडूंचे शौर्य, निर्धार व नैपुण्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे.तसेच ही मालिका सुव्यवस्थितपणे संचालित करण्यासाठी भारतीय क्रिकेट बोर्डाचेही आभार व्यक्त केले आहेत. या मालिकेची चर्चा आगामी पिढ्यांतही होत राहील, असेही ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...