आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजंतर-मंतर येथे बुधवारी रात्री दिल्ली पोलिसांच्या हल्ल्यामुळे दु:खी मल्लांनी आपली पदके-पुरस्कार परत करण्याचा इशारा दिला. ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता बजरंग पुनिया गुरुवारी म्हणाला, ‘मल्लांना अशा प्रकारची वागणूक दिली जात असेल तर आम्ही या पदकांचे काय करायचे?’ धरणे देणाऱ्यांपैकी विनेश फोगट, साक्षी मलिक व बजरंग पुनिया सर्वोच्च क्रीडा पुरस्कार खेलरत्न विजेते आहेत. साक्षी (२०१७) व बजरंगला (२०१९) चौथा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मश्रीने सन्मानित केले आहे. दरम्यान, मल्लांच्या समर्थनात पंजाब, हरियाणा, यूपीतून शेतकरी दिल्लीत आल्याच्या वृत्तानंतर पोलिसांनी सीमेवर गस्त वाढवली. हरियाणाहून आलेल्या २४ शेतकऱ्यांना सिंघू सीमेवर ताब्यात घेतले.
बळजबरी केली नाही, ५ जवान जखमी : पोलिस
पोलिस नशेत नव्हते. आपचे नेते सोमनाथ भारती परवानगी नसलेले फोल्डिंग बेड घेऊन आले. पोलिसांनी थांबवले असता मल्लांनी हस्तक्षेप केला. यात ५ जवान जखमी झाले. पैकी दोन महिला पोलिस आहेत. - प्रणव तायल (डीसीपी)
१०० जवानांसह एसीपींचा हल्ला : आंदोलक मल्ल
३ मे रोजीच्या रात्री दिल्लीच्या एसीपीने १०० जवानांसह जंतर-मंतर येथे आंदोलकांवर हल्ला केला. नशेतील पोलिसांनी मारहाण केली. अनेक मल्ल जखमी झाले. जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा. (गृहमंत्री अमित शाह यांना पाठवलेल्या पत्रामधून)
अयोध्येला आलेले कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह म्हणाले, ‘क्षमा बड़न को चाहिए, छोटन को उत्पात.’ राजीनाम्याची मागणी फेटाळत ते म्हणाले, न्यायालयावर विश्वास आहे.
मल्लांना मारहाणीवरून अनेक राजकीय पक्षही पुढे आले आहेत. राहुल गांधी, ममता बॅनर्जी, एम. के. स्टॅलिन, अरविंद केजरीवाल यांनी याचा निषेध केला. काँग्रेसने कोर्टाच्या देखरेखीत तपासाची मागणी केली.
सुनावणीचे ठळख मुद्दे : सुप्रीम कोर्टाने केस बंद केली, म्हणाले, गुन्हा दाखल आहे
याचिकाकर्ता : ओळख लपवायचीय, पण आरोपी नाव घेतोय
एसजी : महिला मल्ल तर टीव्हीवर मुलाखतही देत आहेत
सात महिलांनी केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपावरून भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंहांविरुद्ध दाखल याचिकेचा सुप्रीम कोर्टाने निपटारा केला आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे पीठ म्हणाले, गुन्हा दाखल होताच याचिकेचा उद्देश पूर्ण झाला आहे. याचिकाकर्त्यांना इतर काही त्रास असेल तर ते न्यायदंडाधिकारी व दिल्ली हायकोर्टात जाऊ शकतात.
नरेंद्र हुडा (याचिकाकर्त्यांचे वकील) : टीव्हीवर आरोपी म्हणाला की, आतापर्यंत पोलिसांनी संपर्क केला नाही. कोर्ट म्हणाले होते, तक्रारकर्त्यांची नावे सार्वजनिक केली जाणार नाहीत. मात्र, आरोपी टीव्हीवर त्यांची नावे घेत आहे.
सॉलिसिटर जनरल (एसजी) तुषार मेहता (दिल्ली पोलिसांच्या बाजूने) : तक्रारकर्ते स्वत: टीव्हीवर सातत्याने मुलाखती देत आहेत.
हरीश साळवे (बृजभूषण सिंह यांचे वकील) : माझ्या क्लायंटला पक्षकार बनवण्यात आले नाही.
हुडा : आतापर्यंत महिला मल्लांचे जबाब का नोंदवण्यात आले नाही?
मेहता : कधी जबाब घ्यायचे, हे पोलिसांचे काम आहे.
सरन्यायाधीश : आतापर्यंत कुणाची चौकशी केली आहे?
मेहता : मी खुल्या कोर्टात कुणाचे नाव घेऊ इच्छित नाही. तथापि, उद्या २ लोकांची चौकशी केली जाईल. कोर्टात याचिका घेऊन येणे आणि पोलिसांनी हे करायला हवे, असे म्हणणे योग्य नाही.
सरन्यायाधीश : तपास योग्य पद्धतीने व्हावा, याच मुद्द्यावरून आम्ही चिंतीत आहोत.
हुडा : २१ एप्रिलला तक्रारकर्ती पोलिस ठाण्यात गेली होती. पोलिसांनी तक्रार घेण्यास ३ लास लावले. तक्रारीची पोहोच देण्यासाठीही ३ तास घेतले. मग आम्ही कोर्टात जाऊन गुन्हा दाखल करण्यास सांगू, असे म्हटल्यानंतर पुढच्या दिवशी अल्पवयीन मुलीची ३ तास चौकशी करण्यात आली. आरोपीबाबत बोलायचे झाल्यास तो टीव्हीवर स्टार बनला आहे. मुलाखती देत आहे. महिला मल्ल व आखाड्यांची नावे घेत आहे.
सुप्रीम कोर्टाच्या भूमिकेवर मल्ल म्हणाले, आम्ही कोर्टाचा आदर करतो. धरणे आंदोलन सुरूच राहील.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.