आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआगामी कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. मंगळवारी जाहीर केलेल्या यादीत १८९ उमेदवारांचा समावेश आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई पारंपरिक शिगॉन मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. भाजपचे कर्नाटक प्रभारी अरुण सिंग यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, राज्यात १० मे रोजी विधानसभेसाठी निवडणूक होणार आहे. त्यासाठी पक्षाने जाहीर केलेल्या उमेदवारांत ५२ नवीन चेहरे आहेत. पहिल्या यादीत आठ महिलांना तिकीट देण्यात आले. त्यापैकी ३२ आेबीसी, ३० अनुसूचित जाती, १६ अनुसूचित जमातीमधील उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. या उमेदवारांमध्ये ९ डॉक्टर, पाच वकील, एक निवृत्त आयएएस, तीन निवृत्त सरकारी कर्मचारी आहेत. आठ सामाजिक कार्यकर्ते आहेत.
कर्नाटकमध्ये अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख २० एप्रिल आहे. भाजप दक्षिणेतील या राज्यातील सत्ता कायम ठेवण्यासाठी तयारीला लागले आहे. पक्षाचे कर्नाटक निवडणूक प्रभारी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पत्रकार परिषदेत पक्षाची भूमिका मांडली. ते म्हणाले, पक्षाने आगामी विधानसभेत नवीन नेतृत्वाला वाव देण्यासाठी नवीन पिढीला संधी दिली आहे. भाजपचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांचे पुत्र बी. वाय. विजयेंद्र वडिलांच्या शिकारीपुरा मतदारसंघातून नशीब आजमावतील. भाजपचे सरचिटणीस सी. टी. रवी चिकमंगळूर जागेवरून लढतील. माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांचे तिकिट कापण्यात आले आहे. त्यांची नाराजी दूर केली जाईल. त्यांना उद्या दिल्लीला बोलवण्यात आले आहे, असे सूत्रांनी सांगितले. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सीटी रवी यांना त्यांच्या चिकमंगळूर मतदारसंघातून तिकीट दिले आहे. जेडीएस ९३, तर काँग्रेसने १६६ उमेदवार जाहीर केले
निवडणूक २५ हजारांनी जिंकतो, निर्णय सन्मानजनक नाही :शेट्टार माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर म्हणाले, पक्षाने मला तिकिट न देण्याचा निर्णय घेतला आहे. तो मला मान्य नाही. मी सगळ्या निवडणुकीत २५ हजारांहून जास्त मतांनी विजय मिळवला. त्यामुळे पक्षश्रेष्ठींंना निर्णयावर फेरविचार करण्याची विनंती केली आहे, असे हुबळी-धारवाडचे विद्यमान आमदार शेट्टर (६७) यांनी म्हटले आहे.
जेडीएसने ९३, काँग्रेसने आतापर्यंत जाहीर केले १६६ उमेदवार राज्यातील मुख्य विरोधी पक्ष काँग्रेस आणि जेडीएसनेही उमेदवारांची घोषणा केली आहे. जेडीएसने सर्वात आधी १९ डिसेंबरला ९३ उमेदवारांची घोषणा केली होती. त्यानंतर काँग्रेसने दोन टप्प्यांत १६६ उमेदवारांची घोषणा केली. २४ मार्चला त्यांच्या पहिल्या यादीत १२४ उमेदवार होते. यानंतर दुसरी यादी ६ एप्रिल रोजी आली. तेव्हा ४२ उमेदवारांचा समावेश होता. दोन्ही पक्षांकडून उर्वरित उमेदवारांची घोषणा होणे बाकी आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.