आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पक्षांतर:योगींचे मंत्री, तीन आमदारांचे ‘पलायन’, सपात करणार प्रवेश; निवडणुकीच्या रणधुमाळीत यंदा भाजपवरच पहिला वार

लखनऊ10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चाैघेही बसपतून आले होते, आणखी २ मंत्री भाजप साेडू शकतात

उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूक जाहीर होताच पक्षांतराचा खेळ सुरू झाला आहे. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीआधी सपा, बसप आणि काँग्रेसमधून भाजपत जाण्याचा ट्रेंड होता. या वेळी सुरुवात भाजप सोडण्याने झाली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री स्वामीप्रसाद मौर्य यांनी मंगळवारी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला. त्यांच्यासोबत भाजप आमदार बृजेश प्रजापती, भगवतीप्रसाद सागर आणि रोशनलाल वर्मा यांनीही राजीनामा दिला. हे सर्व जण समाजवादी पक्षात प्रवेश करू शकतात. स्वामीप्रसाद मौर्य यांनी सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांची भेट घेतल्यानंतर राज्यपालांकडे राजीनामा पाठवला. आणखी १० ते १२ आमदार भाजप सोडतील, असा दावा स्वामीप्रसाद मौर्य यांनी केला. आणखी २ मंत्री राजीनामा देऊ शकतात.

२०१७ मध्ये भाजपच्या बाजूने बाजी पलटवण्यात होती महत्त्वाची भूमिका : स्वामीप्रसाद यांनी २०१६ मध्ये बसप विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आणि स्वत:चा पक्ष स्थापला. भाजप प्रदेशाध्यक्ष केशवप्रसाद यांनी त्यांना पक्षात आणले. मागील निवडणुकीत मागास प्रवर्गाच्या मतांमुळे भाजपला एकतर्फी विजय मिळाला होता.

२०१७ मध्ये भाजपच्या ३१२ आमदारांपैकी ५४ जण इतर पक्षांतून येऊन जिंकले होते
गेल्या विधानसभा निवडणुकीत एकट्या भाजपला ३१२ जागा मिळाल्या होत्या. त्यापैकी ५४ आमदार असे होते, जे इतर पक्षांतून आले होते. भाजपनेे इतर पक्षांतून आलेल्या ६७ जणांना तिकीट दिले होते. तथापि, मागील वर्षी बंगाल निवडणुकीआधी तृणमूलचे ३० नेते भाजपत आले. पण ८ आमदारांसह १६ नेत्यांना पराभव पत्करावा लागला.

यूपीमध्ये आजवर ८ भाजप आमदारांनी सोडलाय पक्ष
यापूर्वी भाजप आमदार राकेश राठोर, माधुरी वर्मा, राधाकृष्ण शर्मा आणि दिग्विजय नारायण चतुर्वेदी यांनी पक्ष सोडलेला आहे. सूत्रांनुसार, भाजपच्या अंतर्गत सर्व्हेत म्हटले आहे की, पुन्हा जिंकण्यासाठी मोठ्या संख्येने उमेदवार बदलावे लागतील. ज्यांची तिकिटे कटणार होती, तेच पक्षांतर करत आहेत.

समाजवादी पार्टीत आणखी १३ आमदार येणार : पवार
राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार म्हणाले की, आम्ही गोव्यात आघाडीसाठी काँग्रेस आणि तृणमूलसोबत चर्चा करत आहोत. यूपीत सपासह इतर छोट्या पक्षांसोबत निवडणूक लढवू. यूपीत आणखी १३ आमदार सपामध्ये प्रवेश करतील. यूपीत यंदा परिवर्तन होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...