आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article By Amol Udgirkar About B Grade Cinema In India

संकटकालिन खिडक्या... (रसिक दिवाळी अंक)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिजनांच्या सभेत नव्हे तर एखादा ‘बी’ ग्रेड सिनेमा प्रदर्शित होत असलेल्या एखाद्या जीर्ण-शीर्ण थिएटरात समाजाचं प्रतिबिंब उमटत असतं. परंतु, मल्टिप्लेक्स संस्कृतीचा उदय आणि मोबाइल क्रांतीमुळे ही शक्यता अाता दुरावली आहे, त्याचा थेट फटका जसा ‘बी’ ग्रेड इंडस्ट्रीला बसलेला आहे, तसाच त्याचा परिणाम समाजाचा खराखुरा चेहरा भूमिगत होण्यातही झाला आहे...

पडद्यावर चित्रपट सुरू आहे, पण प्रेक्षकांना काही देणंघेणं दिसत नाहीये... थिएटरमध्ये गच्च काळोख भरून राहिला आहे... कुणी ओळखीचा माणूस प्रेक्षकांमध्ये असला तर त्याने आपल्याला ओळखू नये, यासाठी तो अंधार महत्त्वाचा भूमिका बजावतो आहे... थोडक्यात, अंधारामुळे तोंड लपवून फिरण्याची गरज नाहीये. सोबतीला एक अगम्य कुबट वास. पडदा पण फाटलेला... हजर असलेले प्रेक्षक कोपऱ्याच्या ‘सीटा’ पकडून आहेत... त्यात आपल्या शारीरिक गरजांचे काय करावं, हे न समजून तिथे आलेले काही टीनएजर्स, कचरा वेचणारे लोक आणि तत्सम खालच्या आर्थिक वर्गातून आलेले लोक यांचाच मुख्यत्वे प्रेक्षकांमध्ये समावेश आहे... स्त्रियांचं प्रमाण एकदम नगण्य. एखादं दुसरी भडक मेकअप केलेली बाई हजर आहे, तीसुद्धा एखाद्या फाटक्या व्यक्तीसोबत... त्या जोडीला चित्रपट बघण्यापेक्षा त्या गच्च काळोखात इतर गोष्टी करण्यातच जास्त रस आहे... इतक्यात पडद्यावर एखादा ‘तसला’ सीन सुरू होतो आणि एकटे एकटे आलेलं पब्लिक सरसावून बसतं... तो सीन संपतो आणि त्या पब्लिकचा रस संपतो. मध्यंतरापर्यंतच अर्धं थिएटर रिकामं होतं. ती भडक मेकअप केलेली बाई आणि तो फाटका माणूस अजून तग धरून असतात. चित्रपट संपायच्या अगोदर ते पण निघून जातात... शो संपतो... आक्रसलेलं थिएटर पुन्हा त्याच नवीन खेळासाठी सज्ज होतं...

हे चित्र कुठलाही ‘कच्ची कली’, ‘डाकू हसीनाबाई’ किंवा ‘रेशमा की जवानी’ नामक चित्रपट दाखवणाऱ्या जीर्ण शीर्ण चित्रपटगृहात दिसतं. कुठल्याही चकचकीत मल्टिप्लेक्समध्ये असणाऱ्या दृश्याच्या एकदम उलट. शेतकरी नेते शरद जोशींनी मांडलेल्या ‘इंडिया आणि भारत’ थिअरीसाठी एक दृश्यात्मक परिमाण निवडायचे असेल तर वर वर्णन केलेले सिंगल स्क्रीन थिएटर आणि मल्टिप्लेक्स यांच्याइतकं समर्पक उदाहरण सापडणार नाही. सिंगल स्क्रीन चित्रपटगृहांची पण एक विशिष्ट उतरंड आहे. या उतरंडीत सर्वात खालच्या स्थानी आहेत ते ‘बी ग्रेड चित्रपट’ दाखवणारे चित्रपट. जगभरात ‘बी ग्रेड’ चित्रपट म्हणजे, अतिशय कमी पैशात बनलेले, आशय-विषय सामान्य असलेले चित्रपट. पण आपल्याकडे या व्याख्येत अजून एक महत्त्वाचा घटक समाविष्ट होतो, तो म्हणजे, सर्वसामान्य प्रेक्षकांना आवडतो म्हणून मुळातच नसलेल्या कथेत टाकलेला, ‘सेक्शुअल कंटेंट’. या प्रकारच्या चित्रपटांना कुठल्याही प्रकारच्या वैश्विक जाणिवा नसतात. गेला बाजार चित्रपट माध्यमाची सामाजिक बांधिलकी वगैरे शब्दबंबाळ विषयांशी त्यांचा दुरान्वयेही संबंध नसतो. ‘मागणी तसा पुरवठा’ या अर्थशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाशी प्रामाणिक राहून प्रेक्षकांना आवडेल, ते देण्याचं असिधाराव्रत पाळत बी ग्रेड चित्रपट निर्माता - दिग्दर्शक कार्यरत असतात.
पुढील स्लाइड्सवर वाचा, बी ग्रेड चित्रपटांचा इतिहास आणि बरेच काही...
amoludgirkar@gmail.com