Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | baramati Neera Devgarh dam water stop

बारामतीकरांकडून 12 वर्षे पळवले जाणाऱ्या ‘नीरा देवघर’च्या पाण्याला ‘बांध’

प्रतिनिधी, | Update - Jun 13, 2019, 09:31 AM IST

खा. रणजिसिंह निंबाळकर व रणजितसिंह माेहिते पाटलांचा पवार काका-पुतण्यांना दणका

 • baramati Neera Devgarh dam water stop

  अकलूज - नीरा देवघर धरणाचे बारामतीला गेली १२ वर्षे नियमबाह्य नेण्यात येणारे पाणी बंद करण्याचा अध्यादेश बुधवारी राज्य शासनाने काढला. माढ्याचे भाजप खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर व राष्ट्रवादी साेडून नुकतेच भाजपत आलेले अकलूजचे माजी राज्यमंत्री रणजितसिंह मोहिते यांच्या पाठपुराव्यामुळे हा निर्णय झाला. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार या काका-पुतण्यांना मोठा धक्का बसला आहे. आता फलटण, माळशिरस, पंढरपूर व सांगोला तालुक्याला सात टीएमसी पाणी जास्तीचे मिळणार आहे.


  सन २००२ मध्ये बांधण्यात आलेल्या ११.५ टीएमसी पाणी साठवण क्षमतेच्या नीरा-देवघर धरणाचे कालवे अद्यापपर्यंत पूर्ण झालेले नाहीत. जोपर्यंत हे कालवे पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हे पाणी नीरा कालव्यातून सिंचन व पिण्यासाठी देण्याचे धोरण ठरले होते. नीरा उजव्या कालव्याद्वारे ५७ टक्के तर डाव्या कालव्याद्वारे ४३ टक्के पाणी वाटपाचे धोरण १९५४ च्या पाणी वाटप कायद्यानुसार ठरले होते.


  त्यानुसार उजव्या कालव्यातून सातारा जिल्ह्यातील फलटण तर सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, सांगोला व पंढरपूर या तालुक्यांना पाणी मिळत होते. डाव्या कालव्यातून बारामती व इंदापूर तालुक्याला पाणी मिळत होते. ४ एप्रिल २००७ रोजी मंत्रिमंडळात स्वतःची राजकीय ताकद वापरून शरद पवार व तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सन २००९ मध्ये पाणी वाटपाचा करार बदलला. त्यामध्ये नीरा देवघर धरणातून ६० टक्के पाणी डाव्या कालव्यातून बारामती व इंदापूर तालुक्याला व ४० टक्के पाणी फलटण, माळशिरस, सांगोला व पंढरपूर तालुक्याला देण्याचा निर्णय घेतला. हा करार ३ एप्रिल २०१७ पर्यंतच हाेता. विधान परिषदेचे सभापतिपद मिळाल्याने रामराजे नाईक-निंबाळकर यांनी या कराराला विरोध न करता संमती दिली होती. मात्र हा करार संपल्यानंतरही बेकायदेशीरपणे हे पाणी बारामती तालुक्याला दिले जात होते. ते बंद करावे व फलटण, माळशिरस, सांगोला व पंढरपूर तालुक्यांना पुन्हा पाणी देण्यात यावे, अशी मागणी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर व रणजितसिंह मोहिते यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली होती. त्यानंतर राज्य सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला.


  बारा आकड्याचा योगायोग
  बारामतीकर गेल्या बारा वर्षांपासून हे नियमबाह्य पाणी वापरत होते. माढ्यात भाजपचा खासदार झाल्यानंतर मात्र अवघ्या १२ दिवसांच्या पाठपुराव्यानंतर बारामतीला पळवले जाणारे हे पाणी थांबवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय झाला. मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्र्यांनीमाजी विजयसिंह मोहिते यांना १२ जून रोजी वाढदिवसाची ही भेट दिली असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.


  पवारांचा दबाव सरकारने झुगारला
  नीरा-देवघर धरणाच्या लाभक्षेत्रात फलटण, माळशिरस, सांगोला व पंढरपूर हेही तालुके येतात. बारामती व इंदापूर तालुके येत नाहीत. त्यामुळे येथे पाणी देणे नियमबाह्य असल्याचे रणजितसिंह निंबाळकर व माेहिते पाटील यांनी जलसंपदा मंत्री महाजन यांच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यानंतर जलसंपदा मंत्र्यांनी बुधवारी याबाबतचा आदेश काढला. दरम्यान, हे पाणी बंद करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे लक्षात येताच शरद पवारांनी ‘पाण्याचे राजकारण करू नका’ अशी मागणी सरकारकडे केली हाेती. परंतु फडणवीस सरकारने पवारांच्या दबावाला बळी न पडता साेलापूर व सातारा जिल्ह्यातील तालुक्यांना त्यांचे हक्काचे पाणी पुन्हा मिळवून दिले.

Trending