Home | Maharashtra | Pune | cosmos bank cyber attack money issue

काॅसमाॅस बँकेतून चाेरीला गेले 94 काेटी; परत मिळाले फक्त 10 लाख

विशेष प्रतिनिधी, | Update - Jun 13, 2019, 09:34 AM IST

30 देशांतून हॅकर्सने लंपास केलेली रक्कम शाेधण्याचे आव्हानच

 • cosmos bank cyber attack money issue

  पुणे - काॅसमाॅस बँकेचे मुख्यालय असलेल्या पुण्यातील शाखेतील एटीएम स्विच सर्व्हर सायबर भामट्यांनी हॅक करून बँकेच्या व्हिसा व रुपे डेबिट कार्डधारकांची माहिती आधी चाेरली. त्याआधारे व्हिसा डेबिट कार्डद्वारे ३० देशांत मिळून एकाच वेळी ९४ काेटी ४२ लाख रुपये काढून घेतल्याची घटना आॅगस्ट २०१८ मध्ये घडली हाेती. सायबर गुन्हे शाखेने आतापर्यंत १३ आराेपींना अटक करून त्यांच्याकडून केवळ १० लाख रुपयेच वसूल केले. वेगवेगळ्या देशांतील आंतरराष्ट्रीय हॅकर्सची टाेळी या गुन्ह्यात कार्यरत असल्याने त्यांच्यापर्यंत पाेहोचण्यात तपास यंत्रणेला अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे उर्वरित रक्कम परत मिळण्याची शक्यता आता धूसर बनली आहे.


  परदेशातील बँकांशी आर्थिक व्यवहार सुरक्षित व्हावा या दृष्टीने ‘स्विफ्ट’ हे काॅम्प्युटर साॅफ्टवेअर तयार करण्यात आलेले आहे. एका देशातील बँकेतून दुसऱ्या देशातील बँकेत पैसे हस्तांतरित करण्यासाठी स्विफ्टद्वारे संबंधित खात्यांची खातरजमा करून आर्थिक व्यवहारासाठी मान्यता दिली जात असते व त्यानंतर बँका व्यवहार करून पैशांची देवाणघेवाण करतात. याकरिता गाेपनीय पद्धतीने ८ ते १२ आकडी स्विफ्ट काेड बँकांकडे असताे. युजरनेम व या पासवर्डशिवाय काेणी पैसे काढून घेऊ शकत नाही. स्विफ्टच्या मान्यतेनंतर बँकेत जे आर्थिक व्यवहार केले जातात त्यानुसार स्विफ्ट रिपाेर्ट दाेन्ही बँकाना पीडीएफ फाइलद्वारे जाऊन नेमके कशा प्रकारे व्यवहार पूर्ण झाला याची माहिती मिळत असते. मात्र, हॅकरने स्विफ्ट सिस्टिम हॅक केल्यानंतर अधिकृतरीत्या बँकेचा अधिकारी असल्याचे भासवून बँकेची व्यवहारास मान्यता मिळवली व परदेशात बसून आॅनलाइन व्यवहार करण्यात आले. बँकेला सुटी असेल त्या दिवशी अशा घटना झाल्याने हे प्रकार बँकेला समजण्यास उशीर हाेताे आणि हॅकर्स रक्कम काढतात.


  व्हिसा-काॅसमाॅसमध्ये पैशांचा वाद : आंतरराष्ट्रीय व्यवहार हाेत असताना प्रत्येक बँकेची एक ठरावीक पत असते. तेवढ्या रकमेपर्यंतच दुसऱ्या बँकेतून किंवा एटीएममधून व्यवहार हाेणे अपेक्षित असते. सरासरी किती व्यवहार परदेशातील बँकेच्या एटीएमवरून ग्राहकांद्वारे व्यवहार हाेऊ शकतात त्यानुसार ही पत निश्चित केली जात असते. काॅसमाॅस बँकेची अशीच ठरावीक रकमेची मर्यादा असताना हॅकर्सने हजाराे ट्रान्झॅक्शन करून मर्यादेपेक्षा जास्त रक्कम काढली. व्हिसा डेबिट कार्डद्वारे सुमारे १२ हजार व्यवहारांद्वारे एकूण ७८ काेटी रुपये भारताबाहेर काढण्यात आले, तर रुपे डेबिट कार्डद्वारे २८४९ व्यवहारांद्वारे अडीच काेटी रुपयांचे व्यवहार भारतात झालेले आहेत. एकूण १४,८४९ व्यवहारांद्वारे ८० काेटी ५० लाख रुपयांचे संशयास्पद व्यवहार व्हिसा व एनपीसीआय यांनी पाठवलेल्या ट्रान्झॅक्शन रिक्वेस्ट्स व्हिसा व एनपीसीआय यांना काॅसमाॅस बँकेने अप्रूव्ह केल्याचे भासवून आराेपींनी ११ आॅगस्ट राेजी ही रक्कम काढली. नंतर १३ आॅगस्ट राेजी १३ काेटी ९२ लाख रुपये काढले. परदेशात पैसे काढण्याची पत असताना काॅसमाॅसच्या खात्यासंदर्भात व्हिसाकडून जादा पैसे कसे दिले गेले, यावरून आता वाद सुरू आहे.


  आराेपींना शाेधण्यात विदेशी यंत्रणांचे साहाय्य
  या प्रकरणाचा तपास करणारे पाेलिस निरीक्षक दीपक पायगुडे म्हणाले, आतापर्यंत १३ जणांना अटक करण्यात आली आहे. सायबर क्राइमने पाच लाख ५५ हजार रुपये राेख, १४ माेबाइल, २४ हार्डडिस्क, तीन सीडी, एक डीव्हीडी, तीन पेनड्राइव्ह, एक सिमकार्ड, दहा डेबिट कार्ड, एक लॅपटाॅप जप्त केला आहे. तर, आराेपींच्या बँकेतील ९८ हजार रुपये गाेठवण्यात आले आहेत. ज्या ३० देशांतून पैसे काढण्यात आले त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला असून अमेरिका, रशिया, फ्रान्स, जर्मनी हे देश तपासात सहकार्य करत आहेत. परदेशातील दाेन आराेपी आतापर्यंतच्या तपासात निष्पन्न झाले आहे.

Trending