Home | Maharashtra | Vidarva | Nagpur | Narmadakka Naxal Leader arrest in gadchiroli

महाराष्ट्रदिनी गडचिरोली रक्तपाताची योजना आखण्यात नर्मदाक्काचा सहभाग

प्रतिनिधी, | Update - Jun 13, 2019, 09:36 AM IST

गडचिरोली पोलिसांकडून अटकेची घोषणा, सात दिवसांची पोलिस कोठडी

 • Narmadakka Naxal Leader arrest in gadchiroli

  नागपूर - नक्षलवादी चळवळीतील मोस्ट वाँटेड दांपत्य नर्मदाक्का आणि किरणकुमार यांना मंगळवारी अटक करण्यात आल्याची अधिकृत घोषणा गडचिरोली पोलिसांकडून पत्रपरिषदेतून करण्यात आली. या दांपत्याचा ७ दिवसांचा पोलिस कोठडी रिमांड घेण्यात आला असून १ मे रोजी महाराष्ट्रदिनी गडचिरोली जिल्ह्यात जांभूरखेडा येथील नक्षलवाद्यांच्या भूसुरुंग स्फोटाच्या घटनेची योजना नर्मदाक्का आणि किरणकुमार या दोघांनी आखली होती, असा दावा गडचिरोली पोलिसांकडून करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत नर्मदाक्का ठार झाल्याच्या मागील काही वर्षांपासूनच्या चर्चांना तिच्या अटकेमुळे पूर्णविराम मिळाला आहे.


  नर्मदाक्का आणि किरणकुमार यांना अटक करण्यात आल्याची बातमी मंगळवारीच फुटली होती. मात्र, गडचिरोली पोलिसांकडून त्याचा सातत्याने इन्कार केला जात होता. बुधवारी पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पत्रकार परिषद घेऊन दोघांच्या अटकेची अधिकृत घोषणा केली. गेल्या काही महिन्यांपासून पोलिसांकडून या दोघांचे लोकेशन मिळवणे सुरू होते.


  सिराेंचा बसस्थानकावर सापळा रचून अटक
  दोघेही तेलंगणातून सिरोंचामार्गे गडचिरोलीत प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सोमवारी सिरोंचा बसस्थानकावर सापळा रचून दोघांना अटक केली, अशी माहिती पोलिस अधीक्षक बलकवडे यांनी दिली. दरम्यान, सध्या दाेघांची कसून चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांतील सूत्रांनी दिली.


  नर्मदाक्कावर गडचिरोलीत ६५ गुन्हे दाखल
  नक्षलवाद्यांच्या दंडकारण्य स्पेशल झोन समितीची सदस्य आणि वेस्टर्न सबझोनची प्रमुख असलेल्या नर्मदाक्का उर्फ निर्मलाकुमारी (५८) ही गेल्या २५ ते ३० वर्षांपासून नक्षलवादी चळवळीत कार्यरत होती. एकट्या गडचिरोली जिल्ह्यातच तिच्यावर गंभीर स्वरूपाचे ६५ गुन्हे दाखल आहेत. १ मे रोजी जांभूरखेडा येथे नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटाच्या घटनेत १५ पोलिस आणि वाहनचालकासह १६ जण मृत्युमुखी पडले होते. या घटनेचे नियोजन नर्मदाक्का आणि तिचा पती किरणकुमार या दोघांचे होते, असेही गडचिरोली पोलिसांकडून सांगण्यात आले.

Trending