Home | Maharashtra | Pune | tukoba palkhi wari deh pandhari abhiyan

तुकोबांच्या पालखी सोहळ्यात यंदा ‘देह पंढरी’

प्रतिनिधी, | Update - Jun 13, 2019, 09:39 AM IST

फेसबुक पेजवर अवयवदानाच्या फाॅर्मची लिंक असेल उपलब्ध

 • tukoba palkhi wari deh pandhari abhiyan

  पुणे - आषाढी वारीसाठी श्रीक्षेत्र देहू येथून पंढरीच्या दिशेने निघणाऱ्या लक्षावधी वारकरी बांधवांमध्ये अवयवदानाविषयी जागृती निर्माण करण्याचे विशेष अभियान यंदा जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या वारी सोहळ्यात राबवण्यात येणार आहे. तुकोबांच्या वारी सोहळ्याचे फेसबुक पेज दिवसेंदिवस लोकप्रिय होत असून त्यावरही ‘देह पंढरी’ अभियान चालवले जाणार आहे.


  आषाढी वारीसाठी देहू येथून संत तुकोबांचा पालखी सोहळा २४ जून रोजी प्रस्थान करणार आहे. पालखी सोहळ्याचे हे ३३४ वे वर्ष आहे. पालखी सोहळ्यासाठी खास फेसबुक दिंडीचा उपक्रमही सुरू आहे. त्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या आणि तुकोबांचे वंशज असणाऱ्या स्वप्निल मोरे यांनी ही माहिती दिली.


  स्वप्निल म्हणाला, ‘फेसबुक दिंडीचा उपक्रम तरुणाईत खूप आवडीने पाहिला जातो. दोन कोटींहून अधिक मंडळी आमचे व्हिजिटर्स आहेत. सर्व व्हर्च्युअल माध्यमांतून आम्ही फेसबुक दिंडी चालवतो. गेल्या वर्षी आम्ही नेत्रदान अभियान चालवले होते. त्यातून साडेतीन हजार भाविकांनी नेत्रदानाचा निर्धार केला आणि अर्जही भरून दिला. त्याआधी स्त्रियांच्या मासिक पाळीविषयीचे ‘तिची वारी’ हे अभियानही आम्ही चालवले होते. जलसाक्षरता विषयही या माध्यमातून आम्ही हाताळला आहे. यंदा अवयवदानाविषयी जनजागृती करणार आहोत. त्यासाठी ‘देह पंढरी’ अभियान चालवले जाईल. फेसबुक पेजवर अवयवदानाच्या फाॅर्मची लिंक उपलब्ध असेल.’


  पालखी सोहळ्यातही ‘देह पंढरी’
  तुकाराम महाराजांच्या प्रत्यक्ष पालखी सोहळ्यात यंदा अवयवदानाविषयी माहिती तसेच त्याचे महत्त्व सांगणारे अभियान चालवले जाणार आहे. त्यासाठी मुंबई येथील दोस्त (धन्वंतरी ऑर्गनायझेशन फॉर सोशल हेल्थ ट्रान्फॉर्मेशन) या संस्थेचे सहकार्य मिळाले आहे. त्यांचे २५ स्वयंसेवक वारीत प्रत्यक्ष सहभागी होऊन अवयवदानाचे महत्त्व पटवून देणार आहेत. अवयवदानाचे अर्जही भरून घेतले जाणार आहेत.
  अजित मोरे, पालखी सोहळाप्रमुख, देहू

Trending