Home | International | Pakistan | Increase in inflation in Pakistan

करवाढीमुळे पाकिस्तानात महागाई गगनाला भिडली; जुलैपासून अर्थसंकल्प हाेणार लागू

वृत्तसंस्था, | Update - Jun 13, 2019, 12:30 PM IST

जीवनाश्यक वस्तू महागल्याने नागरिक त्रस्त

  • Increase in inflation in Pakistan

    इस्लामाबाद - आर्थिक संकटाला ताेंड देत असलेल्या पाकिस्तानातील नागरिक महागाईने त्रस्त झाले आहेत. त्यातच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी २०१९-२० वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. गेल्या वर्षी सत्तेवर आल्यानंतर इम्रान खान यांच्या अर्थसंकल्पातील करवाढीच्या प्रस्तावामुळे तेल, तूप, साखर या जीवनावश्यक वस्तूंबराेबरच सिगारेट, सिमेंट, माेटार, साेने आणि चांदी महाग हाेण्याची शक्यता आहे. जुलैपासून या अर्थसंकल्पाची अंमलबजावणी हाेणार आहे.


    गेल्या वर्षी सत्तेवर आलेल्या इम्रान खानच्या पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ या पक्षाने सादर केलेल्या ७.०२२ अब्ज रुपयांच्या अर्थसंकल्पात महसूल राज्यमंत्री हम्माद यांनी अनेक जिनसांसह सीएनपी आणि एलएलजीवरील कर वाढवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. एक हजार सीसी क्षमतेच्या वाहनांवर २.५ %, १००० ते २००० सीसी क्षमतेच्या वाहनांवर ५ टक्के आणि २००० सीसी क्षमतेच्या वाहनांवर ७.५ टक्के कर लावण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे वाहनांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.


    पाकिस्तान सरकारने क्षेत्र एकसाठी सीएनजीची किंमत ६४.८० रुपयांवरून वाढवून ७४.०४ रुपये प्रतिकिलाे तर क्षेत्र दाेनसाठी ५७.६९ रुपयांवरून ६९.५७ रुपये प्रतिकिलाेपर्यंत वाढ केली आहे. एलएनजीच्या आयातीवरील उत्पादन शुल्कात प्रतिकिलाे दहा रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. मार्बल उद्याेगावर १७ टक्के कर आकारण्याबराेबरच सिमेंटवरील उत्पादन शुल्कात दीड रुपयांनी वाढ करून ते प्रतिकिलाे दाेन रुपये करण्यात आले आहे. प्रति एक हजार सिगारेटवरील कर वाढवून तो ४,५०० रुपयांवरून ५,२००रुपये करण्यात आला आहे. अर्थसंकल्पात अनेक वस्तूंवरील कर कमीही करण्यात आले आहेत. यामध्ये माेबाइल फाेनवरील आयातीवरील तीन टक्के मूल्यवर्धित कर कमी करण्यात आला आहे. अफगाणिस्तान आणि मध्य आशियाई देशांना हाेणारी निर्यात शून्य कराच्या कक्षेत ठेवण्याचा प्रस्ताव आहे. सध्याच्या घडीला पाकिस्तानची आर्थिक घडी बऱ्याच प्रमाणात विस्कळीत झाली असून कर्जाचा भारही वाढला आहे. अशा परिस्थितीत सरकारी तिजाेरी भक्कम करण्यासाठी नागरिकांनी आपली संपत्ती जाहीर करावी, असे आवाहन पंतप्रधान इम्रान खान यांनी अलीकडेच केले आहे. संपत्ती घाेषणा याेजनेअंतर्गत नागरिकांनी ३० जूनपर्यंत आपल्याकडील अघाेषित संपत्ती जाहीर करून कर भरणा करावा, असे इम्रान खान यांनी सांगितले आहे.


    आर्थिक अडचणीतून मार्ग काढण्यासाठी पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे कर्जासाठी हात पसरले आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला खर्च कमी करून कर वाढवण्याचा सल्ला दिला आहे. महागाई सातत्याने वाढत असून आयात-निर्यातीवरही परिणाम झाला आहे. चलन बाजारात पाकिस्तानचा रुपया अमेरिकेच्या डाॅलरच्या तुलनेत घसरत आहे. त्याचा परिणाम पाकिस्तानच्या सरकारी कर्जात वाढ हाेण्यावर झाला आहे. दरम्यान, पाकमध्ये इम्रान खान सरकारविराेधात नाराजी व्यक्त हाेत असून, सरकारने देश वाचवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी हाेत आहे.

Trending