आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोंधळ अभिनंदनाचा : औरंगाबाद पालिकेत राडा!, नवनिर्वाचित खासदारांच्या अभिनंदन प्रस्तावात खा. इम्तियाज जलील यांच्या नावाला दिली बगल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या औरंगाबाद महापालिकेच्या पहिल्या सभेत गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह नवनिर्वाचित खासदारांच्या विजयाबद्दल मांडलेल्या अभिनंदन प्रस्तावावरून प्रचंड राडा झाला. या प्रस्तावात औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या नावाला बगल दिल्याचे लक्षात येताच सभागृहात गोंधळ उडाला. 


एमआयएम नगरसेवकांनी महापौर नंदकुमार घोडेले यांच्या विरोधात घोषणाबाजी करत राजदंड पळवला. तेव्हा महापौरांनी या २० नगरसेवकांना निलंबित केले. एवढ्यात महापौर जातिवादी असल्याच्या घोषणा नगरसेवकांनी दिल्या. महापौरांनी त्यांनाही निलंबित करताच गोंधळ वाढला. अखेर पोलिस बळाचा वापर करून नगरसेवकांना सभागृहाबाहेर काढण्यात आले. यामुळे ३ तास कामकाज ठप्प होते. प्रारंभीच घोडेले यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासह देशातील सर्वच नवनिर्वाचित खासदारांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मंजूर केल्याचे जाहीर केले. पाठोपाठ पाणी प्रश्नावर चर्चा सुरू केली. त्याला विरोधी पक्षनेत्या सरिता बोर्डे यांनी आक्षेप घेतला. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या नावासह अभिनंदनाचा ठराव घेण्याची मागणी त्यांनी केली. त्यास घोडेलेंनी नकार दिला. त्यावरून एकच गदारोळ झाला. 

 

पोलिसांनी लेखी पत्रानंतर केली कारवाई 
महापौरांनी एमआयएम नगरसेवकांना सभागृहाबाहेर जाण्याचे आवाहन केले. मात्र आमचे आंदोलन लोकशाही पद्धतीने सुरू आहे, हात लावल तर वाईट होईल, असा इशारा त्यांनी दिला. तर पोलिसांनी कारवाईसाठी लेखी पत्राची मागणी केली. त्याची पूर्तता नगरसचिवांनी केल्यावर दुपारी दोन वाजता नगरसेवकांना बाहेर काढण्यात आले. 


कायमस्वरूपी प्रवेश न देण्याचा ठराव 
एमआयएमच्या वीस नगरसेवकांचे पद रद्द करण्यात यावे, त्यांना सर्वसाधारण सभेत प्रवेशास कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी, असा प्रस्ताव भाजपचे उपमहापौर विजय औताडे, गटनेते प्रमोद राठोड, शिवसेनेचे सभागृहनेते विकास जैन यांनी मांडला. त्याला मंजुरी देण्यात आली. या २० नगरसेवकांचे पद रद्द करण्यासाठी शासनाला प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे महापौरांनी यावेळी सांगितले. 


सभागृहात नगरसेविकांचे भजन 
सभागृहात गोंधळ सुरु असताना महापौरांनी दहा मिनिटांसाठी सभा तहकूब केली होती. तरीही एमआयएमी घोषणाबाजी सुरु होती. युतीच्या काहीजणांकडून जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणा दिल्या जात होत्या. काही वेळानंतर युतीच्या महिला नगरसेविकांनी 'विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी' असे भजन सुरू केले होते. 
 

 

आगीत तेल... काँग्रेसचे नगरसेवक अफसर खान यांनी इम्तियाज काही महापुरुष किंवा मोठा नेता नसल्याचे म्हणताच आगीत तेल पडले. संतापलेल्या एमआयएमच्या नगरसेवकांनी खान यांच्यावर कारवाई करण्याची मागणी लावून धरली. राजदंडही पळवला.

 

खाली मुंडके वर पाय... : खान यांच्यावर कारवाई आणि अभिनंदन प्रस्तावावरून एमआयएम नगरसेवकांनी “जातिवादी महापौरांचे करायचे काय, खाली मुंडकं वर पाय’ अशा घोषणा दिल्या. 

 

नामकरण सोहळ्यातूनही इम्तियाज यांना डावलले
गेल्या आठवड्यात सिद्धार्थ उद्यान-प्राणिसंग्रहालयातील बछड्यांच्या नामकरण सोहळ्यातही मनपाने इम्तियाज यांना डावलले होते. तेव्हाही एमआयएमच्या नगरसेवकांनी मनपाविरुद्ध आंदोलन केले होते.

 

माझी अॅलर्जी का? : खासदार इम्तियाज
यापूर्वी खैरे निवडून आल्यानंतर अभिनंदनाचा ठराव त्यांच्या नावानिशी असायचा. मग आता माझ्याच नावाची अॅलर्जी का? या प्रकाराबद्दल महापालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या बुद्धीची कीव करावी वाटते, असे खा. इम्तियाज जलील म्हणाले. 

 

ठरवून गाेंधळ घातला... : नंदकुमार घोडेले
खासदारांचे अगोदरच अभिनंदन करण्यात आले. एमआयएम नगरसेवक मुद्दाम उशिरा आले आणि वाद घातला. हा ठरवून घातलेला गोंधळ आहे, असे महापौर नंदकुमार घोडेले म्हणालेे. 

 

भाजप नगरसेवकांवर मात्र कारवाई नाही : इम्तियाज यांना डावलून प्रस्ताव मंजूर झाल्याचे जाहीर करत महापौरांनी पाणी प्रश्नावर चर्चेचा पुकारा केला. त्यावरून एमआयएम नगरसेवक आक्रमक होण्यापू्र्वी भाजप नगरसेवक राजू शिंदे, गोकुळ मलके यांनीही राजदंड पळवला. मात्र, त्यांच्यावर ना कारवाई झाली, ना समज दिली.