आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यवहारवादी मोदी लाटेचा वाढता प्रभाव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक बांधणी पक्की आहे. या बांधणीमुळेच 1995 नंतरची साडेचार वर्षे सोडल्यास महाराष्ट्रावर काँग्रेसची सत्ता राहिली. ही बांधणी आर्थिक स्थैर्य देणारी असल्याने मतदारांना त्याच्याशी जखडून ठेवणे सोपे जाते. शिवसेना व भाजपला असे संस्थांचे जाळे विणता आले नाही. सरकारी वरदहस्त, त्यातून होणारा अखंड अर्थपुरवठा व त्यावर पोसलेले कार्यकर्त्यांचे जाळे यातून काँग्रेस आघाडीचा गड उभा राहिला व टिकलाही.

अन्य राज्यांत नसलेले एक वैशिष्ट्य महाराष्ट्रातील काँग्रेसने जपले. आपल्या संस्थांच्या जाळ्यात काँग्रेस आघाडीने विरोधकांनाही ओढून घेतले. विरोधकांशी उघड दोन हात करण्यापेक्षा सरकारी कृपाशीर्वादाने जमा होणार्‍या मलईमध्ये प्रमुख विरोधकांनाही वाटा देण्याची चतुराई काँग्रेसने दाखविली. यशवंतराव चव्हाणांनी बेरजेचे राजकारण विचारांच्या संदर्भात केले. पुढील पिढ्यांनी कमाईची बेरीज करण्यास सुरुवात केली. विरोधी पक्षातील एखादा नेता चमकण्यास सुरुवात झाली की त्याला वाटेकरी करून प्रस्थापित करून टाकण्यात काँग्रेस उशीर करीत नाही. यामुळेच महाराष्ट्रात गेल्या तीस-चाळीस वर्षांत प्रखर व कणखर विरोधी पक्षच उभा राहिला नाही. जे उभे राहिले ते एक तर काँग्रेसच्या वळचणीला गेले वा विरोधकाचे बिरूद लावीत काँग्रेसी अर्थव्यवस्थेत बसले. महाराष्ट्रातील उमेदवारांमधून डावे-उजवे ठरवणे यामुळेच मतदारांना कठीण जाते.

आणि फार डावे-उजवे करावे अशा मन:स्थितीत मतदारही नसतात. महाराष्ट्रातील मतदार तसा व्यावहारिक विचार करतो. कडवे वैचारिक वाद घालण्यात महाराष्ट्राचा हातखंडा असला तरी मतदान करताना तो कोणता उमेदवार स्थैर्य देईल हे पाहतो. खरे तर काँग्रेस आघाडीचा भ्रष्ट कारभार पाहता आपसारख्या पक्षाला महाराष्ट्रात बळ मिळायला हवे होते. आप हा पक्ष नवीन असला तरी आपसारखी विचारधारा महाराष्ट्राला नवीन नाही. समाजवादी विचारधारेशी नाळ जुळलेले अनेक प्रवाह महाराष्ट्राच्या राजकारणात पूर्वीपासून आहेत. या प्रवाहातील नेत्यांना महाराष्ट्रात आदराचे स्थान मिळाले, पण सत्ता मिळाली नाही. कारण काँग्रेसप्रमाणे स्थैर्य देणार्‍या संस्थांचे समांतर जाळे ते निर्माण करू शकले नाहीत. अण्णा हजारे यांचे देशभर कौतुक होत असले तरी महाराष्ट्रात ते राजकीय ताकद निर्माण करू शकले नाहीत, त्याचे कारण मराठी मतदाराच्या मानसिकतेत आहे.

मात्र या वेळी चित्र थोडे वेगळे आहे. मुंबई-पुण्याबाहेरचा महाराष्ट्रातील मतदार काँग्रेस आघाडी व यांच्यातील स्थैर्याचा बळकट बंध तोडण्यात नरेंद्र मोदी यांचा झंझावाती प्रचार यशस्वी ठरणार अशी लक्षणे स्पष्टपणे दिसतात. मोदींच्या प्रचाराचे वैशिष्ट्य म्हणजे काँग्रेस आघाडीची विश्वासार्हता धुळीला मिळवण्यात ते यशस्वी ठरत आहेत. काँग्रेस आघाडीचे सरदार अनेक मतदारसंघांत प्रस्थापित झाले आहेत. यातून भ्रष्टाचार, दहशत बोकाळली असली तरी लोकांना स्थैर्यही मिळत होते. असे स्थैर्य देण्याची क्षमता विरोधी पक्षाच्या नेत्यांमध्ये नव्हती. मोदींमध्ये ती क्षमता मतदारांना दिसू लागली. पाच वर्षांपूर्वी राज ठाकरे यांच्याबद्दल अशी आशा निर्माण झाली होती. पण मनसेच्या एकूण कारभारामुळे लोक निराश झाले. मोदींचे तसे नाही. गुजरातमधील बारा वर्षांचा अनुभव त्यांना उपयोगी पडतो. गुजरातच्या यशोगाथेवर काँग्रेस व काही पत्रपंडित (यात समाजवादी अधिक) सातत्याने आक्षेप घेत असले तरी या आक्षेपांमुळे जनमानसाच्या मनावर बसलेली मोदींची पकड कमी झालेली नाही. उलट ती अधिक बळकट होत आहे. महाराष्ट्रात मोदींच्या पाठोपाठ सभा घेण्याचे सत्र काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने लावले. पण मोदींच्या तुलनेत शरद पवार व राहुल गांधींच्या सभा फारच फिक्या पडल्या.

लातूरमध्ये तर मोकळे मैदान पाहण्याची वेळ राहुल गांधींवर आली. तेथे राहुल गांधी यांनी अतिशय मुद्देसूद भाषण केले. त्यामध्ये वैचारिक स्पष्टता होती. परंतु आजपर्यंतच्या कारभारात स्पष्टता नसल्यामुळे या विचारांना वजन नव्हते. या तुलनेत मोदींचा व्यवहारवाद लोकांना भावतो. पुण्यातील सभेत त्यांनी नर्मदा प्रकल्पाचा उल्लेख केला. तेथील धरणाचे दरवाजे उभे केले तर महाराष्ट्राला चार हजार कोटींचा फायदा होईल असे सांगितले. काही गावांचे पुनर्वसन राहिल्यामुळे हे दरवाजे उभे करण्यास केंद्र सरकार परवानगी देत नाही. त्यामागे मेधा पाटकर यांच्या आंदोलनाचा दबाव कारणीभूत आहे. यावर मोदींचा उपाय असा की आधी दरवाजे उभे तर करूया. पुनर्वसन होईपर्यंत दरवाजे बंद करू नका. पण दरवाजे उभे करून थोडे पाणी अडवायला काय हरकत आहे? हा व्यवहार तुम्हाला पटतो ना, असे ते सभेत विचारतात व लोक त्यांना होकार देतात.

रोकडा व्यवहार मांडण्याची मोदींची ही शैली काँग्रेस आघाडीला घायकुतीला आणते आहे. अजून महिला, दलित व मुस्लिम ही काँग्रेसची ताकद फार कमी झालेली नाही. या गटांच्या एकजुटीवर काँग्रेसची मदार आहे. परंतु त्या गटांमध्येही चलबिचल सुरू झाली आहे. काँग्रेसच्या हक्कांच्या भाषेपेक्षा रोजगार मिळवून देण्याचे मोदींचे आश्वासन तरुणांनाही आकर्षित करते आहे. मोदींमुळे देश विभाजित होईल, अल्पसंख्याकांना जगणे मुश्कील होईल अशा पारंपरिक प्रचारापेक्षा सिंगल फेअर, डबल जर्नी हे मोदींचे अहमदाबादी सूत्र मतदारांना आकर्षित करताना दिसते. काँग्रेस आघाडीच्या जागा कमी होत चालल्या आहेत, तरीही भाजप-सेना युतीला तीसचा आकडा ओलांडता येईल का, याबद्दल शंका वाटते.