आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजित पवारांची ही शेवटचीच टगेगिरी; मुंडेंनी घेतला समाचार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - बारामती तालुक्यातील एका गावचे पाणी बंद करण्याच्या अजित पवारांच्या वक्तव्याचा भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी समाचार घेतला. मतदारांना प्रलोभन देणे किंवा मतांसाठी धमकी देणे हा आचारसंहितेचा भंग आहे. निवडणूक आयोगाने चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. अजित पवारांची ही शेवटची टगेगिरी असून त्यांना निवडणूक लढवण्यास मज्जाव करण्याची मागणीही त्यांनी केली.

भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी आलेले भाजपचे उपनेते खासदार गोपीनाथ मुंडे शुक्रवारी जळगावात पत्रकार परिषदेत बोलत होते. बारामती तालुक्यात सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मत न दिल्यास पाणी बंद करण्याची धमकी दिली होती. त्यावर मुंडे म्हणाले की, ‘सत्तेतील व्यक्तीने अशी धमकी देणे गैर आहे. मतांसाठी मतदारांना प्रलोभन अथवा धमकी देणे हा आचारसंहितेचा भंग आहे. अजित पवारांनी आचारसंहितेचा भंग केला आहे. निवडणूक आयोगाने चौकशी करून कारवाई करावी तसेच त्यांना निवडणूक लढण्यास मज्जाव करावा. अन्यथा त्यांच्याविरुद्ध न्यायालयात खटला दाखल केला जाईल, असा इशाराही मुंडेंनी दिला.

एनडीए बहुमताकडे जात असल्याचे सांगत भाजप 225 च्या वर जागा जिंकेल, असा विश्वास व्यक्त केला. मोदींच्या तुलनेत पंतप्रधानपदासाठी कॉँग्रेसकडे उमेदवार नसल्याचे सांगत मोदींची लोकप्रियता 43 टक्क्यांवर पोहोचली असून राहुल गांधींची 13 टक्क्यांवर घसरली असल्याचे मुंडे म्हणाले.

सीएमचे चॅलेंज स्वीकारले
मनसेचा राज्यात भाजपला पाठिंबा नसून अकरा ठिकाणी आमच्या विरोधात ते लढत आहेत. परंतु पंतप्रधानपदासाठी मोदींना त्यांचा पाठिंबा आहे. गुजरातच्या विकासाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे चॅलेंज स्वीकारले असून त्यांच्याशी कुठेही चर्चेस तयार असल्याचे मुंडेंनी सांगितले. पुणे येथील मतदार यादीतील घोळाला जिल्हाधिकारी जबाबदार असून अचानक नावे गायब कशी झाली, असा सवाल त्यांनी केला.