आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi Is Like Idi Amin, Hitler, Mussolini, Abhishek Singhvi Says

काँग्रेसने मोदींना बसवले इदी अमीन, हिटलरच्या पंक्तीत !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - काँग्रेसने नरेंद्र मोदी यांना हिटलर व मुसोलिनीच्या बरोबरीनेच युगांडाचे क्रूरकर्मा इदी अमीन आणि पाकिस्तानातील लष्करशहा झिया- उल-हक यांच्या पंक्तीत बसवले.

‘पीएम प्रिटेंडर’ म्हणजेच ‘पंतप्रधानपदाचा सोंगाड्या’ असे शेलके विशेषणही काँग्रेसने मोदींना बहाल केले. अहंकार आणि घमेंड, हेच गुण असलेल्या हुकूमशाही प्रवृत्तीच्या नेत्यांमध्ये करुणेचा अभाव असतो आणि त्यामुळेच गुजरात दंगल व सामूहिक हत्यांबद्दल माफी मागणार नाही, हे त्यांचे कालचे विधान त्यांच्यावरील व्यक्तिमत्त्वाला अनुसरूनच असल्याची टीका काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनू सिंघवी यांनी मोदी यांनी काही वृत्त वाहिन्यांना दिलेल्या मुलाखतींवर केली आहे. अत्यंत तीक्ष्ण शब्दांत मोदींच्या या मुलाखतींमधील वक्तव्यांवर सिंघवी तुटून पडले. काँग्रेसने ही आक्रमकता सुरुवातीलाच दाखवली असती, तर काँग्रेसचा प्रचार अधिक धारदार झाला असता, अशी प्रतिक्रिया पत्रकारांनी व्यक्त केली. गुजरात सामूहिक हत्याकांड आणि दंगलीबद्दल आपण माफी मागणार नाही. लोकांच्या न्यायालयात आपण दोषमुक्त झालो आहोत, अशी वक्तव्ये मोदी यांनी मुलाखतीमध्ये केली होती.

निवडणुकीमध्ये विजय मिळणे, याचा अर्थ हत्याकांडाच्या दोषातून मुक्तता नव्हे. हिटलर व मुसोलिनीही त्यांच्या देशात लोकप्रियतेच्या लाटेवर आरूढ होऊन विजयी झालेले होते, परंतु त्याचा अर्थ ज्यूंच्या केलेल्या सामूहिक हत्यांच्या अपराधातून हिटलरला माफी मिळाली असा होत नाही. जगाने हिटलरला माफ केलेले नाही, असे सांगून सिंघवी म्हणाले की हिटलरसारख्या प्रवृत्तीचे लोक कधीच माफी मागत नसतात. कारण, ते स्वत:ला निदरेष मानत असतात. अहंकार हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू असतात. ते स्वत:च न्यायाधीश व वकील असतात. माफी मागण्यासाठी व्यक्तीमध्ये चूक मान्य करण्याची व त्याबद्दल पश्चात्ताप करण्याची भावना प्रथम निर्माण व्हावी लागते आणि त्यानंतरच माफी मागितली जाते.