आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...आणि मी गणपती बनलो

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


काही दिवसांपूर्वी बीडमधील वाडिया वाचनालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्ताने मिरवणूकही काढण्यात आली. त्यात अनेक शाळांनी सहभाग घेतला. आमच्या चंपावती विद्यालयाने यासाठी सर्व तयारी पूर्ण केली होती. प्रमुख कार्यक्रमाच्या आधी रथयात्रा निघणार होती. आमच्या शाळेतील अनेक विद्यार्थी त्यात सहभागी झालेले होते. एनसीसी, शाळेचा गणवेश घातलेल्या तसेच वेगवेगळ्या वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता. गणपती हे विद्येचे दैवत. शाळेत अनेकांनी माझी निवड करण्यासाठी शिफारस केली.

मी स्वत:सुद्धा गणपती होण्यासाठी उत्सुक होतो. गणपतीला आवश्यक असणारी वेशभूषा, तशी आभूषणे, मला आणण्यात आली. माझ्यासोबत लक्ष्मीदेवी आणि सरस्वतीदेवींची वेशभूषा करून दोन मुलीही सहभागी झाल्या. शिवाय माझा एक मित्र साधू झाला होता. कार्यक्रमाच्या दिवशी पीतांबर आणि सर्व आभूषणे परिधान केली. सर्वात शेवटी गणपतीचा मुखवटा चढवला आणि माझ्या लक्षात आले, अरेच्चा ! मला श्वासच घेता येत नाही! दर वेळेस श्वास घेण्यासाठी सोंड बाजूला करावी लागत होती. तर साधू बनलेल्या माझ्या मित्राला त्याची खोटी दाढी सारखी टोचू लागली. त्याचा त्रास त्याला होत होता.

रथयात्रेदरम्यान आमच्या रथाचा ड्रायव्हर धूम्रपान करू लागल्याने त्याच्या धुराचा त्रास आम्हा चौघा पात्रांना होऊ लागला. लक्ष्मी आणि सरस्वतींनी नाकाला रुमाल लावला. हे दृश्य रस्त्यावर दुतर्फा उभ्या असणा-या लोकांनी पाहिले. आमची अडचण त्यांच्या लक्षात आली, ते तोंड दाबून हसू लागले. एके ठिकाणी तर काही लोकांनी आमचे हात जोडून दर्शन घेतले. आम्हाला अवघडल्यासारखे झाले. पण ते दर्शन आम्ही धारण केलेल्या रूपाचे होते.