accident / गेवराईमध्ये एका अपघातात बैलगाडीला कंटेनरने धडक दिली तर दुसऱ्या अपघातात कारने दुचाकीला धडक दिली; १ ठार तर ७ जण जखमी

कल्याण-विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गावरील कोळगावजवळ झाला अपघात 

प्रतिनिधी

Jun 03,2019 08:53:00 AM IST

गेवराई - तालुक्यात रविवारी दोन अपघातात एक जण ठार, तर सात जण जखमी झाले. एका अपघातात बैलगाडीला कंटेनरने धडक दिली तर दुसऱ्या अपघातात कारने दुचाकीला धडक दिली. पांढरवाडी व कोळगावजवळ हे अपघात घडले. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते.


कल्याण-विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गावरील कोळगावजवळ झाला. दुचाकी व कार अपघातात दुचाकीस्वार एक जण जागीच ठार, तर अन्य पाच जण जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली. भगवान राधाकिसन सोमलसे (५०, रा. साजापूर, जि. औरंगाबाद ) हे औरंगाबादहून मुलगा गणेश (२२)सह दुचाकीवरून नगरकडे जाताना पाठीमागून आलेल्या कारने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. अपघातात भगवान सोमलसे जागीच ठार झाले, तर मुलगा गणेश सोमलसे गंभीर जखमी झाला. दरम्यान, कारमधील चार जण जखमी झाले असून जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. अपघातानंतर कार हाॅटेलमध्ये जाऊन धडकली होती. दुसऱ्या घटनेत तालुक्यातील कोल्हेर येथील शेतकरी आसाराम वाघमारे (६०) हे आपल्या नातेवाइकांची बैलगाडी सोडवण्यासाठी जव्हारवाडी येथे रविवारी सकाळी नातू रामेश्वर शनिमंत वाघमारे (१२) व लक्ष्मण बंडू वाघमारे (१४) यांच्यासह जात होते. दरम्यान, येडशी-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावरील पांढरवाडी पुलाजवळ कंटेनरने पाठीमागून बैलगाडीला जोराची धडक दिली. अपघातात आसाराम वाघमारे व त्यांचा नातू रामेश्वर वाघमारे, लक्ष्मण वाघमारे जखमी झाले तर बैलगाडीचे पूर्ण नुकसान झाले असून एक बैल जागीच दगावला, तर दुसरा बैल जखमी झाला.

X
COMMENT