आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनाथांना 1 टक्का आरक्षणाबाबत लवकरच बैठक; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत माहिती, बनावट विद्यार्थी शोधणार

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : अनाथ मुलांना खुल्या संवर्गात एक टक्का आरक्षण देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी विधानसभा विरोधी पक्षनेते, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव यांची लवकरच बैठक घेतली जाईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. तसेच मराठा मुलांसाठी स्थापन केलेल्या सारथी संस्थेची स्वायत्तता कायम राखली जाईल आणि पूर्वीच्या सरकारने सुरु केलेली कामे बंद करण्याची या शासनाची भूमिका नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अनाथ मुलांच्या आरक्षणाचा प्रश्न औचित्याच्या मुद्द्याद्वारे सभागृहात उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री म्हणाले, अनाथ मुलांना खुल्या प्रवर्गात एक टक्का आरक्षणाचा निर्णय झाला आहे. यासंदर्भात बनावट अनाथ प्रमाणपत्र धारण केलेल्या विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावर मार्ग काढला जाईल. त्यासाठी अर्थसंकल्प झाल्यानंतर सर्व संबंधितांची बैठक घेण्यात येईल. 

सारथी संस्था बंद करणार नाही : अजित पवार

सारथीबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री म्हणाले, सारथी संस्था बंद केली जाणार नाही. या संस्थेत शासनाच्या निधीचा वापर योग्य पद्धतीने झाल्याचे आढळले नाही. या संस्थेतील अधिकाऱ्यांनी चुकीची कामे केली असतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. सारथी संस्थेला मदत करण्याची शासनाची भूमिका आहे. पूर्वीच्या सरकारने सुरू केलेली कामे बंद करण्याची आमची भूमिका नाही. 

अमली पदार्थांचा विळखा रोखण्यासाठी कायदेशीर उपाययोजनांसह जनजागृती; गृहमंत्री अनिल देशमुख यांची परिषदेत माहिती

मुंबई : अमली पदार्थांचा वाढता विळखा रोखण्यासाठी कायदेशीर कठोर उपाययोनांबरोबरच जनजागृतीही महत्वपूर्ण ठरणार आहे. यासाठी शासन स्तरावर कार्यवाही करण्यात येईल. स्वयंसेवी संस्थाचीही जनजागृतीसाठी मदत घेण्यात येणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मंगळवारी विधानपरिषदेत सांगितले.

काँग्रेस आमदार अनंत गाडगीळ यांनी याबाबत लक्षवेधी उपस्थित केली होती. देशमुख म्हणाले, अंमली पदार्थांचा वाढता विळखा रोखण्यासाठी कार्यशाळा, जनजागृती पंधरवडा, जनजागृतीपर विविध कार्यक्रमांचे आयोजन शासन स्तरावर करण्यात येणार आहे. यासोबतच आपल्या पाल्यांवर पालकांनीही लक्ष देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...