आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भरधाव डंपर टायर फुटल्याने क्रुझरवर आदळला; १२ ठार, ६ गंभीर जखमी

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • जळगावच्या यावल तालुक्यातील हिंगोणाजवळ रात्री ११ वाजता दुर्घटना
  • अपघातात वधूची आई-वडील आणि भावाचा मृत्यू

शेखर पटेल

यावल (जि.जळगाव) - अंकलेश्वर-बऱ्हाणपूर राज्यमार्गावर हिंगोणा गावाजवळ रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास भरधाव डंपरचे टायर फुटल्याने तो समाेरून येणाऱ्या क्रुझर वाहनावर धडकला. यात १८ प्रवाशांपैकी १२ जण ठार तर ६ जण गंभीर जखमी झाले. मृतांत १ बालिका, १ बालक, ८ महिला व २ पुरुषांचा समावेश आहे. या अपघातात वधूचे आई-वडील आणि भावाचा मृत्यू झाला.चोपडा येथे रविवारी रात्री लग्नाचा स्वागत समारंभ (रिसेप्शन) आटोपल्यानंतर मुक्ताईनगर तालुक्यातील चिंचोल, चांगदेव येथील चौधरी परिवारातील सदस्य व त्यांचे नातेवाईक क्रुझर (एमएच १९ सीव्ही १७७२) या चारचाकी वाहनाद्वारे घराकडे परतत होते. दीपनगरजवळील वेल्हाळे येथून राख घेऊन डांभुर्णीकडे (ता. यावल) भरधाव जाणाऱ्या डंपरचे (एमएच ४० एन ७७५८) उजव्या बाजूचे टायर हिंगोणा गावाजवळ फुटले. त्यामुळे डंपर समोरून येणाऱ्या क्रुझरवर जाऊन धडकले. या वाहनात लहान बालकांसह एकूण १७ जण होते. ते गंभीररीत्या जखमी झाले. या प्रकरणी फैजपूर पोलिसांत अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, डंपरचालक मुकुंदा गणेश भंगाळे (रा. डांभुर्णी) यास अटक केली आहे.३ पैकी १ वाहनाला अपघात

चोपडा नगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक व्ही.के. पाटील यांचा मुलगा प्रतीक व चिंचोल येथील मंजुश्री यांचा विवाह ३० जानेवारीला झाला. २ फेब्रुवारीला चोपड्यात रिसेप्शन आयोजित करण्यात आले होते. हा कार्यक्रम १० वाजता संपला. त्यानंतर वधूकडील मंडळी तीन वेगवेगळ्या चारचाकी वाहनांमधून चिंचोलला जाण्यासाठी निघाली असता काळाने झडप घातली.वधूला नंतर दिली माहिती

या अपघातात वधू मंजुश्रीचे वडील प्रभाकर चौधरी, आई प्रभाबाई व भाऊ शिवमचा मृत्यू झाला. याबाबत माहिती तिला आधी देण्यात आली नव्हती. तिला आधी आपण देवदर्शनाला जात असल्याचे सांगण्यात आले. नंतर तिला ही माहिती देण्यात आली.विविध रुग्णालयांत उपचार

जखमींवर यावल, सावदा, फैजपूर व साकेगाव येथील गोदावरी वैद्यकीय महाविद्यालयात उपचार करण्यात आले. यावल ग्रामीण रुग्णालयात रात्री १२ वाजता तिघांचा तर नंतर इतर ठिकाणी उपचार घेणाऱ्या अशा १२ जणांचा मृत्यू झाला. पाच जण गंभीर जखमी आहेत.  

तीनच जण बचावले...

अपघात एवढा भीषण होता की वाहनाचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. त्यात बसलेल्या १७ पैकी १२ जणांचा मृत्यू झाला तर तीन जण बालंबाल बचावले. त्यात एक महिला व दोन बालकांचा समावेश आहे.

बारा निरपराध अवैध राख वाहतुकीचे बळी... 


दीपनगर औष्णिक केंद्राच्या वेल्हाळे अॅश पॉडमधून जिल्हाभरात वीटभट्टी उद्योगासाठी अवैधरीत्या बॉटम अॅशची वाहतूक केली जाते. क्षमतेपेक्षा तीन ते चार पटींनी राख भरून होणारी ही वाहतूक जीवघेणी ठरत आहे. रविवारी रात्री नेमके तेच झाले.