आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्यांग (अंध)विद्यार्थ्यांची हेळसांड, केंद्र बदलासाठी बोर्डात मराव्या लागताय चकरा

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • काही दिव्यांग (अंध) विद्यार्थ्यांनी नजीकचे केंद्र देण्यात यावे म्हणून मागणी केली आहे

औरंगाबाद- दिव्यांग विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होवू नये, यासाठी स्वंतत्र नियम आहेत. परंतु आपल्याच नियमांचे उल्लंघन बोर्ड करत असल्याचा प्रकार बुधवारी बोर्डात दिसून आला. दिव्यांग (अंध) असणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी नजीकचे केंद्र देण्यात यावे म्हणून मागणी केली परंतु आज या उद्या या असे कारण पुढे करत तर कधी तुम्ही घेतलेल्या रायटरच्या पालकांचे संमती पत्र आणा, असे कारण दाखवून दहा-बारा अंध असलेल्या या विद्यार्थ्यांना बोर्डात चक्रा माराव्या लागत असल्याचा प्रकार दिसून आला.

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावी बोर्ड परीक्षेस 18 फेब्रुवारी पासून सुरुवात होत आहे. हॉल तिकीट देखील विद्यार्थ्यांना मिळाले आहे. आता अवघ्या दहा दिवसांवर ही परीक्षा आली आहे. मात्र नेहमीप्रमाणे यंदाच्या परीक्षेतही विद्यार्थ्यांना अडचणींचा सामाना करावा लागतो आहे. अंध असलेल्या दहा-बारा  विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलून देण्यास मंडळाने असमर्थता दर्शवली त्यामुळे विद्यार्थी परीक्षेचा अभ्यास सोडून मंडळाच्या दारात येऊन उभी रहात आले आहेत. देवगिरी महाविद्यालयातील हे विद्यार्थी आहेत.


नियमानुसार दिव्यांग अथवा अंध असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि  महाविद्यालयाच्या पत्रासह मिळालेल्या रायटरची माहिती देखील बोर्डास द्यावी लागते. परंतु असे असतांना देखील बोर्डातून या विद्यार्थ्यांना मात्र प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून आले. अंध असणाऱ्या या विद्यार्थ्यांना मिलिंद महाविद्यालय हे परीक्षा केंद्र मिळाले आहे. तर हे सर्व विद्यार्थी शासकीय वसतीगृहात राहतात. बोर्डाच्या नियमानुसार दिव्यांग असणाऱ्या विद्यार्थ्यांना सोइच्या आणि नजीकच्या केंद्रांची मागणी करता येते. परंतु आपल्याच नियमांवर आपण बोट ठेवून विद्यार्थ्यांना बोर्डात येण्यास भाग पाडले जात आहे.


या विद्यार्थ्यांना आता बोर्डने आता रायटर असलेल्यांच्या पाकलांचे संमती पत्र घेवून आणा असे सांगितले आहे. खरं तर नियमानुसार बोर्डात प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना येण्याची गरज नसते. महाविद्यालयाची जबाबदारी असते. असे असतांनाही आता अभ्यास सोडून बोर्डात विद्यार्थ्यांना चकरा माराव्या लागत आहेत. आम्हाला नजीकचे परीक्षा केंद्र मिळावे. शिवाय मिळालेल्या रायटर या सर्व विद्यार्थीनीच असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने जवळचे परीक्षा केंद्र मिळावे तसे पत्रही विद्यार्थ्यांनी देण्यासाठी आणले होते. परंतु आज या उद्या या असे करत विद्यार्थ्यांना रोज चक्रा मारण्यास भाग पाडले जात आहे.

विद्यार्थ्यांना बोर्डात येण्याची गरज नाही

विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरणात परीक्षा देता यावी. ही जबाबदारी बोर्ड आणि महाविद्यालय दोघांची आहे. अंध असणाऱ्या अथवा दिव्यांग असणाऱ्या विद्यार्थ्यांना नजीकचे केंद्र हवे असल्यास ते मागणी करु शकतात. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे हे नियमानुसार सादर करावी लागतात. पण त्याकरिता बोर्डात विद्यार्थ्यांनी येण्याची गरज नाही. ही जबाबदारी संबंधीत महाविद्यालय, कनिष्ठ महाविद्यालयातील मुख्याध्यापक आणि प्राचार्यांची आहे.-
सुगता पुन्ने, विभागीय सचिव

बातम्या आणखी आहेत...