आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजपानच्या कोराकुएन परिसरात सध्या 10 वर्षांचा एक मुलगा स्थानिक आणि पर्यटकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. इंग्रजी शिकण्याची त्याची जिद्द आणि त्यासाठी तो वापरत असलेल्या क्लृप्त्या मोठ्या रंजक आहेत. कोराकुएन येथे जपानमधील प्रसिद्ध उद्यान आहे. जगभरातील हजारो पर्यटक येथे फिरायला येतात. तेथे राहणारा 10 वर्षांचा विद्यार्थी ताकुतो कावाकामी याला इंग्रजी शिकायचे होते. पण कसे शिकायचे, हे त्याला कळत नव्हते. अखेर त्याने एक नवा मार्ग शोधून काढला. त्याने उद्यान परिसरात येणाऱ्या पर्यटकांकडून इंग्रजी शिकायचे, असे ठरवले. यासाठी तो तिथे गाइड म्हणून काम करू लागला. सध्या तो बहुतांश वेळ उद्यानातच असतो. जास्तीत जास्त पर्यटकांची भेट घेतो.
विशेष म्हणजे तो स्वत:च्या मर्जीने गाइडचे काम करतो. त्यासाठी पर्यटकांकडून पैसेही घेत नाही. फक्त त्याची एक अट असते. पर्यटकांनी त्याच्याशी इंग्रजीतच बोलावे. यासाठी त्याने स्वत:च्या जॅकेटवर एक मोठा संदेश लिहून घेतला आहे. एवढेच नाही, तर आतापर्यंत ज्या ज्या पर्यटकांची भेट घेतली, त्या सर्वांची नावे जॅकेटवर लिहिली आहेत. त्याच्याकडे अनेक प्रश्न व उत्तरे आहेत. हे सर्व तो पर्यटकांना ऐकवत असतो.
जपानमध्ये फार कमी लोक सफाईने इंग्रजी बोलतात. ते स्थानिक भाषाच जास्त वापरतात. ताकुतोला इंग्रजीची एक कठीण परीक्षा द्यायची आहे. ही परीक्षा एवढी अवघड असते की, पाचपैकी चार जपानी यात नापास होतात. ताकुतो म्हणतो, त्याला अनेक शब्दांचा उच्चार जमत नाही. उदा. क्राइसेंथेमम.
ताकुतोने शाळेतही कधीच इंग्रजी शिकलेली नाही. त्याची आई सांगते ६ महिन्यांचा असल्यापासून त्याने डिस्नेची उत्पादने वापरायला सुरुवात केली. ४ वर्षांचा झाल्यावर तो संपूर्ण वाक्य बोलू शकत होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.