आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

100 कोटी मंजूर, मात्र तीर्थक्षेत्र म्हणूनच पाथरीचा विकास, 'साई जन्मभूमीसाठी समिती नको, आधी विकास करा' : मुख्यमंत्री

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी : पाथरी ही साईबाबांची जन्मभूमी असल्याच्या वादावर परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधव व पाथरीचे काँग्रेस आमदार सुरेश वरपुडकर यांनी बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी त्यांना पाथरीसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत १०० कोटी रुपये तीर्थक्षेत्र विकास म्हणून मंजूर केल्याची माहिती देत आधी विकासकामे करून घ्या, असा सल्ला दिला. जन्मभूमीसाठी शासकीय समिती गठित करण्यावर मात्र त्यांनी नकार दर्शवला. पाथरीत मंगळवारी ग्रामसभेत जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेतेमंडळींनी लढा कायम ठेवण्याचा निर्धार केला होता. संजय जाधव व आ. सुरेश वरपुडकर यांनी बुधवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन साई जन्मभूमी प्रश्नावर समिती गठित करण्याची मागणी केली.

निधी 'तीर्थक्षेत्र विकास' या शीर्षकाखालीच : मुख्यमंत्री

मुख्यमंत्री ठाकरे यांनी या १०० कोटींचा निधी लवकरच उपलब्ध करून दिला जाईल. त्यातून साईबाबा मंदिराच्या परिसरातील विकासकामे पूर्ण करावीत, असे सांगितले. मात्र जन्मभूमीसाठी सध्या समिती वगैरे नको, आधी विकास करा, पुढे बघू, असा सल्ला त्यांनी दिला. शंभर कोटींचा हा निधी तीर्थक्षेत्र विकास या शीर्षकाखालीच देण्यात आला आहे.

अनौपचारिक शिक्कामोर्तबच : आमदार सुरेश वरपुडकर

आ.वरपुडकर म्हणाले, पुराव्यांवरून पाथरी ही साई जन्मभूमी असण्याबाबत अनौपचारिक शिक्कामोर्तब झालेले आहे. केवळ शासनदरबारी तशी नोंद नाही. १०० कोटींचा निधी हा जन्मस्थळ मंदिराच्याच विकासकामांसाठी वापरला जाईल. वादामुळे भाविकांचा वाढलेला ओघ भविष्यात या कामांमुळे अधिकच वाढेल.
 

बातम्या आणखी आहेत...