आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅबीनेटमध्ये 100 कोटी मंजूर मात्र तीर्थक्षेत्र म्हणूनच; समितीलाही मुख्यमंत्र्यांकडून नकार, दबावतंत्र पडले कमी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जन्मभूमीवर अनौपचारीक शिक्कामोर्तबच : आ.सुरेश वरपुडकर

प्रवीण देशपांडे 

परभणी- साईबाबांची पाथरी ही जन्मभूमी असल्याच्या वादावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परभणीचे शिवसेना खा. संजय जाधव व काँग्रेसचे आ. सूरेश वरपूडकर यांना बुधवारच्या (दि.22) मंत्रीमंडळाच्या बैठकीत 100 कोटी रूपये तीर्थक्षेत्र विकास म्हणून पाथरीसाठी मंजूर करण्यात आले आहेत, अशी माहिती देत आधी विकास कामे करून घ्या, असा सल्ला दिला. जन्मभूमीसाठी शासकीय समिती गठीत करण्यावर मात्र त्यांनी नकार दर्शविला. परिणामी, जन्मभूमीच्या भूमिकेवर ठाम राहिलेल्या पाथरीकरांचे दबावतंत्र सरकारदरबारी कमी पडल्याचे दिसून येत आहे.

पाथरी हीच साईबाबांची जन्मभूमी असल्याच्या भूमिकेवर ठाम राहत मंगळवारी झालेल्या ग्रामसभेत जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते मंडळींनी या प्रश्‍नावरील आपला लढा कायमच राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. शासनाला पुरावे देऊन समिती गठीत करण्याची मागणी करण्याचा ठरावही घेण्यात आला होता. त्याप्रमाणे सर्वपक्षीय खासदार - आमदारांचे शिष्टमंडळ मंगळवारी रात्रीच मुंबईस रवाना होणार होते. मात्र खा. संजय जाधव व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. सूरेश वरपुडकर हे दोघेच बुधवारी सकाळी मुंबईत दाखल झाले. या दोघांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन जन्मभूमीच्या प्रश्‍नावर समिती गठीत करण्याची मागणी केली. साईबाबांची पाथरी हीच जन्मभूमी असल्याबाबतचे सर्व पुरावेही या दोघा लोकप्रतिनिधींनी त्यांच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. परंतू, ठाकरे यांनी आजच झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत पाथरीला 100 कोटी रुपये देण्याचा निर्णय पारित झाल्याचे स्पष्ट केले.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी या 100 कोटी रुपयांच्या निधीतून साईबाबा मंदिराच्या परिसरातील विकास कामे पूर्ण करावीत. निधी लवकरच उपलब्ध करून दिला जाईल, असेही स्पष्ट केले. मात्र जन्मभूमीच्या प्रश्‍नावर समिती गठीत करण्यावर ठाकरेंनी काहीही स्पष्ट केले नाही. सध्या समिती वगैरे नको, आधी विकास करा, पूढे बघू, असा सल्लाच मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी दिला. 100 कोटींचा हा निधी तीर्थक्षेत्र विकास या शिर्षकाखालीच देण्यात आला आहे. यामुळे पाथरीसह जिल्हावासीयांनी मंगळवारी ग्रामसभेतून घेतलेल्या जन्मभूमीच्या ठरावाला मुख्यमंत्री ठाकरे यांनी बगलच दिल्याचे स्पष्ट झाले आहे. यावर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व साईभक्त काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.

लोकप्रतिनिधीच गैरहजर

पाथरीच्या मंगळवारच्या ग्रामसभेत साईबाबांची जन्मभूमी पाथरीच असल्याचा ठराव पारित करण्याबरोबरच जिल्ह्यातील सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधींनी लगेचच मुंबईत जावून मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचे जाहीर केले होते. मात्र मंगळवारी सायंकाळी केवळ खा. जाधव व आ. सुरेश वरपुडकर हे दोघेच मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी रवाना झाले. अन्य आमदार, माजी आमदार वा अन्य लोकप्रतिनिधी मुंबईत एकत्रित मुख्यमंत्र्यांकडे न गेल्यानेच पाथरीकरांचे दबावतंत्र कमी पडल्याची चर्चा आहे.

जन्मभूमीवर अनौपचारीक शिक्कामोर्तबच : आ.सुरेश वरपुडकर

पाथरी ही साईबाबांची जन्मभूमी असण्याबाबत उपलब्ध पुराव्यांवरून अनौपचारीक शिक्कामोर्तब झालेलेच आहे. केवळ शासनदरबारी तशी नोंद नाही. मात्र, मिळालेला 100 कोटींचा निधी हा जन्मस्थळ मंदिराच्याच विकास कामांसाठी वापरात येणार असल्याने या मंदिरातील विकास कामे पूर्ण होणार आहेत. भाविकांच्या नोंदी जन्मस्थळच असल्याने व शिर्डीकरांनी केलेल्या वादामुळे भाविकांचा वाढलेला ओघ भविष्यात या कामांमुळे अधिकच वाढेल. तरीही जन्मभूमीच्या नोंदीसाठी पाठपुरावा राहीलच.
 

बातम्या आणखी आहेत...