आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक- जुलैत मुसळधार बरसलेल्या पावसाने दडी मारल्यानंतर दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात असताना ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झाले. त्यात बुधवारी पूर्व भागातील नांदगाव, सिन्नर, मालेगावला सुखावल्यानंतर वरुणराजा पश्चिम पट्ट्याकडे वळला. गुरुवार ते शुक्रवारपर्यंत सकाळी ६ वाजेदरम्यानच्या २४ तासांत जिल्ह्यात ८०० मिमी पावसाची तर शुक्रवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत १०० मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील धरणसाठाही वाढला आहे. तब्बल १३ धरणांतून विसर्गही सुरू असून, सध्याच्या स्थितीत जिल्ह्यातील २४ प्रकल्पांत मिळून ६८ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. गतवर्षी यावेळी मात्र ७५ टक्के असलेल्या साठ्यापेक्षा यंदा सात टक्के कमी पाणी उपलब्ध आहे.
जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात मुसळधार पडलेल्या पावसामुळे धरणांतील पाणीसाठे ७० टक्क्यांवर गेले. पावसाचे दोन महिने शिल्लक असल्याने धरणातून पाणी सोडण्याची वेळ पाटबंधारे विभागावर आली. त्यामुळे नाशिकमधून जवळपास ११ टीएमसी पाणी जायकवाडीच्या दिशेने सोडण्यात आले. त्यानंतर मात्र पावसाने दडी मारल्यामुळे चिंता व्यक्त केली जाऊ लागली.
हरणबारी, केळझर, उंबरदरी तुडुंब
बागलाण तालुक्यातील आदिवासी पश्चिम भागात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे हरणबारी व केळझर धरण तुडुंब भरून वाहू लागले आहेत. मोसम व आरम नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून, सोमपूर व आसखेड्याजवळील पूल पाण्याखाली गेले आहे. हरणबारी धरणातून तब्बल ६००० क्युसेक विसर्ग सुरू आहे. यामुळे मोसम नदीला पूर आला असून, अनेक पुलांवरून पाणी गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.