आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

102 जणांना अटी-शर्तींवर शहरात वास्तव्याची मुभा: गैरकृत्य करणार नसल्याचे द्यावे लागणार हमीपत्र

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगरशहरातून हद्दपार करण्यासाठी आलेल्या प्रस्तावांवर सुनावणी होऊन १०२ जणांना अटी-शर्तींवर शहरात राहण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये ४८१ हद्दपारीच्या प्रस्तावांपैकी शंभरहून अधिक जणांना शहरातून हद्दपार करण्यात आले. शुक्रवारी २६ जणांना अटी व शर्तीवर शहरात वास्तव्य करण्यास परवानगी देण्यात आली. रविवारी आणखी १०२ गुंडांना शहरात राहण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, त्यांनाही अटी-शर्ती घालण्यात आल्या आहेत.


महानगरपालिका निवडणूक शांततेत पार पडावी, या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी कडक उपाययोजनेचे आदेशे दिले होते. त्यानुसार शहरातील पोलिस ठाण्यांकडून उपविभागीय दंडाधिकारी उज्ज्वला गाडेकर यांच्या कार्यालयात सुमारे ४८१ जणांचे हद्दपारीचे प्रस्ताव सादर झाले होते. भिंगार कॅम्प पोलिसांकडून ४१, कोतवाली पोलिसांकडून २०९, तर तोफखाना पोलिसांकडून २३१, असे एकूण ४८१ प्रस्ताव आले होते.


संबंधितांना हद्दपार का करु नये, अशा नोटिसा जारी झाल्या होत्या. त्यावर संबंधितांनी समक्ष उपस्थित राहून आपले म्हणणे सादर केले. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर शुक्रवारपासून उपविभागीय दंडाधिकारी उज्वला गाडेकर यांनी अंतिम आदेश जारी करण्यास सुरुवात केली.
पहिल्या टप्प्यात ४८१ पैकी ८० प्रस्तावांवर निर्णय घेण्यात आला. नगर तालुका दंडाधिकारी अप्पासाहेब शिंदे यांनीही काही जणांवर कारवाईचे आदेश काढले. रविवारी १०२ जणांना नोटिसा काढण्यात आल्या.


यामध्ये संजय गाडे, सारंग पंधाडे, प्रकाश भागानगरे, आरिफ शेख, अविनाश घुले, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष माणिक विधाते, मतीन सय्यद, अलका मुंदडा, रेशमा आठरे, रेखा जरे, जाॅय लोखंडे, बीर दिलदारसिंग, नज्जू पहेलवान, दीपक सूळ, मयूर बांगरे, सागर ठोंबरे, वैभव म्हस्के, सिद्धार्थ शेलार यांच्यासह १०२ जणांना काही अटी व शर्तींवर शहरात वास्तव्यास परवनगी मिळाली आहे.


गैरकृत्य करणार नसल्याचे हमीपत्र द्यावे लागणार
शुक्रवारी व शनिवारी मिळून आतापर्यंत १२८ जणांना अटी व शर्तीवर नगर शहरात वास्तव्यास राहण्याची मुभा मिळाली आहे. अादेश निघाल्यापासून चाेवीस तासांच्या आत तालुका दंडाधिकाऱ्यांसमोर कोणतेही गैरकृत्य करणार नसल्याचे हमीपत्र, निर्धारित काळात दररोज पोलिस ठाण्यात हजेरी व ५० हजार रुपयांचा जातमुचलका भरण्याच्या अटी व शर्तींवर शहरात वास्तव्य करता येईल

बातम्या आणखी आहेत...