105 कोटींचा घोटाळा, / 105 कोटींचा घोटाळा, हर्षद मेहताच्या भावाची सुटका:8 बँक अधिकाऱ्यांनाही कोर्टाने निर्दोष ठरवले

वृत्तसंस्था

Nov 07,2018 08:39:00 AM IST

मुंबई - स्टेट बँक ऑफ इंडियाची १०५ कोटी रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी मुंबईच्या एका न्यायालयाने ९ आरोपींची सुटका केली आहे. १९९२ च्या शेअर घोटाळ्यामुळे चर्चेत आलेल्या हर्षद मेहताचा भाऊ अश्विन मेहताचाही यात समावेश आहे. अन्य आठही आरोपी बँक कर्मचारी होते.
अश्विनी हा हर्षदचा अधिवक्ता आणि त्याच्या कंपनीमध्ये स्टॉक ब्रोकर होता. १९९१ ते १९९२ या काळात बँक अधिकाऱ्यांनी हर्षदसोबत मिळून एसबीआय कॅप्सला १०५ कोटी रुपयांचे नुकसान पोहोचवले. बँक अधिकाऱ्यांच्या माहितीशिवाय निधी हस्तांतरण शक्य नाही, असा सीबीआयचा दावा होता. दरम्यान, एसबीआयने हे सर्व २४ व्यवहार हर्षद मेहताच्या माध्यमातून केले होते आणि त्यांना कथितरीत्या यात नुकसान झाले.


दरम्यान, हर्षदचा २००१ मध्ये मृत्यू झाल्याने त्याच्याविरोधातील खटला बंद करण्यात आला. सुटका झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये एसबीआयच्या सुरक्षा विभागाचे प्रभारी रामा सीतारमण आणि अन्य अधिकारी भूषण राऊत, सी.रविकुमार, एस. सुरेशबाबू, पी. मुरलीधरन, अशोक अग्रवाल, जनार्दन बंदोपाध्याय आणि श्यामसुंदर गुप्ता यांचा समावेश आहे. दरम्यान, सरकारी पक्ष आरोप सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याचे न्यायमूर्ती शालिनी फणसाळकर-जोशी यांनी सुनावणीवेळी नमूद केले.

न्या. फणसााळकर या १९९२ च्या शेअर घोटाळा प्रकरणाशी संबंधीत खटल्याच्या निपटाऱ्यासाठी गठित करण्यात आलेल्या विशेष पीठाच्या प्रमुख आहेत. दरम्यान, बचाव पक्षाने हर्षद मेहताच्या मृत्यूचा आधार घेत अनेक तथ्ये मांडली होती. या कटात आरोप सिद्ध न होणे, हेसुद्धा एक तथ्यच असल्याचे न्यायालयाने म्हटले. अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचारविरोधी कायद्यानुसार कारवाई करण्यातही अनेक त्रृटी आढळून आल्या होत्या.

X
COMMENT