10th exam / दहावीचा सहा वर्षांतील नीचांकी निकाल, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा 9.84 टक्के निकाल घसरला


कृतिपत्रिका आणि भाषा विषयांचे अंतर्गत गुण पद्धती (इंटर्नल मार्क) बंद झाल्याने निकालावर परिणाम
 

प्रतिनिधी

Jun 08,2019 03:58:00 PM IST

नाशिक- कृतिपत्रिकांचा अवलंब करत प्रथमच झालेली परीक्षा आणि भाषा विषयांची अंतर्गत गुण पद्धती (इंटर्नल मार्क) बंद झाल्याने दहावीच्या निकालात मागील सहा वर्षांत होत गेलेला गुणांचा फुगवटा यंदा चांगलाच घसरला. महत्वाचे म्हणजे गणित आणि विज्ञान या दोन्ही विषयांची निकालाची टक्केवारी चांगली असून ज्या विषयांचे अंतर्गत गुण बंद करण्यात आले आहे, त्या चारही विषयांच्या निकालाची टक्केवारी कमी झाली आहे.

राज्याच्या एकूण निकालात मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी 11.24 टक्के घसरण झाली असून यावर्षी 77.10 टक्के निकाल लागला, तर नाशिक विभागाच्या गेल्या सहा वर्षांतील नीचांकी निकाल यंदा लागला आहे. नाशिक विभागाचा 2015 मध्ये 92.16 टक्के निकाल जाहीर झाला होता, तर मागील वर्षीची टक्केवारी 87.42 एवढी होती. गेल्या वर्षीच्याच तुलनेत 9.84 टक्के निकाल कमी लागला आहे. विभागाचा निकाल 77.58 टक्के जाहीर झाला आहे. यावर्षीही मुलांच्या तुलनेत मुलींनीच बाजी मारली आहे. मुलांचा निकाल 73.31 टक्के तर मुलींच्या निकालाची टक्केवारी 82.81 टक्के एवढी आहे.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2019 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल शनिवारी (दि. 8 जून) रोजी जाहीर झाला. नाशिक विभागातील 179 शाळांनी यंदाही 100 टक्के निकालाची परंपरा कायम ठेवत उत्तुंग यश मिळवले आहे. तर 12 शाळांचा अत्यंत कमी म्हणजेच केवळ 10 टक्के निकाल लागला आहे.

नाशिक विभाग राज्यात चौथ्या स्थानावर आहे. दहावीत एकूण 71 विषयांची परीक्षा घेण्यात आली. त्यामध्ये 19 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे.

ऑनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून गुणपडताळणी व उत्तरपत्रिकेची छायाप्रत प्राप्त करून घेण्यासाठी अर्ज करता येईल. त्यासाठी संकेतस्थळावर फॉर्म उपलब्ध करून देण्यात आला आहे. गुणपडताळणीसाठी संकेतस्थळावरील स्वसाक्षांकित प्रतीसह सोमवार (दि.10 जून) ते बुधवार (दि.19) जूनपर्यंत विहित शुल्क करून अर्ज करता येईल. तर छायाप्रतिसाठी 29 जूनपर्यंत अर्ज करता येईल. छायाप्रत मिळाल्यापासून पाच दिवसांत पुनर्मुल्यांकनासाठी अर्ज करणे आवश्यक असेल. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी मंडळाकडे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. श्रेणी, गुणसुधार योजनेतंर्गत सर्व विषयांसह उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जुलै 2019 व मार्च 2020 मध्ये परीक्षेस प्रविष्ठ होता येईल. जुलैमध्ये पुरवणी परीक्षा होणार असून अधिकृत वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध केले जाणार आहे.


कॉपी करणाऱ्या 225 विद्यार्थ्यांवर कारवाई

गैरमार्गाशी लढा या अभियानातंर्गत दहावीच्या परीक्षेतील गैरप्रकार कमी करण्यासाठी शिक्षण मंडळाकडून प्रयत्न केले जातात. मागील चार वर्षांची आकडेवारी पाहता गैरमार्गांचे प्रमाण यंदा वाढले आहे. त्यामुळे पूर्णपणे कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा होत नाही, असेच दिसून येते. मार्च 2012 मध्ये विभागात 471, तर मार्च 2013 मध्ये 301, मार्च 2014 मध्ये 146, मार्च 2015 मध्ये 132 तर 2016 मध्ये 241, 2017 मध्ये 193, मार्च 2018 मध्ये 87 गैरमार्ग प्रकरणे मिळाली होती. तर यंदा भरारी पथकांच्या माध्यमातून तब्बल 236 गैरमार्गाची प्रकरणे निदर्शनास आली असून त्यातील 250 कॉपीबहाद्दर विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहेत. त्यातील काही विद्यार्थ्यांनी पाच परीक्षांची बंदी तर काही विद्यार्थ्यांवर एका परीक्षेसाठी प्रतिबंध करण्याची कारवाई करण्यात आली आहे.

जिल्हानिहाय उत्तीर्णतेची टक्केवारी

जिल्हा- परीक्षा केंद्र संख्या- प्रविष्ट परीक्षार्थी- उत्तीर्ण परीक्षार्थी- उत्तीर्णतेची टक्केवारी

नाशिक- 196- 90656- 71487- 76.78

धुळे- 63- 28036- 21618- 77.11

जळगाव- 131- 601263- 46243- 76.92

नंदुरबार- 43- 19935- 14840- 77.44

एकूण- 433- 197850- 154193- 77.58

जिल्हानिहाय मुले व मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी

जिल्हा- मुले- मुली (टक्केवारीमध्ये)

नाशिक- 74.32- 84.04

धुळे- 73.72- 81.52

जळगाव- 72.88- 82.36

नंदुरबार- 69.58- 80.08

एकूण- 73.13- 82.81


विभागातील 179 शाळांचा 100 टक्के निकाल
दहावीच्या परीक्षेत राज्यातील 22 हजार 246 शाळांपैकी 1794 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहेत. तर नाशिक विभागातील 2 हजार 691 शाळांपैकी 179 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे. तर 90 ते 99 टक्के गुण मिळवणाऱ्या शाळांची संख्याही 445 एवढी आहे.

X
COMMENT