आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

11 वर्षांच्या मुलाने 3 वेळा जीव घातला धोक्यात, विक्राळ ब्रह्मपुत्रेत उडी मारून वाचवले आई अन् मावशीचे प्राण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुवाहाटी (आसाम) - या लहानग्या मुलाच्या धाडसाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे! अवघा 11 वर्षांचा कमल किशोर दास याने जगातील सर्वात मोठी नदी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्रह्मपुत्रेच्या अक्राळविक्राळ प्रवाहात स्वत:चा जीव धोक्यात घालून 3 वेळा उडी मारली आणि तिघांचे प्राण वाचवले.  यात त्याची आई, मावशी आणि एक अनोळखी महिला होती, परंतु ती वाचू शकली नाही.

> एका इंग्रजी दैनिकाला कमलने सांगितल्यानुसार, बुधवारी नेहमीप्रमाणे प्रवाशांना नदी पार करून देणारी एक बोट अचानक खांबाला धडकून उलटली. ही बोट उत्तर गुवाहाटीपासून दुसऱ्या टोकाला प्रवाशांना सोडायची. या बोटीत कमल होता. तो आईसोबत त्याच्या आजीला गावी सोडून परत येत होता.

 

> बोट बुडू लागताच त्याच्या आईने जोरात ओरडून त्याला किनाऱ्यावर पोहोचायला सांगितले. लहानग्या कमलने त्याप्रमाणे पोहून किनारा गाठला. पण मागे वळून पाहतो तर आई मागेच राहिली होती. त्याला कळून चुकले, आईला पोहता येत नाही, म्हणून ती त्याच्या मागे येऊ शकली नाही. त्याने पुन्हा पूर्ण ताकद लावून प्रवाहात उडी घेतली. पाणी कापत-कापत तो आईजवळ पोहोचला. पाण्याचा प्रवाह एवढा वेगवान होता की, त्याचा हातही आईपर्यंत पोहोचत नव्हता. त्याच्या हाताला आईचे केसच लागले. त्याने ते धरून आईला पकडले आणि तिला कसेबसे खांबाजवळ आणले. लगेच त्याला त्याच्या मावशीसारखी दिसणारी एक बाई पाण्यात गटांगळ्या खाताना दिसली. त्याने पुन्हा पाण्यात उडी घेऊन तिलाही खांबापर्यंत आणले.

 

> थोडा वेळ जातो न जातो तोच एक बुरखा घातलेली महिला तिच्या लहान बाळाला हातात घेऊन पाण्यात धडपडताना दिसली. त्याने क्षणाचाही विचार न करता पाण्यात उडी घेऊन तिला गाठले. मग दोघांनाही खांबापर्यंत आणण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, त्या महिलेच्या हातातून बाळ निसटले आणि ते ब्रह्मपुत्रेच्या पाण्यासोबत वाहून गेले. आपले बाळ निसटल्याचे पाहून त्या महिलेनेही लगोलग पुन्हा उडी घेतली. परंतु दुर्दैवाने तीसुद्धा पाण्यात गडप झाली.

 

> कमल म्हणतो, पाण्याचा प्रवाह एवढा जोरदार होता की, खूप प्रयत्न केल्यावर थोडेसेच अंतर कापता येत होते. तरीही मी भ्यायलो नाही. 
> कमलची आई जितूमोनी दास म्हणते, माझे आयुष्य मुलाला लाभो. त्याला पोहता येत असल्याचे मला माहिती आहे. तो ब्रह्मपुत्रेच्या पाण्यात आठवड्यातून दोनदा तरी पोहतो.

 

> तथापि, त्या महिलेला आणि तिच्या बाळाला वाचवू शकलो नाही, याचे या बालवीराला शल्य बोचत आहे. कमल म्हणाला, मी त्यांना खांबापर्यंत आणले होते, परंतु नंतर तिचे बाळ हातातून सुटल्याने तिनेही लगेच उडी मारली. हे सगळे एवढ्या लवकर घडले की, मला काहीच करता आले नाही.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, या घटनेचे आणखी काही Photos...  

 

 

बातम्या आणखी आहेत...