आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकरावी प्रवेशासाठी खुल्या गटात 7 टक्के जागा शिल्लक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई   - पुढील वर्षी अकरावी प्रवेशासाठी १६ टक्के आरक्षण एसईबीसी आणि १० टक्के आरक्षण खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मिळणार असल्यामुळे आरक्षणाची टक्केवारी १०३ टक्केपर्यंत जाईल आणि अकरावीच्या खुल्या गटातील विद्यार्थ्यांना जागाच मिळणार नाही, असा निरर्थक समज निर्माण केला जात आहे. उलट सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल, असे राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले. 


मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत तावडे बोलत होते. ते म्हणाले, ज्या शाळांत, कनिष्ठ महाविद्यालयांत आतापर्यंत २० टक्के इन-हाऊस कोटा आहे तो यंदापासून १० टक्के राखीव इतका करण्यात आला आहे. त्यामुळे अकरावीच्या प्रवेशासाठी सर्व आरक्षणानंतरही ७ टक्के जागा या खुल्या गटासाठी शिल्लक राहणार आहेत. त्यामुळे सर्वांनाच प्रवेश मिळेल. १६ टक्के जागा एसईबीसीसाठी तर १० टक्के जागा खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी राखीव असल्यामुळे आरक्षणाचे प्रमाण हे स्वाभाविकपणे वाढणार आहे.  गेल्या वर्षी झालेल्या अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत इन-हाऊस कोट्यात मुंबईत ६३९ महाविद्यालयांत एकूण ४०१५६ विद्यार्थ्यांपैकी १६७९९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आणि इनहाऊस कोट्यातील अन्य जागा या रिक्त राहिल्या होत्या, असे विनोद तावडे म्हणाले. 


पुण्यामध्ये ८३६ विविध शाखांची कनिष्ठ महाविद्यालये आहेत. या पैकी २२३ महाविद्यालये ही इनहाऊस कोट्यातील आहेत. यापैकी ५२ महाविद्यालये अल्पसंख्याक असून १७१ बिगर अल्पसंख्याक आहेत. पुण्यातील या २२३ महाविद्याल्यांमध्ये गेल्या वर्षी ११ वी च्या प्रवेश प्रक्रियेत इनहाऊस कोट्यातील एकूण १४२७४ जागांपैकी ८३६६ विद्यार्थ्यांनीच अकरावीत प्रवेश घेतला व अन्य इन-हाऊस कोट्यातील जागा रिक्त राहिल्या, ही वस्तुस्थिती  तावडे यांनी याप्रसंगी निदर्शनास आणून दिली. तरीही, पुढील वर्षाच्या ११वी प्रवेश प्रक्रियेमध्ये २० टक्के इन-हाऊस प्रवेश कोटा १० टक्क्यांपर्यंत केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...