सोलापूर / उजनी जलाशयात आढळली 12 फूट लांब मगर, मच्छीमारांनी पकडून वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे सोपवली

मासेमारी करताना मच्छिमारांना दिसली होती मगर, सर्वांनी मिळून जाळीच्या साहाय्याने मगरीला केले कैद 

Dec 01,2019 03:34:21 PM IST

गणेश जगताप

कंदर - उजनी जलाशय भिमानगर (ता.माढा) येथे रविवार सकाळी 11 वाजेच्या सुमारास धरणाजवळ 12 फू़ट लांब आणि 200 किलो वजनी मगर पकडली. भरावावर जलाशयात मच्छिमारी करणारे भगवान भोई, मामू खानेवाले यांना सकाळी 7 वाजेच्या सुमारास मगर दिसली होती. त्यानंतर सर्व मच्छिमारांनी मिळून मगरीला पकडले. त्यामुळे सर्व मच्छिमारांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, रविवारी सकाळी लवकर मच्छिमारीसाठी गेलेल्या भगवान भोई व मामु खानेवाले यांना मगर दिसल्याने त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच सहकारी त्या ठिकणी उपस्थित झाले. मगरीला भराव्यावरून पाण्यात जाता येत नसल्याने तिथे अडकली होती. सर्वांनी मिळून या मगरीला दोरी व जाळीच्या सहाय्याने पकडले. यानंतर स्थानिकांनी वनविभाग अधिकाऱ्यांना माहिती दिली. मगरीचे वजन किमान 200 किलोच्या आसपास आहे. तर लांबी 12 फूट आहे.


वनाधिकार्‍यांनी येऊन सदर मगर आपल्या ताब्यात घेतली गेल्याचे समजते. मागील बऱ्याच दिवसांपासून उजनी जलाशयात मगरीचे वास्तव्य आहे अशा बातम्या येत होत्या. परंतु त्यावर विश्वास बसत नव्हता. परंतु आज प्रत्यक्षातच मगर सापडल्याने उजनी जलाशयात मगरीचे वास्तव्य आहे. हे लक्षात आल्याने मच्छीमारांची पाचावर धारण बसली आहे. उजनी जलाशयात आणखी किती मगरी असतील अशी भीती मच्छिमारात निर्माण झाली आहे. त्यामुळे मच्छिमारास भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


मागील दोन वर्षांपूर्वी कंदर (ता.करमाळा) येथेही मच्छिमारांनी मगरीला पकडली होती. पुढे ती वनविभागाने ताब्यात घेऊन वनात सोडून दिली होती. त्यांनतर मच्छिमार बांधव यांनी सुटकेचा निःश्वास सोडला होता. पण आज पुन्हा मगर दिसल्याने उजनी धरणाच्या परिसरात मच्छिमार बांधवात व शेतकऱ्यांत भीती निर्माण झाली आहे.


या मच्छिमार बांधवानी पकडली मगर

भिमानगर येथे उजनी धरणावर भोई समाजातील महादेव नगरे, मामू भोई, शांतीलाल नगरे, नितीन सल्ले, सुरज नगरे, अशोक पतुले, दशरथ पतुले, संदीप खानेवाले, रवींद्र नगरे, पिंटू सल्ले यांनी ही मगर पकडली आहे.

आम्ही सर्वांनीच जिद्दीने पकडली मगर

मगर दिसल्याचे समजताच सर्वांना याबाबत कळवले. पण हीच मगर पाण्यात गेली तर आम्हाला मच्छीमारी करताना धोका होऊ शकतो म्हणून आम्ही सर्वांनीच जिद्दीने ही मगर पकडली आहे. यामुळे काही प्रमाणात धोका कमी झाला आहे. - भगवान भोई


X