आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन माजी मुख्यमंत्री भुईसपाट, शरद पवारांच्याही घरात पराभव; महाराष्ट्रातील मोदी सुनामीची १२ कारणे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेसने ऐनवेळी शिवसेनेतून आयात केलेल्या बाळू धानोरकरांनी लाज राखली नसती तर ‘काँग्रेसमुक्त महाराष्ट्रा’चे भाजपचे स्वप्न सिद्धीस जाऊ शकले असते. काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या आणि अगदी आणीबाणीतही पाठराखण करणाऱ्या या राज्यात काँग्रेस शब्दशः भुईसपाट झाली आहे. देशातल्या डझनभर राज्यांत काँग्रेसला भोपळाही फोडता आलेला नाही. ‘पर्याय’ म्हणून स्वतःला सिद्ध करण्यात काँग्रेसला आणि विरोधकांना आलेले अपयश हे या निकालाचे मुख्य कारण आहे. 


२०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट निर्माण झाली, त्याला सुस्पष्ट कारण हे होते की, मोदी नावाचा नवा नायक देशाला मिळाला होता. या नायकाकडून खूप अपेक्षा होत्या. मात्र, गेल्या पाच वर्षांत अपेक्षाभंगही झाले. या असंतोषाचा फटका मोदींना बसेल, अशी खात्री निर्माण होत गेली. दरम्यानच्या काळात मोदी- शहांच्या घरच्या मैदानावर झालेल्या गुजरातच्या विधानसभा निवडणुकीत भाजपची दमछाक झाली. अगदी कसाबसा विजय मोदींना मिळवता आला. पाच- सहा महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकांत मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांत विधानसभांमधील भाजपची सत्ता गेली. तिथे काँग्रेसला विजय मिळाला. त्यापूर्वी कर्नाटकातही निकालानंतर अमित शहांनी सुरू केलेले निवडणूक व्यवस्थापनाचे प्रयोग विरोधकांनी हाणून पाडले. भाजपला पराभूत करता येऊ शकते, त्यांचे सगळे व्यवस्थापन हाणून पाडता येऊ शकते, असा आत्मविश्वास विरोधकांच्या मनात निर्माण झाला. राहुल गांधींची प्रतिमा या कालावधीत उजळत गेली. त्यांच्या पत्रकार परिषदा, भाषणांमधून एक परिपक्व नेता दिसत गेला आणि विरोधकांचा आत्मविश्वास दुणावत गेला. उत्तर प्रदेशात मायावती आणि अखिलेश यांच्यासारखे पारंपरिक विरोधकही एकवटले. तिकडे चंद्राबाबू, केसीआर, ममता अशा नेत्यांना भाजपच्या पराभवाची खात्री पटली. शरद पवारांसारखा दिग्गज नेता कधी नव्हे ती थेट भूमिका घेऊ लागला. 


२३ मे हा दिवस सगळ्याच अर्थांनी महत्त्वाचा होता. अनपेक्षित निकाल लागणार, असा अंदाज होता आणि तसा तो लागलाही. मात्र, अनपेक्षित निकाल या अर्थाने लागला की, ही निवडणूक म्हणजे ‘मोदी लाट’ नव्हे, तर ‘मोदी सुनामी’ ठरली. २०१४ च्या निवडणुकीपेक्षा या वेळच्या भाजपच्या जागा वाढणार नाहीत, असा सर्वांचा होरा होता. तज्ज्ञ अशीच मांडणी करत होते. ग्राउंड रिपोर्टही यापेक्षा वेगळे नव्हते. प्रत्यक्षात जे घडले ते मात्र कमालीचे वेगळे ठरले. 


देशाप्रमाणेच महाराष्ट्रातही भाजपने बुलंद विजय मिळवत काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीला भुईसपाट केले. गेल्या निवडणुकीत भाजप – शिवसेनेकडे ४२ जागा होत्या आणि आघाडीकडे सहा. या वेळी आघाडीच्या जागा तेवढ्याच राहिल्या. मात्र, काँग्रेसची स्थिती आणखी बिकट झाली. एवढी बिकट की, दोन माजी मुख्यमंत्री पराभूत झाले. राष्ट्रवादीची स्थिती तुलनेने बरी खरीच, पण पवारांच्या घरात पहिल्यांदाच पराभव वस्तीला आला. निवडणूक आयोगाचा पक्षपातीपणा, माध्यमांचा गैरवापर, पैशांची अमाप उधळपट्टी अशी कारणे विरोधकांकडून दिली जात असली तरी त्यामुळे हे निकाल लागले, असे अनुमान काढणे पुरेसे नाही. 
 

 

कारणे काय?
१. वंचितचे संचित! :

महाराष्ट्रापुरता विचार करायचा तर, वंचित बहुजन आघाडीची भूमिका निर्णायक ठरली. राज्यातील ४८ मतदारसंघांपैकी ४१ मतदारसंघांत वंचित बहुजन आघाडी तिसऱ्या क्रमांकावर आहे. नांदेड, सोलापूर, परभणी, अकोला, बुलडाणा, यवतमाळ, सांगली, हातकणंगले अशा किमान दहा मतदारसंघांमध्ये वंचितच्या उमेदवारांमुळे आघाडीला फटका बसला आहे. 

 


२. काँग्रेस – राष्ट्रवादीचा ताठरपणा :

नगरमध्ये राष्ट्रवादीऐवजी काँग्रेसच्या सुजय विखेंना आणि औरंगाबादेत काँग्रेसऐवजी राष्ट्रवादीच्या सतीश चव्हाणांना अशी अदलाबदल झाली असती तर या दोन्ही जागा जिंकणे आघाडीला शक्य झाले असते. 

 


३. निष्प्रभ नेतृत्व : महाराष्ट्रात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण सुरुवातीपासूनच पराभूत मानसिकतेत वावरत होते. ऐन निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे- पाटील भाजपच्या मांडीला मांडी लावून बसले. तिकडे विजयसिंह मोहिते – पाटील यांच्यासारखा दिग्गज नेता भाजपमध्ये गेला. राष्ट्रवादीने तरीही त्वेषाने निवडणूक लढवली, काँग्रेस मात्र निकालापूर्वीच पराभूत झाली होती. त्यातही आर्थिक आघाडीवर काँग्रेस कधी नव्हे एवढी दुबळी भासली. 

 

४. ‘ना’ राज! :

राज ठाकरेंनी राज्यभरात अकरा सभा घेतल्या. त्यापैकी सातारा, रायगड आणि बारामती वगळता कोणताही उमेदवार विजयी होऊ शकला नाही. राज यांच्या सभांना उदंड प्रतिसाद मिळाला, पण लोक या वेळी नकारात्मक मूडमध्ये नव्हते. यांना मत देऊ नका, हे खरे; पण मग मत द्यायचे कोणाला, पर्याय कोण, हाच मुद्दा पुढे आला. शिवाय, राज यांना फार गंभीरपणे घ्यावे, असे त्यांचे ट्रॅक रेकॉर्ड नव्हते.  

 

५. पर्याय कोण?  : या निवडणुकीत मोदींचा तो करिष्मा नाही, याचे भान खुद्द मोदी आणि शहांनाही होते. पण, मोदी नसतील तर मग पर्याय काय, असा सवाल उपस्थित करण्यात मोदींच्या टीमला यश आले. ‘पर्याय कोण?’ या प्रश्नाला समाधानकारक उत्तर अखेरपर्यंत मिळू शकले नाही. या उत्तराला तोंड देताना विरोधकांच्याही नाकीनऊ आले. अध्यक्षीय पद्धतीचे स्वरूप या निवडणुकीला देण्यात मोदी टीमला यश आले. मोदींनी गेल्या पाच वर्षांत अपेक्षेप्रमाणे काम केले नाही हे खरे, पण मोदी नसतील तर कोण? संपूर्ण अंधारच! असे पर्सेप्शन तयार करणे सोपे गेले. 

 

६. मोदी निष्कलंक, संन्यासी! : अण्णा हजारेंना लोकप्रियता मिळत असताना, अण्णांचे एकटे असणे, संसार नसणे लोकांच्या लेखी फार महत्त्वाचे असते. अशा संन्यस्त वृत्तीच्या लोकांविषयी सर्वसामान्य माणसांना कमालीचा आदर असतो. तो भ्रष्टाचार करणार नाही, याची खात्री असते. संसाराचा पाश नसणारे जयललिता, मायावती यांच्यासारखे नेते आपण पाहिले असले तरी हा समज कायम आहे. मुख्य म्हणजे, आपली संन्यस्त, फकीर अशी प्रतिमा मोदींनी तयार केली. शिवाय, सिद्ध झालेला कोणताही गैरव्यवहार मोदींच्या नावावर नाही. ‘चौकीदार चोर है’ ही घोषणा कितीही गाजलेली असली तरी मोदींची ‘निष्कलंक’ प्रतिमा बदलण्यात विरोधकांना यश आले नाही. उलटपक्षी मोदींविषयीची सहानुभूतीच त्यामुळे वाढली. 

 

 

७. विरोधकांविषयी संशय : मोदींची प्रतिमा निष्कलंक, निर्मोही आणि त्याच वेळी विरोधक मात्र सारे भ्रष्ट. आणि हे सर्व भ्रष्ट विरोधक या प्रामाणिक नेत्याच्या विरोधात एकवटलेले आहेत, असे पर्सेप्शन तयार 
होत गेले. 

 


८. आणखी एक संधी देऊ :

सरकारी योजनांचा प्रचार आणि लाभार्थींना मतदार करून घेण्याची रणनीती यामुळे देशात काही तरी घडू लागले आहे, असे जनमत तयार होत गेले. शहरांमध्ये ठिकठिकाणी सुरू असणारी मेट्रोची कामे, इतर विकासकामे लक्षात घेता ‘मेरा देश बदल रहा है’ याची खात्री वाटत गेली. आणखी एक संधी मोदींना द्यायला हवी, असे वातावरण तयार होत गेले. 

 

९. कणखर राष्ट्रवाद :

निवडणूक राष्ट्रवादावर घेऊन जाण्यात मोदींना यश आले. मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे आणि मोदींमुळे जागतिक पातळीवर देशाची मान उंच झाली आहे, असा समज निर्माण करून देण्यात मोदींना यश आले. त्यामुळे जातींची गणिते उद्ध्वस्त झाली आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जनमत एकवटले. 

 

१०. पॉलिटिकल कम्युनिकेशन :

मोदींनी महाराष्ट्रात नऊ सभा घेतल्या, तर उद्धव ठाकरेंनी १५ सभा घेतल्या. त्याशिवाय देवेंद्र फडणवीसांनीही झंझावाती दौरे केले. असे स्टार प्रचारक काँग्रेसकडे नव्हते. राहुल गांधी वगळता आणि राज ठाकरे यांच्या सभांचा होऊ शकणारा फायदा वगळता, काँग्रेसकडे असा कोणताही नेता नव्हता. जिथे डॉ. अमोल कोल्हेंसारखा स्टार प्रचारक उमेदवार होता, तिथे तो ‘जायंट किलर’ ठरला. पण, असा प्रभावी प्रचारक आघाडीकडे इतरत्र नव्हता. याउलट भाजपचे प्रचारक प्रभावी ठरले. लोकांशी कनेक्ट साधण्यात त्यांना यश आले. मुख्य म्हणजे, मोदींच्या भाषणांनी, मीडिया फ्रेंडली संवादाने जादू केली. माध्यमांची भूमिकाही महत्त्वाची ठरली. आता आकडेवारी हाताशी नाही. पण, तरुण आणि महिलांची पहिली पसंती मोदी हीच होती. 

 

 

११. येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका :

लोकसभा निवडणुकांनंतर विधानसभा निवडणुका महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे भाजप – शिवसेनेच्या विद्यमान आमदारांनी आपल्या सर्व क्षमतेसह काम केले. महाराष्ट्रातील सर्व मंत्री, सत्ताधारी युतीचे १८५ आमदार मनापासून राबले. बहुसंख्य स्थानिक स्वराज्य संस्थाही भाजप – शिवसेनेकडे आहेत. मुंबई, ठाणे,  पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिकसह बहुतेक बड्या महानगरपालिका भाजप – शिवसेनेकेडे आहेत. असे सर्व नेते, विधानसभेसाठी उत्सुक असणारे उमेदवार आपल्या कार्यकर्त्यांच्या ताफ्यासह या निवडणुकीत उतरले. 

 

१२. भाजपचे पक्षसंघटन :

पक्षसंघटनेची तुलना करता भाजपच्या समोर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची तयारी अगदीच सामान्य होती. भाजप- शिवसेना यांच्या केडरसमोर आघाडीचा निभाव लागणे निव्वळ अशक्य होते. शिवाय, पक्ष म्हणून भाजप नेहमीच ‘इलेक्शन मोड’मध्ये असतो. निवडणुका जिंकण्याचे एक शास्त्र आता त्यांनी विकसित केले आहे. मोदी आणि फडणवीस हे पक्षाला मिळालेले चेहरे यासाठी अत्यंत पूरक ठरले. यापैकी काहीही काँग्रेसकडे नव्हते.  
अशा कारणांमुळे महाराष्ट्रातील मोदी सुनामीत काँग्रेस वाहून जाणे स्वाभाविकच होते.

बातम्या आणखी आहेत...