आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात दरवर्षी 12 हजार जणांचा अपघातात मृत्यू

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - महाराष्ट्रात रस्ते अपघातात दरवर्षी सुमारे १२ हजार लोक मृत्युमुखी पडतात. तर सरासरी २० ते २२ हजार जखमी हाेतात. हे सर्वच अपघात सदोष रस्ते बांधणी तसेच चुकीच्या डिझाइनमुळे होतात असे नसले तरी अपघात टाळण्यासाठी विशेष खबरदारीचे उपाय म्हणून बांधकाम विभागातर्फे राज्यातील सर्व अपघात प्रवण स्थळांचे (ब्लाॅक स्पाॅट) सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणात रस्त्याचे वळण, उतार, पुलाची लांबी व रूंदी व सद्य स्थितीचा अभ्यास करण्यात येणार आहे.  वाहतूक पोलिसांनाही यात सोबत घेण्यात येणार आहे. रस्ते बांधकाम सदोष आढळल्यास तत्काळ दुरूस्त करण्यात येईल. महाराष्ट्र वाहतूक शाखेने दिलेल्या १३२४ ब्लॅक स्पाॅटची दुरूस्ती या अंतर्गत करण्यात येणार आहे. 

सुरक्षा सल्लागार नेमणार
अपघात प्रवण स्थळी अपघात होऊ नये यासाठी प्रभावी उपाय योजना करण्यासाठी आवश्यक भासल्यास रस्ते सुरक्षा सल्लागाराची नेमणूक करण्यात येणार आहे. यासाठी रस्ते बांधणी तसेच देखभाल दुरूस्तीचा सात वर्षाचा अनुभव आवश्यक राहिल. या शिवाय राज्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यात समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीत बांधकाम विभाग आणि पोलिस विभागाचे अधिकारी राहणार असल्याचे सांगण्यात आले.

कायमस्वरूपी उपायासाठी कालबद्ध कार्यक्रम
ब्लॅक स्पाॅटच्या ठिकाणी कायम स्वरूपी उपाय योजना करण्यासाठी २ कोटींच्या निधीस ३० दिवसात मान्यता देणे, १२० दिवसात सल्लागाराने सुचवलेल्या अभियांत्रिकी सुधारणा करणे, ३ वर्षात आवश्यक भूसंपादन करणे, नवीन पूल, चढ आदी बांधकाम ५ वर्षात पूर्ण करणे असा कालबद्ध कार्यक्रम दिला आहे. रस्ते देखभाल दुरूस्तीसाठी मिळणाऱ्या एकूण निधीपैकी ५ टक्के निधी अपघात प्रवण स्थळाच्या सुधारणेसाठी खर्च करणे आवश्यक आहे. यासाठी कार्यकारी अभियंत्याला ५० लाख, अधीक्षक अभियंता १ कोटी व मुख्य अभियंत्याला २ कोटी मंजुरीचे अधिकार आहेत.