आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

परभणीत महापालिकेच्या टेम्पोखाली चिरडून 12 वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ऑटोचालक वडिलांना जेवणाचा डब्बा देण्यासाठी सायकलवरुन येत होती

परभणी- ऑटोरिक्षा चालक असलेल्या वडिलांना जेवणाचा डब्बा देण्यासाठी सायकलवर आलेल्या शाळकरी मुलीचा महापालिकेच्या कचरा उचलणाऱ्या टेम्पोखाली आल्याने जागीच मृत्यू झाला. सोमवारी (दि.25) दुपारी 12 च्या सुमारास ही घटना घडली. श्रुती नागोराव भराडे(वय 12) असे या मुुलीचे नाव आहे.



नांदखेडा येथील रहिवाशी असलेले नागोराव भराडे हे वांगी रस्त्यावर वास्तव्यास आहेत. ते ऑटोरिक्षा चालविण्याचा व्यवसाय करतात. सोमवारी ते विद्यानगर कॉर्नर येथे उभे होते. त्यांची मुलगी श्रुती ही सायकलवरून त्यांना जेवणाचा डब्बा देण्यासाठी आली होती. तिने वडिलांच्या हाती डब्बा स्वाधीन केला. घरून आणलेले काही पैसे देखील तिने वडिलांना दिले व परत निघत असतांनाच वैष्णवी मंगल कार्यालयाकडून आलेल्या महापालिकेच्या कच-याच्या टेम्पोचा (एम.एच.22- एम.एम.0719) तिच्या सायकलला धक्का लागला. त्यामुळे ती तेथेच पडली. याच दरम्यान, टेम्पोच्या पाठीमागील भाग श्रुतीच्या डोक्याला लागल्याने जागीच रक्तबंबाळ होवून तिचा मृत्यू झाला.


घटना घडताच टेम्पोचालक घटनास्थळावरून फरार झाला. मोठा जमाव एकत्र आल्याचे पाहताच त्याने पोबारा केला. जमावाने टेम्पोवर दगडफेक करण्यास सुरूवात केली. या घटनेची माहिती मिळताच नानलपेठ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती अटोक्यात आणली. श्रुतीचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आला. यावेळी परिसरात तिचे नातेवाईक मोठ्या संख्येने दाखल झाले होते. श्रुतीला आई, वडिलांसह एक बहीण असून तिच्या या काही क्षणातील झालेल्या मृत्यूने शहरात मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत होती.