आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव - जळगावच्या किशाेर सूर्यवंशी या तरुण खेळाडूच्या दाेन्ही किडन्या निकामी झाल्याने ताे १२ वर्षांपूर्वी मृत्यूंशी झुंज देत हाेता. त्याच्यावर अवयव प्रत्याराेपण शस्त्रक्रिया झाली आहे. आता यंदा ताे ब्रिटनमध्ये हाेणाऱ्या ‘वर्ल्ड ट्रान्सप्लांट गेम्स’ या अवयव प्रत्याराेपण केलेल्या व्यक्तींसाठी हाेणाऱ्या जागतिक क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. आॅलिम्पिकच्या धर्तीवर हाेणाऱ्या या स्पर्धेसाठी भारतातून १५ खेळाडूंची निवड करण्यात आली असून त्यात किशोर महाराष्ट्रातून एकमेव आहे. १०० मीटर धावणे व बॅडमिंटन या क्रीडा प्रकारात ताे जगभरातील खेळाडूंशी झुंजणार आहे. किशाेर सूर्यवंशीच्या दाेन्ही किडन्या निकामी झाल्याने प्रत्याराेपण करण्याशिवाय पर्याय नसल्याने बहिणीने त्याला एक किडनी दिली. त्याचे ९ आॅगस्ट २००७ रोजी अवयव प्रत्याराेपणाचे आॅपरेशन झाले. त्यानंतर शारीरिकदृष्ट्या कमकुवत झालेल्या किशाेरने अत्यंत जिद्दीने आपला प्रवास सुरू केला. त्याने धावणे या क्रीडा प्रकारात आवड हाेती. भारतात अवयव प्रत्याराेपण केलेल्या व्यक्तींसाठी भरवल्या जाणाऱ्या राज्य व राष्ट्रीय स्पर्धेत ताे गेल्या ५ ते ६ वर्षांपासून सहभागी हाेत आहे. गेल्याच वर्षी त्याने ५०० मीटर व १०० मीटर धावणे प्रकारात सुवर्णपदक प्राप्त केले आहे.
काय आहे वर्ल्ड ट्रान्सप्लांट गेम्स?
अवयव प्रत्याराेपण केलेल्या व्यक्तींना सुदृढ आयुष्य जगता यावे, न्यूनगंडाची भावना निर्माण हाेऊ नये, जगण्याची नवीन ऊर्मी निर्माण व्हावी यासाठी विविध क्रीडा प्रकारांची स्पर्धा आयाेजित केली जाते. ही स्पर्धा जागतिक पातळीवर दर दाेन वर्षांनी घेण्यात येते. प्रत्येक वेळी वेगवेगळ्या देशांत स्पर्धेचे आयाेजन हाेते. त्यात किडनी, लिव्हर, हार्ट आणि इतर अवयव प्रत्यारोपण झालेले जगभरातील खेळाडू सहभागी होतात. त्यांची निवड देशातील अंतर्गत स्पर्धांतून केली जाते. यंदा ही स्पर्धा ब्रिटनमध्ये येथे १७ ते २३ आॅगस्टदरम्यान हाेणार आहे.
महाराष्ट्रातून एकमेव खेळाडूची निवड, १६ ऑगस्टला स्पर्धेसाठी हाेणार रवाना
ऑलिम्पिकच्या धर्तीवर आयोजित ‘वर्ल्ड ट्रान्सप्लांट गेम्स’साठी भारतातून १५ खेळाडूंची निवड करण्यात आलेली आहे. त्यापैकी एक असलेला किशोर हा महाराष्ट्रातील एकमेव खेळाडू आहे. ‘वर्ल्ड ट्रान्सप्लांट गेम्स फेडरेशन’ या जागतिक संस्थेतर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. किशोर गेल्या पाच वर्षांपासून मुंबई येथे होणाऱ्या देशांतर्गत स्पर्धांत १०० मीटर रनिंग या क्रीडा प्रकारात विशेष यश मिळवतो आहे. त्यातूनच त्याची या स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. किशोर हा भारतीय टीमसह १६ ऑगस्ट २०१९ रोजी भारतातून यूकेला रवाना हाेणार आहे.
छंद आणि सामाजिक कार्य... : किशोर हा कॉपी व स्क्रिप्ट रायटर म्हणून काम करतो. ‘सैराट नावाचं वादळ’ या त्याच्या पुस्तकाचे प्रकाशन नागराज मंजुळे यांच्या हस्ते झाले होते. किशोरला संगीताचाही छंद असून गिटार छान वाजवतो. गिटारवर त्याने गाणी तयार केली केली असून त्यात अवयव दानावरील गीतांचाही समावेश आहे. किशोरने छाया किडनी फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली आहे. ही संस्था अवयव प्रत्यारोपण जनजागृती व रुग्णांना मार्गदर्शनाचे काम करते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.