आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

13 निकषांच्या अाधारे सिद्ध झाले मराठ्यांचे मागासलेपण; आयोगाने तपासला शैक्षणिक, सामाजिक, अर्थिक स्तर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मराठा समाजाच्या मागासलेपणाबाबतचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सरकारला सादर झाला असून मराठा समाजातील तब्बल ८६ टक्के जनता ही सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याचा निर्वाळा या अहवालात देण्यात आला आहे. या अहवालासाठी एकूण तेरा कालसंगत निकषांचा अाधार आयोगाने घेतला आहे. आयोगाने स्वत: तयार केलेले हे निकष कोणते होते आणि त्या निकषांवर तपासून प्राप्त झालेल्या माहितीचा अहवालाच्या अंतिम निष्कर्षासाठी नेमका कसा उपयोग झाला, याचा घेतलेला आढावा....  

 

मराठा समाजाच्या मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी हे प्रकरण आयोगाकडे सोपवताना राज्य सरकारने काही टर्म्स ऑफ रेफरन्स (अभ्यासाची कार्यकक्षा) निश्चित केले होते. या कार्यकक्षेनुसार मराठा समाजाचे शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक निकषांवर मागासलेपण तपासण्यासाठी आयोगाने एकूण तेरा निकष निश्चित केले होते. यापैकी नऊ निकष हे प्रमुख तर चार निकष गौण स्वरूपाचे होते. या तेरा निकषांवर मिळवलेली माहिती प्राप्त होऊन त्याचे विश्लेषण पूर्ण केल्यानंतर अहवालाचा अंतिम निष्कर्ष काढताना आयोगातर्फे पंचवीस गुणांची एक प्रश्नावलीही तयार करण्यात आली होती.

  
२५ गुणांच्या प्रश्नावलीत सामाजिक, शैक्षणिक, अार्थिक मागालेसपणावर भर :  २५ गुणांच्या प्रश्नावलीपैकी दहा गुण हे सामाजिक मागासलेपणासाठी, आठ गुण हे शैक्षणिक मागासलेपणासाठी, तर सात गुण हे आर्थिक मागासलेपण निश्चित करण्यासाठी होते. या कसोटीवर आयोगाने जेव्हा माहितीची पडताळणी केली, तेव्हा सामाजिक मागासलेपणाबद्दल मराठा समाजाला दहापैकी साडेसात गुण, शैक्षणिक मागासलेपणाबद्दल आठपैकी आठ गुण, तर मराठा समाजातील आर्थिक मागासलेपणासाठी सातपैकी सहा गुण मिळाले आहेत. या गुणांचा टक्केवारीनुसार विचार केला असता शंभरपैकी ७५ टक्के मराठे हे सामाजिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या शंभरपैकी शंभर टक्के, तर आर्थिकदृष्ट्या शंभरपैकी ८६ टक्के मराठे हे मागास असल्याचा निष्कर्ष आयोगाने काढला आहे. तर सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेपणाचा एकत्रितपणे निष्कर्ष काढला असता, राज्यातील एकूण मराठा समाजापैकी ८६ टक्के समाज मागास असल्याचा आयोगाचा निष्कर्ष आहे.  

 

> मराठ्यांचा मागासलेपणा सिद्ध करण्यासाठीचे १३ निकष  

1- समूहाची सामाजिक श्रेणी कनिष्ठ मानली जाते काय?  

2-संबंधित समाजाचा पारंपरिक रोजगार सामाजिक दृष्टिकोनातून कनिष्ठ समजला जातो का?  

3- राज्याच्या सरासरीपेक्षा पाच टक्के अधिक महिला उदरनिर्वाहासाठी शारीरिक श्रमाची कामे करतात काय?  

4- राज्याच्या सरासरीपेक्षा पाच टक्के अधिक पुरुष उदरनिर्वाहासाठी शारीरिक श्रमाची कामे करतात काय?  

5- प्राथमिक शिक्षण (पहिली ते आठवी) घेतलेल्यांचे प्रमाण राज्य सरासरीपेक्षा १०% कमी आहे का?  
6- प्राथमिक शाळेतील मुलामुलींचे गळतीचे प्रमाण राज्य सरासरीपेक्षा दहा टक्क्यांनी अधिक आहे का?  
7- माध्यमिक (९ ते १० वी) परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांचे प्रमाण राज्य सरासरीपेक्षा वीस टक्क्यांनी कमी आहे का?  

8-उच्च माध्यमिक (११वी ते १२) परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांचे प्रमाण राज्य सरासरीपेक्षा वीस टक्क्यांनी कमी आहे का?  
9- पदवी, व्यावसायिक पदवी किंवा तत्सम अभ्यासक्रमांतील पदवीधरांचे प्रमाण राज्य सरासरीपेक्षा पंचवीस टक्क्यांनी कमी आहे का?  
10- दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांची संख्या राज्य सरासरीपेक्षा पंचवीस टक्क्यांनी जास्त आहे का?  
11- समाजातील ३० टक्के कुटुंबांची वस्ती कच्च्या स्वरूपाच्या घरात आहे का? (ग्रामपंचायत कायद्यांतर्गत घरपट्टी लावण्यासाठी केलेल्या वर्गवारीतील कच्च्या घराची व्याख्या यासाठी ग्राह्य धरावी.)  
12- अल्पभूधारक कुटुंब संख्या राज्य सरासरीपेक्षा दहा टक्क्यांनी अधिक आहे का?  
13- भूमिहीन कुटुंबांची संख्या राज्य सरासरीपेक्षा दहा टक्क्यांनी अधिक आहे का?

बातम्या आणखी आहेत...