आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमानतळावर सुरक्षा अधिकाऱ्याच्या नोकरीचे आमिष; तिघांना १३ लाखांनी गंडवले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- विमानतळावर सुरक्षा अधिकारी पदी नोकरी लावून देतो, म्हणून तीन बेरोजगार युवकांना १३ लाख रुपयांनी गंडवल्याचा प्रकार समोर आला आहे. या युवकांनी डाबकी रोड पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र पोलिसांनी त्यावर कोणतीही कारवाई न केल्याने युवकांनी पोलिस अधीक्षकांकडे धाव घेतली आहे.
 
> 'सनरेज सोलर पॉवर सिस्टिम' नावाची आपली एक कंपनी असून सदर कंपनी विमानतळावर काम करीत असल्याचे रणपिसे नगरातील रहिवासी उमेश राठी, शेष राठी व त्याची पत्नी मोना राठी या तिघांनी अक्षय रामेश्वर वानखडे, प्रणव अरुण वारकरी आणि आकाश दिनकर दळवी या तिघांना सांगितले. विमान तळावर सुरक्षा अधिकारी म्हणून त्यांना नोकरीचे आमिष दिले. शेष राठी व तिघांची मैत्री असल्याने त्यांनी विश्वास ठेवला. त्यानंतर ७ मे २०१६ रोजी शेष राठी याने तीनही युवकांना भेटून नोकरीसाठी ३० लाख रुपयांची मागणी केली. शेष राठीने, उमेश राठी व मोना राठी यांची ओळख करून देत १५ ऑगस्ट २०१६ च्या आतच तिघांनाही सुरक्षा अधिकारी म्हणून नोकरी मिळणार असल्याचे आमिष दिले. यावर विश्वास ठेवत आशिष वानखडे यांनी एक लाख रुपये काढून राठी कुटुंबीयांना दिले. त्यानंतर तिघांनी मिळून १३ लाख २३ हजार ५०० रुपयांची रक्कम राठी कुटुंबीयांना दिली. मात्र वेळेत नोकरी न मिळाल्याने त्यांनी या संदर्भात शेष राठी याला विचारणा केली असता त्याने एका १०० रुपयांच्या शपथ पत्रावर तीनही युवकांची फसवणूक केल्याचे कबूल केले. घरची आर्थिक परिस्थिती बिघडल्यामुळे खोटे बोलून युवकांना लाखोंनी गंडवल्याचे कबूल करीत सदरची रक्कम परत करण्यासाठी एक धनादेश दिला. मात्र रक्कम अद्यापही परत न केल्याने युवकांनी डाबकी रोड पोलिसांत धाव घेतली.
 
सहा महिन्यांपासून युवक मारताहेत ठाण्यांच्या चकरा 
तीनही युवक डाबकी रोड पोलिस ठाण्यात सहा महिन्यापासून चकरा मारत आहेत. मात्र पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यानंतर तीनही बेरोजगार युवकांनी फसवणूक झाल्याची संपूर्ण माहिती पोलिस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांना दिल्यानंतर त्यांनी या प्रकरणात डाबकी रोड पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले, मात्र गत अनेक दिवसांपासून पोलिसांनी पोलिस अधीक्षकांच्या आदेशालाही केराची टोपली दाखवली. 
 

 

बातम्या आणखी आहेत...