मुंबई / मुंबईच्या मालाडमध्ये 20 फूट भिंत कोसळून 18 जणांचा तर कल्याणमध्ये शाळेची भिंत पडून 3 जणांचा मृत्यू झाला आहे, मृतांचा आकडा वाढण्चायाची शक्यता

अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु, मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखाची मदत 
 

दिव्य मराठी वेब

Jul 02,2019 12:46:29 PM IST

मुंबई - मागील पाच दिवसापासून मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस होत आहे. या पावसामुळे मुंबईसह अनेक ठिकाणी पाणी तुंबले. दरम्यान मुंबईतील मालाडमध्ये दोन भीषण दुर्घटना घडल्या आहेत. एका दुर्घटनेत 20 फूट उंच भिंत पडून 18 जणांचा मृत्यू झाला असून तर दुसऱ्या दुर्घटनेत 2 जणांच मृत्यू झाला आहे. त्यासोबतच कल्याणमध्येही शाळेची भिंत घरावर कोसळून 3 जणांचा मृत्यू झाला आहे. यात एका 3 वर्षांच्या चिमुकल्याचाही समावेश आहे.

चार जणांना वाचवण्यात यश
मुंबईतील मालाडमध्ये पिंपरीवाडा परिसरात मुसळधार पावसामुळे भिंत कोसळली. यात 18 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. एनडीआरफ आणि अग्निशमन दल बचावकार्यासाठी घटनास्थळी दाखल असून बचावकार्यादरम्यान चार जणांना वाचवण्यात यश आले आहे.

कल्याणच्या दुर्गाडीमध्ये मध्यरात्री 12.30 च्या सुमारास नॅशनल उर्दू शाळेची सरंक्षक भिंत एका घरावर कोसळली. या दुर्घटनेत करीना मोहम्मद चांद(26), शोभा कचरु कांबळे(60) आणि हुसैन मोहम्मद चांद या तीन वर्षीय चिमुकल्याचाही या दुर्घटनेत दुर्देवी मृत्यू झाला आहे. तर आरती राजू कार्डिले (16) ही जखमी झाली आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले दु:ख
मालाड दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करून दुःख व्यक्त केले आहे. मुख्यमंत्र्यांनी ट्वीट करत लिहिले की, 'मालाड दुर्घटनेबाबत मी फार दुःखी आहे. दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांचे मी सांत्वन करतो. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना करतो.' तर मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखाची मदत जाहीर केली आहे.

राज्य शासनाचे आवाहन

हवामान विभागाने मंगळवारी देखील अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. यामुळे सरकारने आज सर्व शाळा-महाविद्यालये आणि ऑफिसला सुटी जाहीर केली आहे. मुंबई शहरासाठी देण्यात आलेला अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन राज्य शासनाने केले आहे

X
COMMENT