आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१३ वर्षांपूर्वीचे खून प्रकरण : पद्मसिंह पाटलांनी माझ्या हत्येची सुपारी दिली होती - अण्णा हजारेंची साक्ष

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - उस्मानाबाद येथील काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर हत्येप्रकरणी मुंबई येथील सीबीआय न्यायालयात मंगळवारी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची साक्ष झाली. या प्रकरणात मुख्य आरोपी असलेले राष्ट्रवादीचे नेते पद्मसिंह पाटील यांच्यावर अण्णांनी गंभीर आरोप केले. पद्मसिंह यांना आपण ओळखत असल्याचे नमूद करून त्यांनीच काही शूटर्सना माझ्या हत्येची सुपारी दिली होती, असे अण्णा म्हणाले. 


पद्मसिंह यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप होते. तेव्हा मी उपोषण केले. तत्कालीन सरकारने याच्या चौकशीसाठी आयोग नेमला, अशी माहितीही अण्णांनी दिली. पारनेर पोलिस ठाण्यात या भ्रष्टाचारासंबंधी आपण तक्रारही दाखल केली होती. परंतु, पुढे याचे काहीच झाले नाही, असेही अण्णांनी नमूद केले. पवनराजे यांच्या पत्नी आनंदीदेवी यांनी अण्णांची साक्ष नोंदवली जावी, अशी मागणी केली होती. मात्र, ती हायकोर्टाने फेटाळली होती. नंतर सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा आदेश रद्दबातल ठरवून अण्णांची साक्ष नोंदवण्याचे आदेश दिले होते. या हत्या प्रकरणातील इतर आरोपींत लातूर येथील व्यापारी सतीश मंदाडे, मोहन शुक्ला, पारसमणी जैन, शशिकांत कुलकर्णी, कैलास यादव,  शूटर्स दिनेश तिवारी, पिंटू सिंह यांचा समावेश आहे. 

 

१३ वर्षांपूर्वीचे खून प्रकरण
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर कळंबोलीजवळ ३ जून २००६ राेजी पवनराजे व त्यांचा चालक समद काझी यांची गोळ्या घालून हत्या झाली होती. या प्रकरणी जुलै २०११ मध्ये खटला सुरू झाला.

बातम्या आणखी आहेत...