आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

13 व्या राज्यस्तरीय लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलन : वाङ्मयाने माणसाचा हृदयविस्तार व्हावा; अध्यक्ष प्राध्यापक केशव देशमुख 

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड- जिल्ह्यातील करकाळा येथे १३ व्या राज्यस्तरीय लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रा. केशव देशमुख यांचे संपादित अध्यक्षीय भाषण येथे देत आहोत. 

 

प्रिय रसिक बंधू-भगिनिंनो,
संमेलन हा एक उत्सव असतो हे खरे असले तरी तो केवळ उत्सव म्हणून ठरवता येत नाही. अशा संमेलनांचे लोकांशी असलेले नाते जास्त प्रेमाचे आणि आस्थेचे आहे. साहित्याकडे पाहण्याची दृष्टी हल्ली विविध कारणांनी खूप बदलू लागली आहे. साहित्याला वेठीस धरण्याचा उद्योग अधिक डोके वर काढतो आहे. तथापि, 'जो भ्याला, तो मेला' आणि 'ज्याचा कणा ताठ, तोच जीवनाचा परिपाठ' या दोन्ही गोष्टी लेखकाने कधीही विसरता कामा नये. अशा एका धाडसाला जपण्याची वेळ आता अधिक जवळ येऊ लागलेली आहे. सावध होणं आणि भवताल सावधान करणं ही लेखकाची जबाबदारी लेखकानं विसरून चालत नाही. एकूण सामाजिक परिस्थिती साहित्यासाठी, लेखकांसाठी फार चांगली आहे असे म्हणता येत नाही. अशा वातावरणात मोकळेपणाने लिहावे आणि लिहिलेले मोकळेपणाने वाचकांना उपलब्ध करून द्यावे अशी परिस्थिती उरलेली नाही. 

 

मागील कित्येक वर्षांपासून छोटी छोटी पण पुष्कळ महत्त्वाची संमेलने सतत भरवली जातात. अशा संमेलनांत साहित्यविषयक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. लोकांना आनंदाने अशा संमेलनात सहभागी होता येते. म्हणूनच अशी संमेलने समाजासाठी मोलाची ठरत आली आहेत. लहान संमेलनाची फलनिष्पत्ती आणि यशस्विता मोठ्या संमेलनाच्या तुलनेत जास्त असते. कारण लेखक आणि श्रोता यातील अंतर इथे कमी असते. इथे मानापानाचे विषयही गौण असतात. म्हणूनच छोट्या साहित्य संमेलनांचा समाजाशी, नागरिकांशी, लेखकांशी असलेला थेट ऋणानुबंध लक्षात घेता लोकसंवादसारख्या संमेलनाचे महत्त्व अधोरेखित होऊ शकते. 

 

लोकसंवादसारखे साहित्य संमेलन ग्रामसमृद्ध लेखणीच्या गौरवासाठी चालवलेले संमेलन आहे याची आवर्जून नोंद करायला हवी. लेखकाने स्वमग्न राहण्याचा हा काळ नाही. लेखकाच्या भूमिकानिष्ठेला जास्त महत्त्व असते. माझे लेखन सामाजिक जाणिवांना सांभाळणारे आणि समाजाच्या सौहार्दतेला ताकद पुरवणारे ठरायला हवे. विचारांची लढाई कुठल्याही मोहांना आणि प्रलोभनांना क्षमा करणारी नसते किंवा अशा लढाईतूनच समाजाला आश्वासक अशा प्रकारची ऊर्जा मिळणारी असते. आपण लिहिताना भोवतालचे वास्तव नीट पारखले पाहिजे. सभोवतालच्या परिस्थितीचे चिंतन करायला पाहिजे. समाजात भरून असणारी जी बहुमुखी अशा स्वरूपाची अस्वस्थता आहे, त्या अस्वस्थतेचा विचार लेखकांच्या लेखणीच्या निकट सतत असायला हवा. 

 

'जमिनीतून येणारेच पाणी पिता येते आणि तिच्यातून पिकणारे तेच खाता येते!!' साहित्याने शरीराची गरज तृप्त करता येत नाही किंवा साहित्य केवळ मनाच्या भुकेचा विषय आहे. हे पुष्कळअंशी खरे आहे. साहित्यातून होणाऱ्या उपचाराचा समाजाला काय उपयोग आहे, असे प्रश्न समाजातून बऱ्याचदा विचारले जातात आणि ते पूर्ण चुकीचेही नाहीत. समाजाचे अन्नपाणी सर्जनशीलतेमधून पिकू शकत नाही, पण समाजाच्या विचारांचा कल बदलण्यासाठी साहित्य हे साधन होऊ शकते. माणसामाणसांतील सहकार्य व स्नेह वाढवण्यात आपण लेखकांनी हातभार लावला पाहिजे. वाङ्मयाने माणसाचा हृदयविस्तार झाला पाहिजे,' असे यशवंतराव चव्हाण सांगून गेले आहेत. हे लेखकाचे खरे काम आहे. मधाच्या बोटाकडे अथवा दाखवलेल्या गाजराकडे डोळे लावून बसणारे साहित्य हे लेखकाची उंची वाढवत नसते आणि ते समाजाच्या श्रेयाचा भाग बनू शकणारेही नसते! 

 

अस्वस्थ करणारी महत्त्वाची बाब अशी आहे की, आज माणूस समाधानी. पैसा आणि वस्तू यांची गाठ मनात ठेवून माणूस धावत आहे. धडपडत आहे. त्याला 'सुखाचा शोध' लागला असे वाटते, पण असे सुख त्याच्यासाठी मृगजळ होऊन बसले आहे. जो तो स्वत:च्या आनंदात मग्न आहे. त्याला जवळचे दिसत नाही, कशाची जवळीक राहिलेली नाही. मतलबाला नायक समजून आपण आपले जगणे जणू खलनायकवृत्तीचे करून टाकले आहे. हा विषयाचा सगळा मसाला लेखकांनी नीटपणे साहित्यात ओतून द्यायला हवा. हे आपल्यापुढील आव्हान आहे. या प्रकारे लेखक माणसाला, त्याच्या वर्तमान जगण्याला असा थेट भिडला तरच नवे तरंग पुन्हा उभे राहतील. बुडाचा गाळ जरा वर येईल, साहित्यातही नवे रंग गडदपणाने मिसळू शकतील.
 
जेव्हा आपण 'लेखकाची जबाबदारी' असा विषय घेऊन बोलतो तेव्हा ती जबाबदारी अशी असते. शेतीच्या सर्व प्रश्नांचे निराकरण साहित्यातून होऊ शकत नाही हे खरे असले तरीही 'खेड्यांच्या उजेडाच्या वाती उजळत राहण्यासाठी येथील असंख्य हातांना तुमच्या लेखणीचा हात सतत लागायला हवा, अशी मी तुमच्याकडे प्रार्थना करीत आहे.'म्हणूनच माझ्या भावजीवनाशी या संमेलनाचे ऋणानुबंध जोडले गेले याचा मला आनंद आहे. 

 

समाजाचे अन्नपाणी सर्जनशीलतेमधून पिकू शकत नाही, पण समाजाच्या विचारांचा कल बदलण्यासाठी साहित्य हे साधन होऊ शकते. माणसामाणसांतील सहकार्य व स्नेह वाढवण्यात आपण लेखकांनी हातभार लावला पाहिजे. वाङ्मयाने माणसाचा हृदयविस्तार झाला पाहिजे,' असे यशवंतराव चव्हाण सांगून गेले. लेखकाचे हेच खरे काम आहे. मधाच्या बोटाकडे अथवा दाखवलेल्या गाजराकडे डोळे लावून बसणारे साहित्य लेखकाची उंची वाढवत नसते आणि ते समाजाच्या श्रेयाचा भाग बनू शकणारेही नसते! 
धन्यवाद! 

 

बातम्या आणखी आहेत...