Maharashtra Special / सिझेरियन प्रसुती झालेल्या 14 महिलांना एकाचवेळी पोटातील टाक्यांमध्ये इन्फेक्शन, यवतमाळच्या शासकीय रुग्णालयातील खळबळजनक घटना

वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या संख्येमुळे शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांमध्ये विशेष काळजी घेण्यात येत नसल्याने इन्फेक्शनमध्ये वाढ

दिव्य मराठी वेब टीम

May 13,2019 04:43:51 PM IST

यवतमाळ- यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात सिझेरियनने प्रसूती झालेल्या 12 ते 14 महिलांना इन्फेक्शन झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे मागील महिनाभरापासून या महिलांना नवजात बाळांसह रुग्णालयातच उपचार घ्यावे लागत आहेत.


यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयातील प्रसूती विभागात 21 एप्रिल रोजी सिझेरियन झालेल्या महिलांनी शस्त्रक्रियेच्या ठिकाणी प्रचंड दुखत असल्याची तक्रार केली होती. पण थोडी कळ सोसा, असे त्यांना सांगण्यात आले. यानंतर त्या महिलांना अनेक दिवस रूग्णालयातच ठेवण्यात आले. एवढे दिवस कोणते उपचार सुरू आहेत, याबाबत महिलांच्या नातलगांनी चौकशी केल्यावर प्रकरणाचा खुलासा झाला. याबाबत जास्त कुरबूर केल्यास थेट धमकावले जाते, असा आरोप प्रसुती झालेल्या महिलांच्या नातेवाईकांनी केला आहे.


प्रसुती झालेल्या महिलांना ऑपरेशनच्या टाक्यांमध्ये इन्फेक्शन झाले असल्याची बाब पुढे आली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात महिलांना इन्फेक्शन झाल्याने रुग्णालयातील डॉक्टरांता बेजबाबदारपणा समोर आला आहे. या विभागातील एकूण 14 महिलांना अशाच प्रकारचे इन्फेक्शन झाल्याची माहिती आहे.


यवतमाळचे जिल्हा शासकीय रुग्णालय ग्रामीण भागातील रुग्णांसाठी आशास्थान आहे. ग्रामीण भागातून रुग्णाची संख्या मोठी आहे. विशेष म्हणजे प्रसुतीसाठी रुग्ण मोठ्या प्रमाणात येतात. वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या संख्येमुळे शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांमध्ये विशेष काळजी घेण्यात येत नसल्याने इन्फेक्शनमध्ये वाढ झाली आहे. तसेच शस्त्रक्रिया करतेवेळी योग्य ती काळजी घेण्यात येत नसल्याने हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे.

X
COMMENT