आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसावर हल्ला करणाऱ्या आरोपीस 14 दिवसांची कोठडी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेवराई - तेलंगणा राज्यात चोरीचा गुन्हा दाखल असलेल्या  अट्टल गुन्हेगारास पकडण्यासाठी गेलेल्या गेवराई पोलिसावर आरोपीने वस्तऱ्याने प्राणघातक हल्ला केला. ही घटना गेवराई येथील जुन्या बसस्थानकाजवळ घडली. मात्र, जखमी होऊनही पोलिसाने त्या आरोपीला अटक केली होती. गेवराई पोलिसांनी मंगळवारी येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. 


गेवराई येथील शेख इक्बाल ऊर्फ अप्पू असे पोलिसावर हल्ला करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. इक्बालवर तेलंगणा राज्यात घरफोडी चोरीचे वॉरंट होते. याची माहिती पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना देण्यात आली होती. आरोपी जुन्या बसस्थानकाजवळ असलेल्या घरी आल्याची माहिती पोलिसांना मिळाली असता सपोनि आर. के. तडवी, पोलिस नाईक गणेश तळेकर, तेलंगणाचे पोहेकाँ अलंकी जनार्दन राव हे सर्व सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास आरोपीच्या घरी गेले.

 

दरम्यान, पोलिसांना पाहताच आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. या वेळी पोलिस नाईक गणेश तळेकर यांनी त्याला पकडले असता इक्बालने खिशातील वस्तरा काढून तळेकर यांच्यावर हल्ला केला. या वेळी तळेकरांच्या उजव्या हाताला जखम झाली होती. दरम्यान सपोनि तडवी व जनार्दन राव यांनी या वेळी आरोपीला ताब्यात घेऊन येथील पोलिस ठाण्यात नेले, तर गणेश तळेकर यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले 
होते. तळेकर यांच्या तक्रारीवरून गेवराई ठाण्यात इक्बालविरोधात शासकीय कामात अडथळा व पोलिसावर हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

बातम्या आणखी आहेत...