आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१४ वर्षे, २००० मृत्यू, २८०० कोटी रु. खर्च; तरीही प्रत्येक पावसाळ्यात का बुडते मुंबई?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - देशभरात भलेही पावसाळ्याची प्रतीक्षा होत असली तरी मुंबईवर तो दरवर्षी संकट होऊनच कोसळतो. मुंबई ३-४ दिवसांसाठी ठप्प होते. मुंबईचे हे भयावह चित्र जगाने प्रथम २००५ मध्ये पाहिले होते. त्या वर्षी तेथे सुमारे १००० लोकांचा मृत्यू झाला होता. या वेळीही मुंबई दोन दिवसांपर्यंत बुडालेली होती. त्यामुळे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत दरवर्षी पाणी का तुंबते, असा प्रश्न निर्माण होतो. ‘दिव्य मराठी’ने त्याची पडताळणी केली असता काही आश्चर्यकारक तथ्ये समोर आली. वेगवेगळ्या विभागांच्या अहवालानुसार २००५ नंतर आतापर्यंत या समस्येवर एमएमआरडीए आणि मुंबई महापालिकेने फक्त नद्या, नाल्यांची स्वच्छता आणि पंपिंग स्टेशनच्या बांधकामावरच २८१५ कोटी रुपये खर्च केले आहेत. तरीही मुंबईची समस्या कायम आहे. त्यापेक्षाही भयावह म्हणजे अशा प्रकारच्या संकटात मुंबईत सुमारे २००० लोकांचा मृत्यू झालेला आहे.


माहितीचा अधिकार क्षेत्रातील कार्यकर्ते अनिल गलगली हे मिठी नदी आणि मुंबईच्या नाल्याच्या साफसफाईच्या विषयावर बारकाईने नजर ठेवतात. ते त्यासाठी मुंबई मनपा आणि एमएमआरडीएला जास्त जबाबदार ठरवतात. गलगली म्हणाले की, मुंबई मनपाला ब्रिमस्टोवॅड प्रकल्पांतर्गत जी ५८ कामे करायची होती त्यापैकी पंपिंग स्टेशनचे काम सोडले तर बहुतांश कामे अपूर्ण आहेत. मुंबईला तुंबण्यापासून वाचवण्यासाठी आतापर्यंत कोट्यवधी रुपये पाण्यासारखे वाहवण्यात आले. मिठी नदी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या विहार तलावापासून सुरू होऊन कुर्ला, साकी नाका, विमानतळ, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणांहून जात माहीमच्या खाडीजवळ अरबी समुद्राला जाऊन मिळते.


२६ जुलै २००५ ला जेव्हा मुंबईत पूर आला होता तेव्हा त्याचे मुख्य कारण मिठी नदी तुडुंब भरून वाहणे हेही होते. या घटनेनंतरच मुख्यत्वे पूर्ण शहराला त्याचे महत्त्व कळले होते. चितळे समितीच्या शिफारशीवरून आतापर्यंत मिठी नदीची साफसफाई, तिचे रुंदीकरण आणि खोलीकरण, तिच्या आसपासची बांधकामे इतरत्र स्थानांतरित करणे, ४ पुलांच्या बांधकामासहित इतर कामांवर कोट्यवधी रुपये खर्च झाले आहेत, पण काहीही फरक पडलेला नाही.
मुंबई मनपा आणि एमएमआरडीएने मुंबईला बुडण्यापासून वाचवण्यासाठी फक्त मिठी नदीवरच पाण्यासारखे पैसे खर्च केले असेही नाही. मुंबई उपनगराला वाचवण्यासाठी १२ किमी लांब दहीसर नदी, ७ किमी लांब पोइसर नदी आणि ७ किमी लांब ओशिवरा नदीवरही कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. अशाच प्रकारे ८ ठिकाणी ५०० कोटी रुपये खर्च करून पंपिंग स्टेशनच्या बांधकामाची योजना आहे, पण आतापर्यंत ६ ठिकाणीच पंपिंग स्टेशन उभारले गेले आहेत. प्रख्यात टाऊन प्लॅनर चंद्रशेखर प्रभू यांनी सांगितले की, पावसात मुंबई पाण्यात बुडण्यासाठी इतर कोणी नाही, तर आम्ही सर्व जण जबाबदार आहोत. तुम्ही सकाळी-सकाळी मुंबई बीचला जा, तुम्हाला मोठ्या संख्येत प्लास्टिकच्या पिशव्या किनाऱ्याला वाहून आल्याचे दिसेल. त्यामुळे कितीही पैसा खर्च केला तरी जोपर्यंत लोक आसपासच्या नाल्यांत प्लास्टिकच्या थैल्या फेकत राहतील तोपर्यंत मुंबईत पाणी तुंबणे स्वाभाविक आहे. मिठी नदीच्या दोन्ही बाजूंना काँक्रीटची उंच भिंत बांधली जाण्याच्या विरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका (पीआयएल) दाखल करणारे ज्येष्ठ नागरिक जनक दफ्तरी हेही प्रभूंच्या मुद्द्याशी सहमती दर्शवतात. ते म्हणाले की, मिठी नदीसह मुंबईच्या सर्व नद्या आणि आणि प्रमुख नाल्यांचा नैसर्गिक प्रवाह मनपा अधिकाऱ्यांनी मनमानीपणे वळवला आहे. आधी जे पाणी जमिनीत मुरत होते ते आता काँक्रीटच्या रस्त्यांवर वाहून जात आहे. सरकार पाणी ओढण्याची क्षमता २५ मिमी प्रति तासावरून वाढवून ५० मिमी करण्यासाठी विविध योजना पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे, पण मुंबईचे लोक आपली जबाबदारी योग्यपणे पार पाडत नाहीत. महाराष्ट्रात प्लास्टिक बंदी आहे. तरीही मोठ्या प्रमाणात प्लास्टिक नद्या आणि नाल्यांत फेकतात, त्यामुळे पाण्याचा निचरा थांबतो. जेव्हा मुंबईच्या अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस कमी वेळात होतो तेव्हा पूर्ण शहर बुडून जाते.
 

 

कॅग रिपोर्टमध्ये ही सांगितली कारणे
1.बीएमसीने ज्या नाल्या बनवल्या आहेत त्या सपाट आहेत. त्यामुळे भरती-ओहोटीचा प्रतिकूल परिणाम होतो.


2. नाल्या चिखलाने पूर्ण भरलेल्या आहेत. त्यामुळेच थोड्या पावसानेही त्या वाहतात.


3. पाणी निचरा करणाऱ्या नाल्या समुद्रापेक्षा खाली आहेत. त्यामुळे त्यात पाणी भरलेलेच राहते.


4. समुद्रात पाणी फेकणाऱ्या ४५नाल्यांपैकी फक्त ३ वर दरवाजे आहेत, त्यामुळे जेव्हा समुद्रात भरती येते तेव्हा नाल्यांद्वारेच समुद्राचे पाणी आत जाणे रोखले जाऊ शकते.


5. नाल्यांची क्षमता प्रति तास ४५ मिमी पाणी बाहेर काढण्याची आहे, याउलट चार तासांत ४०० मिमी पाऊस झाला.

 

> येथे सर्वात  जास्त पाणी  साचते
कुर्ला एलिना पूल ते सीएसटी पुलापर्यंत मिठी नदीच्या रुंदीकरणाचे काम झाले नाही. त्यामुळे या भागात सर्वाधिक पाणी साचते.

 

> सिवेजचे पाणी सोडून येथे सर्वाधिक घाण पसरवली जाते
आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावी परिसरातील दीड हजारावर उद्योग मिठी नदीजवळ आहेत. ते मोठ्या प्रमाणावर रासायनिक कचरा आणि सिवेजचे पाणी त्यात सोडतात.
 

 

२००५ ते जूून २०१९ पर्यंत मुंबईला तुंबण्यापासून वाचवण्यासाठी झालेल्या प्रमुख कामांवरील खर्च

काम    खर्च (कोटींत)
> मिठी नदीवर (एमएमआरडीए व मुंबई मनपा)   1,656.75 रु
> दहीसर नदीवर     125 रु 
> पोइसर नदीवर     195 रु
> ओशिवरा आणि वालभट नदीवर     77.50 रु
> हाजी अलीसहित ७ ठिकाणी पंपिंग स्टेशनवर     653 रु
> मुंबईच्या नाल्यांच्या सफाईवर     107.8 रु
> वरील प्रमुख कामांवर झालेला एकूण खर्च     2,815.05 रु